वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग
(1)अटक करणे :- खूप मेहनत करून पोलिसांनी चोरांना अटक केली.
(2)अपशब्द वापरणे :- खेळताना भास्करचा चेंडू लागताच, शंकरने भास्करविषयी रागाने अपशब्द वापरले.
(3)अचंबा वाटणे :- आकाशात इन्द्रधनुष्य पाहताच, याचा लहान मुलांना अचंबा वाटला.
(4)अभिमान वाटणे :- नितीनचा शाळेत पहिला नंबर येताच याचा त्याच्या बाबांना अभिमान वाटला.
(5)अटकाव करणे :- सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास सरकारने लोकांना अटकाव केला.
(6)अठराविश्व दारिद्र्य : घरात कुणीच कमावणारे नसल्यामुळे रवीच्या घरी अठराविश्व दारिद्र्य होते.
(7)अनुकरण करणे :- लहानसा गौरव नेहमी त्याच्या मोठ्या भावाचे अनुकरण करतो.
(8)अभिप्राय देणे :- मी लिहिलेले पत्र सुंदर आहे, असा आमच्या सरांनी अभिप्राय दिला.
(9)अभिवादन करणे :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी आम्ही त्यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.
(10)अवगत होणे - माहित होणे, कळणे, आकलन होणे.
वाक्य – पाच दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर चित्र कसे काढावे याची कला रामला अवगत झाली.
(11)अवगत करणे - माहित करून घेणे.
वाक्य – सुषमाने ने इंग्रजी भाषा चांगलीच अवगत केली आहे.
(12)अवहेलना करणे - अपमान करणे, अनादर करणे.
वाक्य – संतोषने पेन्सिल चोरल्याचे पाहताच सर्वांनी त्याची खूप अवहेलना केली.
(13)अमर होणे - चिरकाल नाव राहणे.
वाक्य – ज्यांनी देशासाठी आपले बलिदान दिले , ते वीर अमर झाले.
(14)अहोरात्र झटणे - रात्रंदिवस कष्ट करणे.
वाक्य – या वर्षी शाळेत आपला पहिला नंबर यावा यासाठी गणेश अहोरात्र झटत होता.
(15)अचूक वेध घेणे - न चुकता नेम साधणे.
वाक्य – सतीशने झाडावरील पिकलेल्या आंब्याचा अचूक वेध घेतला.
(16)अवलंब करणे - अंगीकारणे, स्वीकारणे.
वाक्य – आम्ही नियमितपणे शाळेच्या नियमांचा अवलंब करतो.
(17)अजरामर होणे - कायम स्मरणात राहणे.
वाक्य – आपल्या देशासाठी जीवाचे बलिदान दिलेले सर्व देशभक्त अजरामर झाले.
(18)अपशकुन मानणे - वाईट शंका येणे,प्रतिकूल घडण्याचा संकेत मिळणे.
वाक्य – काही लोक रस्त्याने जाताना मांजर आडवी गेल्यास अपशकुन मानतात.
(19).अद्दल घडणे - शिक्षा करणे.
वाक्य- चोरांना पकडल्यानंतर तुरुंगात टाकून पोलिसांनी त्यांना चांगली अद्दल घडवली.
(20).अचंबा वाटणे - नवल वाटणे, आश्चर्य वाटणे.
वाक्य – सर्कशीत सिंहाची कसरत पाहून सर्वांनाच अचंबा वाटला.
(21)अपूर्व योग येणे - दुर्मीळ योग येणे.
वाक्य - सूर्यग्रहण व चंद्रगहण एकाच दिवशी होण्याचा अपूर्व योग आला.
(22)अमलात आणणे - कारवाई करणे.
वाक्य – शालेय नियमांचे पालन करण्याचा निर्णय सर्व विद्यार्थ्यांनी अमलात आणला.
(23)अप्रूप वाटणे – नवल वाटणे,आश्चर्य किंवा कौतुक वाटणे.
वाक्य – एवढ्या लहान स्नेहाचे नृत्य पाहून सर्व प्रेक्षकांना तिचे अप्रूप वाटले.
(24)अवाक होणे - आश्चर्यचकित होणे.
वाक्य – जंगलात अचानक लागलेली आग पाहून सर्वजण अवाक झाले.
(25)अभिनंदन करणे - कौतुक करणे.
वाक्य – बारावीच्या परीक्षेत चांगले मार्क मिळवल्याने सर्वांनी कविताचे अभिनंदन केले.
(26)अढी नसणे - मनात डंख न ठेवणे, मनात किल्मिष न ठेवणे.
वाक्य - स्पष्ट बोलणे झाल्यामुळे तुकारामच्या मनात शंकरबद्दल कोणतीही अढी नव्हती.
(27)अवसान गोळा करणे - धीर गोळा करणे.
वाक्य - शेवटी अवसान गोळा करून शरदने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला.
(28)अशुभाची सावली पडणे - विपरीत घडणे,अमंगल घडणे.
वाक्य - लग्नानंतर दोन महिन्यातच पत्नीचा मृत्यू झाल्याने जणू रामवर अशुभाची सावली पडली.
(29)अलगद उचलणे - सावकाश उचलणे.
वाक्य – कमलने आपल्या मुलाला अलगद उचलले.
(30)असंतोष निर्माण होणे - चीड येणे, एखाद्या गोष्टीबद्दल खूप नाराजी निर्माण होणे.
वाक्य - भारतीय लोकांमध्ये इंग्रजी राजवटीविरोधी असंतोष निर्माण झाला होता.
(31)अधीर होणे - उत्सुक होणे.
वाक्य – बाबांनी नवीन आणलेली सायकल पाहण्यासाठी सतीश अधीर झाला होता.
(32)अबाधित ठेवणे - बंधन न घालणे.
वाक्य - वडिलांच्या निधनानंतर संतोषने शेतावरचा हक्क अबाधित ठेवला.
(33)अन्नान दशा होणे - उपासमारीची पाळी येणे.
वाक्य – अचानक उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेकडो गावातील लोकांची अन्नान दशा झाली.
(34)अभिलाषा धरणे - एखाद्या गोष्टीची इच्छा बाळगणे.
वाक्य – आपल्याला परवडत नसलेल्या गोष्टीची अभिलाषा धरणे चांगले नाही.
(36)अर्धचंद्र मिळणे - हकालपट्टी होणे.
वाक्य – लोकांची फसवणूक करणाऱ्यांना अर्धचंद्र मिळाला पाहिजे.
(37)अवलंबून असणे :- विसंबून असणे.
शंकरचे कुटुंब शंकरवर अवलंबून आहे.
(38)अंगवळणी पडणे :- सुरुवातीला मशीनवर काम करताना सोपान घाबरला होता; पण हळूहळू मशीनवर काम करणे त्याच्या अंगवळणी पडले.
(39)अंगी बाळगणे :- विद्यार्थ्यांनी चांगले गुण नेहमी अंगी बाळगावेत.
(40)अंगीकार करणे :- सदूने आधुनिक शेती करण्याचा अंगीकार केला.
(41)अंत होणे :- मुंगूसाने केलेल्या खूप जखमांमुळे सापाचा शेवटी अंत झाला .
(42)अंदाज बांधणे :- सदुचा पडलेला चेहरा पाहून आईने तो नाराज असल्याचा अंदाज बांधला.
(43)आकलन होणे : शिक्षकांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींचे मला आकलन होते.
(44)आदर बाळगणे : सर्व मुलांनी आई वडिलांचा व शिक्षकांचा आदर बाळगावा.
(45)आनंदाचे भरते येणे : सहलीत नवनवीन ठिकाणे पाहून सविताला आनंदाचे भरते आले.
(46)आरोळ्या ठोकणे :- हॉकीचा सामना जिंकल्यावर मुलांनी आनंदाने आरोळ्या ठोकल्या.
(47)आव्हान देणे :- आपल्या मागावर असलेल्या वाघाला शेवटी हत्तीने आव्हान दिले.
(48)आयात करणे :- देशातील वाढता कांद्याचा दर पाहून भारताने दुसऱ्या देशातून कांद्याची आयात केली.
(49)आवाहन करणे :- कोरोनाचा वाढता प्रसार पाहून पंतप्रधानांनी जनतेला घरातच राहण्याचे आवाहन केले.
(50)आळशांचा राजा :- दिनेश काहीच काम करत नाही, दिवसभर रिकामटेकडा बसलेला असतो. तो म्हणजे आळशांचा राजा आहे.
(51) आश्चर्य वाटणे - भर उन्हात पाऊस पडल्याने मला याचे खूप आश्चर्य वाटले.
(52)आश्चर्याने तोंडात बोटे घालणे :- दिनेशची कसरत पाहून रामने तोंडात बोटे घातली.
(53)आश्चर्यचकित होणे :- दोरीवर चालणाऱ्या मुलीचे थरारक दृश्य पाहून प्रेक्षक आश्चर्यचकित झाले.
(54)आज्ञा पाळणे :- आपण नेहमी आईवडिलांची व गुरुजनांची आज्ञा पाळावी.
(55)औक्षण करणे :- अर्थ-ओवाळणे.
रक्षाबंधनाच्या दिवशी माझ्या बहिणीने राखी बांधल्यानंतर मला औक्षण केले.
(56)इलाज नसणे :- अतिरेक्यांनी एवढ्या लोकांचे जीव घेतले की,त्यांना फाशीची शिक्षा देण्याशिवाय दुसरा इलाज नव्हता.
(57)उगम होणे - सुरुवात होणे.
वाक्य - त्र्यंबकेश्वरला गोदावरी नदीचा उगम होतो.
(58)उधळून टाकणे - विखरून टाकणे.
वाक्य – कुत्र्यांनी खेळता-खेळता धान्याची सर्व रास उधळून टाकली.
(59)उत्कट प्रेम असणे - खूप गाढ प्रेम असणे.
वाक्य - माझे माझ्या कुटुंबावर उत्कट प्रेम आहे.
(60)उरी फुटून मरणे - अतिश्रमाने मरण येणे.
वाक्य - पावसाच्या अभावी अन्न पिकवण्यासाठी शेतकरी उरी फुटून मरत आहेत.
(61)उघड्यावर टाकणे - निराधार करणे, जबाबदारी झटकणे.
वाक्य :-म्हातारपणात आपल्या आईवडीलांना उघड्यावर टाकलेल्या मुलांची शेजाऱ्यांनी कानउघडणी केली .
(62)उदरनिर्वाह करणे - पोट भरणे, उपजीविका करणे.
वाक्य – सदू लोकांच्या शेतात काम करून आपला उदरनिर्वाह करतो.
(63)उजळ माथ्याने फिरणे - उघडपणे वावरणे.
वाक्य – अनेक अपराध करूनही बरेच लोक उजळ माथ्याने फिरतात.
(64)उड्डाण करणे - झेप घेणे.
वाक्य – अमेरिकेला जाणाऱ्या शंकरच्या विमानाने अखेर उड्डाण केले.
(65)उपकार फेडणे - उतराई होणे, कृतज्ञता दाखवणे.
वाक्य – आपल्याला मदत केलेल्या मुंगीचा जीव वाचवून कबुतराने त्याचे उपकार फेडले.
(66)उत्तेजन देणे - प्रोत्साहन देणे.
वाक्य – नवोदय परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी दिनेशने आपल्या लहान भावाला भरपूर प्रोत्साहन दिले.
(67)उन्माद होणे - गुर्मी चढणे.
वाक्य – अचानक 10 लाखाची लॉटरी लागण्याने संपतच्या वागण्यात उन्माद आला.
(68)उंबरठा ओलांडणे - मर्यादा सोडणे.
वाक्य – वाडीलांना वाटेल तसे बोलून कबीरने उंबरठा ओलांडला.
(69)उंडारने - बागडणे, हुंदडणे.
वाक्य – आपले काम सोडून गावभर उंडारने बरोबर नाही, हे वडील सदूला समजावून सांगत होते.
(70)उत्कंठेने वाट पाहणे :- बऱ्याच वर्षांनी बाहेर देशातून येणाऱ्या आपल्या मुलाची वडील उत्कंठेने वाट पाहत होते.
(71)उत्तीर्ण होणे :- सुरेश बारावी परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाला.
(72)उन्हे उतरणे :- उन्हे उतरताना बाबा शेतातून घरी येतात .
(73)ऋण फेडणे :-आईवडिलांची सेवा करून प्रत्येकाने त्यांचे ऋण फेडले पाहिजे.
(74)एकजीव होणे :- गावात फिरणाऱ्या बिबट्याचा गावकऱ्यांनी एकजीव होऊन शोध घेतला.
(75)एकटा पडणे :- गावात सदूला कुणीही मदत करत नव्हते त्यामुळे तो एकटा पडला होता.
(76)एक होणे :- देशावर आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी सर्व देश एक झाला.
(77)ऐट दाखवणे :- बाबांनी नवीन आणलेली सायकल घेऊन रवी सर्वांना ऐट दाखवत होता.
(78)कणीक तिंबणे - मार देणे.
वाक्य – गावातील लोकांनी चोराची कणीक तिंबून चोरीची कबुली करून घेतली.
(79)कळस होणे - चांगल्या किंवा वाईट गोष्टीचा अतिरेक होणे.
वाक्य-राजुने खोड्या काढण्याचा कळस केला.
(80)कळीचा नारद - भांडणे लावणारा.
वाक्य – दोन घनिष्ठ मित्रांमध्ये भांडण लावणारा कळीचा नारद प्रभाकर होता.
(81)कपाळाला आठ्या पडणे - नाराजी दिसणे.
वाक्य – गणेशचे प्रगतीपत्रक पाहून वडिलांच्या कपाळावर आठ्या पडल्या .
(82)कच्छपी लागणे - एखाद्याच्या नादी लागणे.
वाक्य – वाईट वर्तन असणाऱ्या माणसाच्या कच्छपी लागू नये.
(83)कणव येणे - दया येणे.
वाक्य - रस्त्यावर पडलेल्या पक्ष्याच्या पिल्लाला पाहून रामेशला त्याची कणव आली.
(84)कवडीही हातास न लागणे - एका पैशाचीही प्राप्ती न होणे.
वाक्य – चोरांनी एका घरात चोरी केली मात्र एक कवडीही त्यांच्या हातास लागली नाही.
(85)कान देणे - लक्षपूर्वक ऐकणे.
वाक्य – गुरुजींनी सांगितलेली गोष्ट मुलांनी कान देऊन ऐकली.
(86)काळ पालटणे - रूप पालटणे.
वाक्य – हातात पैसा आला की आपली माणसे सुद्धा काळ पलटतात.
(87)कालवा करणे - गोंधळ करणे.
वाक्य – चार लहान मुले एकत्र जमले की,कालवा करण्यास सुरु करतात.
(88)कानाडोळा करणे - लक्ष न देणे.
वाक्य – दिनेशने शिक्षकांना सुरेशच्या खोडीबद्दल सांगण्याचा खूप प्रयत्न केला मात्र शिक्षकांनी त्याच्याकडे कानाडोळा केला.
(89)कासावीस होणे - व्याकूळ होणे.
वाक्य - उन्हात फिरून कोठेही पाणी न मिळाल्याने कावळ्याचा जीव तहानेने कासावीस झाला.
(90)कोप-यापासून हात जोडणे - संबंध न यावा अशी इच्छा करणे.
वाक्य – शरदचे त्याच्या मित्राशी भांडण झाल्यामुळे, त्याने मित्राला कोपऱ्यापासून हात जोडले.
(91)कंठ दाटून येणे - गहिवरून येणे, दुःखाचा आवेग येणे.
वाक्य – आपल्या स्वर्गवासी झालेल्या आईची आठवण येताच नंदाचा कंठ दाटून आला.
(92)कंबर कसणे - हिंमत दाखविणे, तयार होणे.
वाक्य – शाळेचे क्रीडांगण स्वच्छ करण्यासाठी मुलांनी कंबर कसली.
(93)कदर करणे :- शाळेत मुलांच्या चांगल्या गुणांची शिक्षक नेहमी कदर करतात.
(94)करुणा उत्पन्न होणे : रस्त्यावरच्या भिकाऱ्याचे दारिद्रय पाहून सर्वांच्या मनात करुणा उत्पन्न झाली.
(95)कमाल करणे :- चित्रपटात सुंदर अभिनय करून नवीन अभिनेत्रीने अगदी कमाल केली.
(96)कच खाणे :- उंच डोंगरावरून उतरताना संपतच्या मनाने कच खाल्ली.
(97)कचरणे :-नवीन शहरातून एकट्याने फिरण्यास सदूचे मन कचरले.
(98)कपाळमोक्ष होणे :- उंच झाडावरून कोसळल्यामुळे नारळ तोडणाऱ्या कामगाराचा कपाळमोक्ष झाला.
(99)कलाटणी मिळणे : शंकरला पाच लाखाची लॉटरी लागताच त्याच्या आयुष्याला एकदम कलाटणी मिळाली.
(100)कष्टाचे खाणे :- शेतकरी तुकाराम शेतात राब राब राबतो व कष्टाचे खातो.
(101)कळी खुलणे :- आईने आणलेले सुंदर कपडे पाहून लहानशा कोमलची कळी खुलली.
(102)काबाडकष्ट करणे :-अर्थ-खूप मेहनत करणे.
तुकारामने खूप काबाडकष्ट करून आपल्या मुलाला शिकवले.
(103)काटकसर करणे :- वडिलांच्या पगारात महिन्याचा घरखर्च करताना आई नेहमी काटकसर करते.
(104)काबीज करणे :-शिवाजी महाराजांनी मावळ्यांच्या मदतीने शेवटी तोरणा गड काबीज केला.
(105)कागाळी करणे :- सतीषने खेळणी तोडली, अशी राणीने आईकडे कागाळी केली.
(106)कालबाह्य ठरणे :- मोबाईलच्या वाढत्या प्रसारामुळे सध्या टेलिफोन कालबाह्य ठरू लागला आहे.
(107)काहूर उठणे : काही दिवसातच सुनामी येणार, या अफवेने लोकांमध्ये काहूर उठले.
(108)कामाचे चीज होणे :- नवोदय परीक्षेत रवीला यश मिळाले त्याने रात्रंदिवस केलेल्या कामाचे चीज झाले.
(109)काया झिजवणे :- मदर तेरेसांनी अनाथ बालकांसाठी आयुष्यभर आपली काया झिजवली.
(110)काळजी घेणे :- आई आयुष्यभर आपल्या मुलांची काळजी घेत असते.
(111)काळजात चर्र होणे :- मामाच्या अ़क्सिडेंटची बातमी ऐकताच रमाच्या काळजात चर्र झाले.
(112)कुरकुर करणे :- आज चॉकलेट खायला मिळाले नाही ; म्हणून दिनू दिवसभर कुरकुर करत होता.
(113)कुरवाळणे :- मुलाच्या चांगल्या कामगिरी नंतर आईने मुलाला मायेने कुरवाळले.
(114)कूस धन्य करणे :- देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देऊन अनेक देशभक्तांनी आपल्या आईची कूस धन्य केली.
(115)कोरडे ठणठणीत पडणे :- उन्हाळ्यात आमच्या गावातील विहिरी कोरड्या ठणठणीत पडतात.
(116)कौतुक वाटणे :- दिनेश एवढ्या लहान वयात उत्तम सूत्रसंचालन करतो याचे सर्वांना कौतुक वाटले.
(117)खजील होणे :- आपण केलेली चोरी उघडकीस आल्यावर प्रभाकर खजील झाला.
(118)ख्याती असणे :- सचिन तेंडुलकर यांची क्रिकेट खेळात खूप ख्याती आहे.
(119)खटके उडणे :- सखाराम व तुकाराम या सख्या भावांमध्ये नेहमी छोट्या मोठ्या कारनावरून खटके उडतात.
(120)खंडाने जमीन घेणे :- राम काकांनी पोलिस पाटलांची जमीन खंडाने घेतली.
(121)खडान्खडा माहिती :- शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना चोरवाटांची खडान्खडा माहिती होती.
(122)खांद्याला खांदा लावून काम करणे :- गावातील रस्त्याचे काम करताना गावकऱ्यांनी खांद्याला खांदा लावून काम केले.
(123)खेटून उभे राहणे :- शीतल आपल्या भावाला अगदी खेटून उभी होती.
(124)खेद प्रदर्शित करणे :- वेळेवर बातम्यांचे प्रसारण न झाल्यामुळे टीव्ही चॅनलने प्रेक्षकांकडे खेद प्रदर्शित केला.
(125)खेळ रंगात येणे :- दुपारी मुलांचा लगोरीचा खेळ रंगात आला.
(126)खोड मोडणे :- नेहमी कुत्र्याला दगड मारणाऱ्या संजयच्या अंगावर जेव्हा कुत्रा धावून गेला, तेव्हा त्याची खोड मोडली.
(127)गप्पांना भरती येणे :- खूप दिवसांनी एकत्र जमलेल्या मित्रांच्या गप्पांना भरती आली.
(128)गयावया करणे :- चोर स्वत:ला सोडण्यासाठी पोलिसांकडे गयावया करत होता.
(129)गलबलणे :- अपघातात रस्त्यावर पडलेले जखमी कुटुंब पाहून माणसे गलबलली.
(130) गर्दी पांगवणे :- पोलिसांनी मतदानाच्या ठिकाणी झालेली गर्दी पांगवली.
(131)गट्ट करणे :- आईने डब्यात ठेवलेले चार लाडू छोट्या रामने गट्ट केले .
(132) गस्त घालणे :- गावात हाणामारी होऊ नये ; म्हणून पोलीस गस्त घालत होते.
(133) गडप होणे :- सिंहाला पाहून पाहून हरिणाचा कळप लगेच गडप झाला.
(134) गर्भगळीत होणे :- अचानक अंगावर आलेल्या वाहनाला बघून शंकर गर्भगळीत झाला.
(135) गरज भागणे :- रामुच्या घराशेजारी असलेल्या बोअरवेलमुळे दिनेशच्या पाण्याची गरज भागली.
(136) गहिवरणे :- अनेक वर्षानंतर परदेशातून आलेल्या आपल्या मुलाला पोटाशी धरताना रामकाकू गहिवरल्या.
(137) गाडी अडणे :- परीक्षेत एका प्रश्नाचे उत्तर लिहिताना रामची गाडी अडली.
(138) गांगरून जाणे :- शेतात भला मोठा साप पाहून छोटा रवी गांगरून गेला.
(139) गाढ झोपणे :- दिवसभर क्रिकेट खेळल्यामुळे सतीश रात्री गाढ झोपला .
(140) गाव गोळा होणे :-गावात आलेला पैलवानाचा खेळ पाहण्यासाठी सारा गाव गोळा झाला.
(141) गाडून घेणे :- परीक्षा जवळ आल्यामुळे शंकरने स्वतःला अभ्यासात गाडून घेतले.
(142) गोंगाट करणे :- दुपारच्या सुट्टीत मुले मैदानात गोंगाट करत होती.
(143) गौरव करणे :- बारावीच्या परीक्षेत सूरज राज्यात पहिला आल्यामुळे मुख्याध्यापकांनी सुरजचा गौरव केला.
(144) घाम गाळणे :- कारखान्यात मजूर दिवसभर घाम गाळतात.
(145) घायाळ होणे :- सिंहाच्या तावडीत सापडलेले हरणाचे पिल्लू आपला जीव वाचवता वाचवता घायाळ झाले.
(146) घोकत बसणे :- सरांनी दिलेले इंग्रजीचे शब्द सतीश घरी जाऊन घोकत बसला.
(147) घोकंपट्टी :- उद्या इतिहासाचा पेपर असल्याने रवी घोकंपट्टी करत होता.
(148) चक्कर मारणे :- गावाकडे गेलो की,मी आमच्या शेताकडे चक्कर मारतो.
(149) चरणांवर मस्तक ठेवणे :- मी शिर्डीला जाऊन साईबाबांच्या चरणांवर मस्तक ठेवतो.
(150) चाचपडत राहणे :- घरातील लाइट गेल्यामुळे आजोबा आपला चश्मा चाचपडत होते.
(151) चांगले दिवस येणे :- सतीश नोकरी लागल्यामुळे सतिशच्या कुटुंबाला चांगले दिवस आले.
(152) चिडीचूप होणे :- सर वर्गात येताच सर्व वर्ग चिडीचूप झाला.
(153) चेव चढणे :- मांजराला पाहताच कुत्र्याला चेव चढला.
(154) छाया शोधणे :- भर उन्हात शेतात चालता चालता सतीश दमला व छाया शोधू लागला.
(155) जाहीर करणे :- उद्या शाळेत परीक्षा असल्याचे मुख्याध्यापकांनी जाहीर केले.
(156) जिवाचे सोने होणे :- चारही मुले शिकून चांगल्या पदावर नोकरी करत असल्यामुळे सखारामच्या जिवाचे सोने झाले.
(157) जीवदान देणे :- सिंहाने उंदराला जीवदान दिले.
(158) जीवावर येणे :- उंच डोंगर चढणे रमाच्या जीवावर आले.
(159) जीव मेटाकुटीला येणे :- शेतात सतत होणाऱ्या हरणाच्या त्रासामुळे सदुचा जीव मेटाकुटीला आला.
(160) जीव सुखावणे :- मुलाने परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला म्हणून दिनूच्या वडिलांचा जीव सुखावला.
(161) झडप घेणे :- घारीने सापावर आकाशातून झडप घातली.
(162) डोळा चुकवणे :- लहानसा गोपाळ आईचा डोळा चुकवून खेळायला गेला.
(163) डोळे भरून येणे :- परदेशात चाललेल्या राजुला पाहून त्याच्या वडीलाचे डोळे भरून आले.
(164) डोळे ओले होणे :- अनेक वर्षापासून आपला हरवलेला मुलगा सापडल्यानंतर आई व मुलाच्या भेटीचा प्रसंग पाहताना अनेकांचे डोळे ओले झाले.
(165) डोळे पाण्याने डबडबणे :- सासरी निघालेल्या मुलीला निरोप देताना आईचे डोळे पाण्याने डबडबले.
(166) डोळ्यांत पाणी येणे :- ताईला सासरी धाडताना आईच्या डोळ्यांत पाणी आले.
(167) डोळ्यांतून टिपे गळणे :- दहा वर्षांनी आईने आपल्या मुलाला पाहिले आणि तिच्या डोळ्यांतून टिपे गळू लागली.
(168) डोळे दिपणे :- अजिंठ्याच्या लेण्या पाहून रमाचे डोळे दिपले.
(169) डोक्यावर घेणे. अर्थ :- अतिलाड करणे.
वाक्य :- शंकरचा चित्रकलेच्या स्पर्धेत पहिला क्रमांक आला, तेव्हा बाबांनी त्याला डोक्यावर घेतले.
(170) तणतणणे :- राधाला आईने मैत्रिणिकडे जाऊ दिले नाही; म्हणून ती आईवर तणतणली.
(171) तडे पडणे :- पाऊस न पडल्यामुळे जमिनीला तडे पडतात.
(172) तहानभूक हरपणे :- सायकल पहिली की,राजूची तहानभूक हरपते.
(173) तर्क करणे :- रमेश मुंबईला गेल्याचे समजताच,तो आपल्या मामाकडे गेला असणार असा आईने तर्क केला.
(174) तडाखा बसणे :- मागील वर्षी नदीकाठच्या गावांना महापुराचा तडाखा बसला.
(175) ताजेतवाने होणे :- सकाळच्या मोकळ्या हवेत फिरल्याने मी ताजातवाना झालो.
(176) ताण येणे :- उद्याच्या इंग्रजीच्या पेपरचा रामच्या मनावर ताण आला.
(177) तावडीतून सुटणे :- अखेरीस हरिण वाघाच्या तावडीतून सुटले.
(178) ताब्यात देणे :- चोराला पकडल्यानंतर लोकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.
(179) तीरासारखे धावणे. अर्थ:- खूप वेगाने धावणे.
वाक्य :- राम धावण्याच्या स्पर्धेत तीरासारखा धावतो.
(180) तांबडे फुटणे :- तांबडे फुटले की आई घरकामाला लागते.
(181) तोंडचे पाणी पळणे :- भला मोठा साप दोन पावलांवर पाहताच संतोषच्या तोंडचे पाणी पळाले.
(182) तोंडघशी पडणे :- उडी मारताना तोल जाऊन राम तोंडघशी पडला.
(183) तोंडातून चकार शब्द न काढणे :- चुकीबद्दल वडील रामवर ओरडले तेव्हा रामच्या तोंडातून चकार शब्द बाहेर पडला नाही.
(184) तुडुंब भरणे :- पावसाळ्यात गावातील सर्व विहिरी तुडुंब भरतात.
(185) त्रेधा-तिरपीट उडणे :- दुपारी येणारे पाहुणे सकाळीच घरी आल्यामुळे आईची त्रेधा-तिरपीट उडाली.
(186) त्याग करणे :- गांधीजींच्या आदेशानुसार सर्व देशवासीयांनी विदेशी कपड्यांचा त्याग केला.
(187) थक्क करणे :- नाटकातील आपली साधूची जोरदार भूमिका वठवत विशालने सर्वांनाच थक्क केले.
(188) थट्टा करणे : सर्व दोस्तांमध्ये रमेश हडकुळा असल्यामुळे सगळे त्याची थट्टा करत.
(189) थाप मारणे :- सिनेमा बघायला गेलेल्या रामने 'मी शाळेत गेलो होतो,' अशी बाबांना थाप मारली.
(190) दगा न देणे :- चांगल्या मित्राला कधीही दगा देऊ नये.
(191) दर्शन घेणे :- शेगावला जाऊन आम्ही गजानन महाराजांचे दर्शन घेतले.
(192) दाद मागणे :- आपल्यावर झालेल्या अन्यायाची आपल्याला कोर्टात दाद मागता येते.
(193) दिवस रेटणे :- काही कामगार कारखान्यात काम न करता फक्त दिवस रेटत होते.
(194) दिलासा देणे :- महापुरामुळे घरे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना मुख्यमंत्र्यांनी आर्थिक मदत करून दिलासा दिला.
(195) दुजोरा देणे :- शाळेची सहल काढायची, या गुरुजींच्या म्हणण्याला वर्गातील सर्व मुलांनी दुजोरा दिला.
(196) देखरेख करणे :- राम सावकारांच्या शेताची देखरेख करतो.
(197) देवाणघेवाण करणे :- चांगल्या विचारांची आपण सर्वांनी देवाणघेवाण केली पाहिजे.
(198) देह झिजवणे :- शाहिद भागतसिंगांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपला देह झिजवला.
(199) देहभान हरपणे :- खेळताना लहान मुले देहभान हरपतात.
(200) धड न समजणे :- छोटा रमण काय बोलत होता ते आम्हा मुलांना धड समजत नव्हते.
(201) धडा शिकवणे :- पोलिसांनी चोरांना पकडून गजाआड करून चांगलाच धडा शिकवला.
(202)धडे देणे : शाळेत मुलांना नम्रतेने वागण्याचे धडे दिले जातात.
(203)धपाटे घालणे :- आपला गृहपाठ पूर्ण न करणाऱ्या मुलांच्या पाठीत सर धपाटे घालायचे.
(204)ध्यास घेणे : सतिषने भविष्यात क्रिकेटर होण्याचा ध्यास घेतला.
(205)धाडस दाखवणे :- रामुने एकट्याने अंधाऱ्या खोलीत प्रवेश करण्याचे धाडस दाखवले.
(206)धाप लागणे :- उंच डोंगर चढल्यामुळे निताला धाप लागली.
(207)धूम धावत सुटणे :- मांजराला पाहताच उंदीर धूम धावत सुटले.
(208)नक्कल करणे :- स्नेहसंमेलनात दिनेशने हुबेहूक अनेक कलाकारांच्या आवाजाची नक्कल केली.
(209)नजर ठेवणे :- बसस्थानकावर पोलिसांनी पाकीट मारणाऱ्यांवर नजर ठेवली होती.
(210)नवल वाटणे :- छोट्याशा रवीने स्वतः सायकल तयार केलेली पाहून त्याच्या आईला नवल वाटले.
(211)नजर चुकवणे :- पिंकीने आईची नजर चुकवून डब्यातील लाडू काढले.
(212)नाव गाजने :-भारतीय संघाने वर्ल्डकप जिंकून जगात भारताचे नाव गाजवले.
(213)नाव मिळवणे. अर्थ :- कीर्ती मिळविणे.
वाक्य :- दहावीच्या वार्षिक परीक्षेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून दिनेशने नाव मिळविले.
(214)निरीक्षण करणे :- पोलिसांनी अपघात झालेल्या जागेचे निरीक्षण केले.
(215)निष्ठा असणे :-राधाची आपल्या वर्गशिक्षिकेवर खूप निष्ठा होती.
(216)निपचित पडून राहणे :- आजारी असलेला वाघ प्राणीसंग्रहालयात निपचित पडून होता.
(217)पर्वा नसणे :- पाण्यात बुडणाऱ्या सागरला वाचवताना गणेशने आपल्या जीवाची पर्वा केली नाही.
(218)पश्चात्ताप होणे :- ज्या सतिशला आपण नेहमी तुच्छ समजून हसत होतो त्यानेच आपल्याला संकट काळात मदत केली याचा गणेशला पश्चाताप झाला.
(219)पाया पडणे :- सर्वानी रोज संध्याकाळी हातपाय धुऊन देवाच्या पाया पाडाव्यात.
(220)पाय ओढणे :- पुढे जाणाऱ्या व्यक्तीचे कुणीही पाय ओढू नयेत.
(221)पायाशी बसणे :- आम्ही गावी गेलो की, आमच्या आजोबांच्या पायाशी बसतो.
(222)पार पडणे :- शेवटी राधाच्या लग्नाचा कार्यक्रम सुरळीतपणे पार पडला.
(223)पोट भरणे :-सदू दिवसरात्र आपल्या बैलगाडीवर कष्ट करून आपले पोट भरतो.
(224)पोटाला चिमटा घेणे :-पोटाला चिमटा घेऊन सदाशिवने आपल्या नंदुला उच्च शिक्षण दिले.
(225)पोशिंदा असणे :- शेतकरी साऱ्या जगाचा पोशिंदा आहे.
(226)प्रत्युत्तर देणे :- सरांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला राजू प्रत्युत्तर देत होता.
(227)प्रसंग बेतणे :-पाऊस न आल्यामुळे शेतकऱ्यांवर दुष्काळाचा प्रसंग बेतला.
(228)प्रविष्ट होणे :- काही लोक आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रविष्ट होतात.
(229)प्राणाचे बलिदान करणे :- भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाचे बलिदान केले.
(230)पाय धरणे :- हातून घडलेल्या चुकीबद्दल तुकारामने सावकारांचे पाय धरले.
(231)प्रेमाचा भुकेला असणे :- लहान मुले प्रेमाची भुकेली असतात.
(232)फावला वेळ मिळणे :-फावल्या वेळात रमेश वर्तमानपत्र वाटून आपला शाळेचा खर्च भागवतो.
(233)फिर्याद करणे :-जमिनीच्या वादावरून सखारामने आपल्या शेजाऱ्याविरुद्ध फिर्याद केली.
(234)बहुमान मिळणे :-क्रिकेटच्या सामन्यात १०० धावा पूर्ण केल्यामुळे सचिनला मॅन ऑफ द मॅचचा बहुमान मिळाला.
(235)बडगा दाखवणे :- चोरांनी गुन्हा कबूल करावा म्हणून पोलिसांनी त्यांना कडक शिक्षेचा बडगा दाखवला.
(236)बाजूस सारणे :- राधाने टेबलावरचे दप्तर बाजूला सारले.
(237)बारा महिने तेरा काळ :- तुकारामची देवपूजा अगदी बारा महिने तेरा काळ सुरूच असते.
(238)बाजार भरणे :- सुट्ट्यामध्ये गावात खेळण्यासाठी मुलांचा बाजार भरतो.
(239)बालेकिल्ला असणे :- मुंबई शहर हे उमेदवार देशमुखांचा बालेकिल्ला होता.
(240)बावचळणे :- अचानक समोरून आलेल्या हत्तीला पाहून रमेश बावचळला.
(241)बुचकळ्यात पडणे :- अर्थ:- गोंधळून जाणे. झोपेतून उठलेल्या बाळाला आपण नवीन घरी आहोत हे समजताच ते बुचकाळ्यात पडले.
(242)बेभान होणे :- आपल्या मित्राच्या लग्नात सदाशिव बेभान होऊन नाचला.
(243)भाळी असणे :- दिवसभर मोलमजूरी करून पोट भरणे हेच आमच्या कुटुंबाच्या भाळी होते.
(244)भांबावून जाणे :- दिवाळीच्या दिवशी अचानक मोठमोठ्या फटाक्यांचा आवाज ऐकून रवी भांबावून गेला.
(245) भांबावून जाणे. अर्थ :- गोंधळून जाणे.
वाक्य :- गावातील माणसे जेव्हा पहिल्यांदा शहरात येतात, तेव्हा शहरातील गर्दी पाहून ते भांबावून जातात.
(246) भीतीने थरथरणे :-गणेशचे गणित चुकल्यामुळे सर त्याच्यावर रागावले, परंतु शाळा सुटल्यावरही तो भीतीने थरथरत होता.
(247) भुकेने तडफडणे :-आजारी असलेला सिंह चार दिवसापासून उपाशी असल्यामुळे भुकेने तडफडत होता.
(248) भुलून जाणे :- पेंटरने काढलेले ते सुंदर चित्र पाहून सर्व मुले भुलून गेली.
(249) भेदरणे :- अपघातात खूप मार लागल्यामुळे सदू खूप भेदरला होता.
(250) मन रमणे :- शंकरचे मन फक्त अभ्यासात रमते.
(251) मर्जी राखणे. अर्थ :- खूश ठेवणे.
वाक्य:-काही राजकीय नेते निवडणूक जवळ आल्यावर जनतेची मर्जी राखायला सुरू करतात.
(252) मनाई असणे :-काही ठिकाणी वाहनांना थांबण्यास मनाई असते.
(253) मशागत करणे :- शेतात चांगले पीक यावे यासाठी शेतकरी वर्षभर शेतात मशागत करतात.
(254) मस्तक आदराने लवणे :- आजही आमच्या शाळेतील शिक्षक दिसले की,आमचे मस्तक आदराने लवते.
(255) माघार घेणे :- आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी कोंबडीने रौद्ररूप धारण केलेले पाहून सापाने माघार घेतली.
(256) मान डोलवणे:- वर्गातील काही मुले सरांनी शिकवलेला भाग समजला नाही तरी मान डोलवतात.
(257) मातीजमा होणे :- बर्ड फ्लू मुळे अनेक पक्षी मातीजमा झाले.
(258) मान खाली घालणे :- खोडी करणाऱ्या रामला सरांनी उभे करून जाब विचारला तेव्हा रामने मान खाली घातली.
(259) मान देणे :- आमच्या गावातील सारपंचांना लोक खूप मान देतात.
(260) मान हलवणे :- सरांनी शाळेची सहल काढायची का ? असे विचारताच सर्वांनी मान हलवली.
(261) मुक्त करणे :- झाडाच्या फांदीत शिंगे अडकलेल्या काळविटाला वन अधिकाऱ्यांनी मुक्त केले.
(262) मृत्यू पावणे :- साप चावल्याने कुत्र्याचे पिल्लू मृत्यू पावले.
(263) मोह होणे :- सुनीलची नवीन पेन्सिल पाहून अनिलला ती चोरण्याचा मोह झाला.
(264) मौन पाळणे :- गुंडांनी भर दिवसा गावातील एका माणसाला मारले तरी गावातील सर्व लोकांनी तोंडातून ब्र न काढता मौन पाळले होते.
(265) याचना करणे :- चोराने पोलिसांकडे आपल्याला सोडण्यासाठी याचना केली.
(266) येरझारा घालणे :- रात्री उशिरापर्यंत गणेश घरी परतला नाही, म्हणून त्याची आई अंगणातच येरझारा घालत होती.
(267) रक्त उसळणे :- शत्रूवर हल्ला करण्यासाठी सैनिकांचे रक्त उसळले.
(268) रक्ताचे पाणी करणे. अर्थ :- खूप कष्ट करणे.
वाक्य:- राजुला खूप शिकवण्यासाठी त्याच्या वडिलांनी रक्ताचे पाणी केले.
(269) रद्द करणे :- कोरोना विषाणूच्या संक्रमनामुळे या वर्षी परीक्षा रद्द केली गेली .
(270) रमून जाणे :- नवीन ठिकाणी गेल्यावरही गणेश लगेच रमून जातो.
(271) रवंथ करणे :- शेतातून घरी आल्यावर गाईगुरे रवंथ करत बसतात.
(272) रात्रीचा दिवस करणे. अर्थ :- खूप कष्ट करणे.
वाक्य:-शंकरने रात्रीचा दिवस करून परीक्षेत चांगले यश मिळवले.
(273) रंगात येणे :- दुपारी मुलांचा गोटयांचा डाव रंगात आला होता.
(274) राग येणे :- सदूने आपला शर्ट फाडला म्हणून रामला त्याचा खूप राग आला.
(275) राजी असणे :- पोहायला जायचे म्हणताच सर्व मुले लगेच राजी झाली.
(276) राब राब राबणे :- सदाशिवचे वडील शेतात दिवसभर राब राब राबतात .
(277) रुसून बसणे :- दीपाने आपले खेळणे तोडले म्हणून छोटा गणू रुसून बसला.
(278) लगबग असणे :- घरी पाहुणे येणार असल्याने दिनेशच्या घरात दिवसभर लगबग होती.
(279) लुप्त होणे :- आकाशात दाटून आलेल्या ढगांमुळे सूर्य लुप्त झाला.
(280) लौकिक मिळवणे :- सचिन तेंडुलकरने क्रिकेट खेळून जगात लौकिक मिळवला.
(281) वचन देणे :- यापुढे मी कधीही वाईट काम करणार नाही , असे सूरजने आईला वचन दिले.
(282) वर्गवारी करणे :- कब्बड्डीच्या खेळासाठी सरांनी वयोगटाप्रमाणे मुलांची वर्गवारी केली.
(283) वाटेकडे कान लावून बसणे :- बाबा आज बाजारातून आपल्यासाठी नवीन पुस्तके आणणार म्हणून मुळे वाटेकडे कान लावून बसली होती.
(284) वाईट वाटणे :- राजुचा अपघात झाला हे ऐकून रमेशला खूप वाईट वाटले.
(285) विचारपूस करणे :-आमचे सर वर्गात नेहमी कोणताही घटक समजला का नाही याची विचारपूस करतात.
(286) विचारविनिमय करणे :- राजूला बारावीनंतर कोठे शिकण्यास पाठवायचे याबद्दल त्याच्या आईवडिलांनी विचारविनिमय केला.
(287) विसर पडणे :- आमच्या मित्रांचे कितीही भांडण झाले तरी आम्हांला त्याचा विसर पडतो.
(288) विळखा घालणे :- सापाने कुत्र्याच्या पिल्लाला विळखा घातला.
(289) विश्रांती घेणे :- तुकाराम शेतात काम केल्यानंतर दुपारी विश्रांती घेतो.
(290) वेष पालटून फिरणे :- पूर्वीचे राजे लोकांचे सुखदुःख जाणून घेण्यासाठी आपल्या राज्यातून वेष पालटून फिरायचे.
(291) शब्द देणे :- आपण यापुढे कधीही खोडी करणार नाही असा रामने आईला शब्द दिला.
(292) शब्द मोडणे :- पुन्हा खोटे बोलणार नाही, असे सांगूनही रामेशने आज गुरुजींना दिलेला शब्द मोडला.
(293) शरमिंदा होणे :- सवकारांकडे पुन्हा पैसे मागताना सदू शरमिंदा झाला.
(294) शान वाढवणे :- बारावीच्या परीक्षेत राज्यात पहिला येवून गणेशने आपल्या शाळेची शान वाढवली.
(295) शिकवण देणे :- संतांनी लोकांना चांगली शिकवण दिली.
(296) शिगेला पोहोचणे :- रंगात आलेला क्रिकेटचा सामना पाहताना उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली.
(297) शीण येणे :- दिवसभर शेतात काम करून सखारामला शीण आला.
(298) सक्रिय सहभाग घेणे :- गावातील सप्त्यासाठी वर्गणी गोळा करण्यासाठी गावातील लोकांनी सक्रिय सहभाग घेतला.
(299) सढळ हाताने मदत करणे :- मंदिराचे बांधकाम करण्यासाठी लोकांनी सढळ हातानी मदत केली .
(300) सन्मान करणे :- दहावीच्या परीक्षेत राजू पहिला आल्याने मुख्याध्यापकांनी त्याचा सन्मान केला.
(301) सल्ला देणे :- आमच्या सरांनी मला नवोदयच्या परीक्षेला बसण्याचा सल्ला दिला.
Comments
Post a Comment