*यात्रा माझ्या गावची*
शिवश्री लक्ष्मण काटेकर.
*7588020886*
कृपया लेख मोठा आहे, पण संपूर्ण वाचावा व आहे असा इतराना शेअर करावा.
किती छान शब्द वाटतात, की ‘यात्रा माझ्या गावची’ असे ऐकताना. ह्या शब्दात आपुलकी, गोडवा, मैत्री, अभिमान, कौतुक आणि आपल्या गावाची शान वाटते. प्रत्येक गावाची अशी एक वार्षिक यात्रा भरते. ज्या दिवशी गावाच्या रीतिरिवाज परंपरा जपल्या जातात. भले कितीही मोठे, श्रीमंत किंवा गावातील महान बनले तरी यात्रा ही यात्रा महोत्सव सारखी साजरी करण्यात वेगळेपण न आणता परंपरा जपली जाते ह्याचेच उदाहरण म्हणजे “यात्रा माझ्या गावची.”
होय, असेच आहे शान-अभिमान वाटावं अस माझं गावं. करमाळा तालुक्यातील आणि सोलापूर-नगर रोडवरील ‘देवळाली’ माझं गावं. गाव तस मोठं साधारण 8 वस्त्या आणि 2 खेडी एकत्र मिळून राहणार. गावाच ‘देवळाली’ नाव ऐकूनच वाटत की गावात देव जास्त आहेत की काय? तर नक्कीच होय असं उत्तर द्यावे लागेल.
गावाची स्थापना सांगता येणार नाही, तसेच पुरातन इतिहास कमी लाभलेलं पण चालू इतिहास घडवण्यात अग्रेसर असलेलं गाव म्हणलं तर उत्तम शोभेल असं देवळाली गाव. पूर्वी गावाचा अभिमान म्हणजे गावातील देऊळ असायचं, कारण त्या काळी देवळात शाळा भरत, समाज प्रबोधन करण्याचे ठिकाण देऊळ असायचं, परगावच्या लोकांना मुक्कामाचे ठिकाण गावचे देऊळ असायचं, आणि घरात सांभाळत नसलेल्याना आश्रय गावातील देऊळ द्यायचं. पण जग बदललं साधारण काही शतकानंतर देवळाची जागा एका इमारतीने घेतली तिला ‘समाजमंदिर’ म्हणून ओळखले जाऊ लागले. वरील सर्व सोयीसाठी समाजमंदिर उपयोगी पडत होत. आणि काही काळाने शिक्षणासाठी समाज मंदिर मध्ये अडचणी येऊ लागल्याने शाळासाठी स्वतंत्र इमारती बांधण्यात आल्या आणि गावाची शान, गावाचा विकास करण्याचे माध्यम, गावाचं विकास करण्याचे स्वप्न पाहण्याचे व सत्यात उतरवण्यासाठी शाळांकडे पाहिलं जाऊ लागलं.
हे संगण्यामागे हेतू हा की ‘गावात देव’ असणं म्हणजे गावाला शोभा येते, त्यासाठी गावात देऊळ असावं लागतं आणि ती शोभा करोडो रुपये खर्चून कितीही मोठे घर बांधले आणि त्यात देऊळ बांधले तरी गावाच्या देवळासारखी शोभा कधीही येत नाही. थोडक्यात सोनं ते सोनंच असतं तिथं त्याची जागा कोणीही घेऊ शकत नाही.
असो चला आपण यात्रा माझ्या गावची ह्या विषयी आज पाहणार आहोत. गाव देवळाली, गावात साधारण एकोणविसाव्या शतकात ग्रामदैवत म्हणून श्री. नागनाथ महाराज देवस्थान स्वयंभू निर्माण झाल्याचे सांगतात, तसेच गावात विठलं मंदिर आहे, मंदिरात विठलं रुक्मिणीची मूर्ती आहे तिथे कीर्तन, भजन व्याख्यान सारखे कार्यक्रम होत असतात. पंढरपुर कडून आषाढी यात्रेला एकनाथ महाराजांची पालखी परतीच्या वाटेवर असताना एक दिवस गावात येते आणि गावातून सर्व वारकरी यांना सर्व गावकरी भाजी भाकरी जमा करून जेवण देतात आणि मग उभा राहतो ‘सप्ताह’, मग आठ दिवस कीर्तन काही कुटुंबाकडे जेवण आणि सप्ताह संपतो हे विठलं मंदिरात चालणारा पण मोजक्या लोकांचा सहभाग असणारा उत्सव होय. तसेच वेशीच्या बाहेर हनुमान मंदिर आहे. जे अगोदर उघड्यावर होते परंतु नंतर मंदिर करण्यात आले आहे. मंदिरात मूर्ती साडेपाच फुटाची मागील अर्धी बाजू दगडात बंद असून समोरील अर्धी बाजू घडवून हुबेहूब दिसणारी मूर्ती, इथेही एक दिवस हनुमान जयंती मोजक्या लोकांच्या सहकार्यातून साजरी होते. तसेच वेशीच्या समोर मरिआई जिथे पूर्वी कोंबड बकरे बळी दिले जात असत पण ती प्रथा आता जवळपास संपली, आणि पूजा अर्चा होते, तसेच शेजारी महादेव मूर्ती उघड्यावर होत्या. त्यादेखील स्वयंभू असल्याचे बोलतात, काही खोदकामात सापडल्याचे समजते. काही मूर्ती सुबक असून काही मूर्तींचा थोडा फार भाग फुटल्याचे दिसते.
गावाचे ग्राम दैवत म्हणून गावाने श्री नागनाथ महाराज समजल्याने श्री नागनाथ महाराज यांची यात्रा संपूर्ण गाव साजरी करीत आहे. हीच यात्रा माझ्या गावची जाणून घेणार आहोत.
श्री नागनाथ महाराजांची दोन पिंड असलेली मूर्ती व नागनाथाची उभी मूर्ती असलेल्या साधारण दोन ते तीन शिळा समोरील सुबक आकाराचे व मागील बाजूस बंद शिळा अशी मूर्ती एका चौथऱ्यावर होत्या. त्याची रोज गुरव व इतर काही लोक घरातून पाणी घेऊन जात मूर्तीवर जलाभिषेक करत व गुलाल लावला जात असे. कालांतराने गाव विकासात मंदिर उभारण्याचे ठरले. मूर्ती हालवून थोड्या समोरील बाजूस ठेवण्यात आल्या. चौथरा उकरण्यात येऊ लागला आणि अंधश्रद्धा की सत्य पण त्या ठिकाणी नागांचा वावरताना आढळून आले ही घटना साधरण 1990 च्या दशकातील आहे. असाच तो चौथरा उकरून एक भक्कम असा दगडी बांधकाम साठी 12*12 चा मंदिरासाठी पाया रचण्यात आला. गाव सहकार्यातून विधिवत त्या मूर्ती त्या मंदिर कट्ट्यावर स्थापना करण्यात आल्या. आणि पुढे शासन व गाव यांनी मिळून दगडी 15 फूट उंचीची भिंती उभ्या केल्या व 2010 च्या दशकात त्या भिंतीवर 30 ते 40 फुटाचे शिखर बांधकाम पूर्ण झाले आणि आता समाज, शासन आणि देणगीदार यांच्या सहकार्याने सभामंडप उभारणीचे काम चालू आहे, आपण देखील ह्यासाठी सहकार्य करावे ही विनंती.
ह्याच श्री नागनाथ महाराजांची ग्राम दैवत म्हणून यात्रा म्हणजे गावाचे वैभवशाली समाज प्रबोधन, सामाजिक एकता, जातीभेद विसरून धर्माच्या पलीकडे जगाचा इतिहास जपणारी परंपरां विकसित करणारे उदाहरण म्हणून आवर्जून नोंद होणारी यात्रा माझ्या गावची भरती.
वैशाख महिन्याची सुरुवात होत असताना तिसऱ्या दिवशी म्हणजे तृतीयेला ‘अक्षय तृतीया’ म्हणून ओळखले जाते, याच दिवशी ही माझ्या गावची यात्रा भरते. ह्या दिवशी कोण कोणाला बोलवत नाही, पण गावातील परगावी शिक्षण, नोकरी उपजीविकेसाठी गेलेले सर्व जण गरीब, श्रीमंत सर्वजण गावी येतात. आपले सर्व जुने नवे नातेवाईक येतात, ज्यांचे नाते माणुसकी पलीकडचे आहे यात्रे बाबत ऐकून आहेत ते देखील दरवर्षी आपली उपस्थिती आवर्जून लावतात. आणि यात्रेचा आनंद डोळ्यात भरून वर्षभर सुखी राहण्याचे ठरवतात.
गावातील काही लोकांची पंच कमिटी नेमली जाते व त्यांच्या कडून गावातून प्रत्येक कुटुंबाकडून वर्गणी गोळा करून यात्रातील खर्च करण्याचे नियोजन व कार्यवाही केली जाते.
चैत्र महिन्याची सुरुवात होताच श्री. ढेरे ह्यांना देव मानल्याने ते श्री नागनाथ महाराजांची रोज सकाळी ओल्या कपड्यावर म्हणजे अंघोळ नंतर कोणालाही स्पर्श न करता पूजा करतात. तसेच ढेरे हे अक्षय तृतीयेपर्यंत पायात कोणतेही पादत्राण न घालता अनवाणी दिवसभर शेतातील कामे असल्या भर उन्हात करत असतात, शिवाय महिनाभर उपवास धरला जातो. आता असे उपवास करणारी मंडळीची संख्या वाढली आहे, परंतु मान ढेरे यांनाच दिला जातो. हा मान काय आहे हे आपण पुढे पाहणारच आहोत, पण तो मागून, भांडून मिळत नाही तर तो परंपरेने ढेरे यांच्याकडेच गाव संमतीने व देव आशीर्वादाने दिलेल्याचे वयोवृद्ध लोक सांगतात आता जे ढेरे आहेत त्यांच्या आजोबांनी हा जपला तो वडिलांनी आणि आता हे ढेरे जपत आहेत, परंतु ह्याला प्रतिष्ठेचा डाग लागत आणि मानाचा वाटल्याने, तो आता अंबादास ढेरे यांनी मागून मिळाला नाही म्हणून अशीच यात्रा ढेरे वस्ती येथे भरवली जाते ती देखील पुढील वर्णनाप्रमाणे.
श्री ढेरे तसेच गावकरी आपल्या घरापासून वस्त्यावरून देखील अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करून ओल्या कपड्यावर, पादत्राण शिवाय अनवाणी पायांनी पाणी कलश, गुलाल व उदबत्ती घेऊन श्री नागनाथ महाराज यांची पूजा करण्यास येतात. मी देखील 1990 च्या काळात हात चड्डीवर अंगात बनियन शर्ट न घालता सकाळची पूजा करण्यास जात होतो, त्या नंतर शेजारील महादेव व हनुमान या देवाची देखील थोडे थोडे पाणी घालून गुलाल उदबत्ती वाहून पूजा केली जात. तसेच बेलाची पाने वाहिली जात असे. अशीच पूजा दर सोमवारी केली जाते. पूजेचा अधिकार गुरव कुटूंबाला दिलेला आहे.
सकाळी 8 ते 10 पर्यंत गावातील महिला पुरुष लोक बोलल्या नवस, किंवा श्रद्धा देवाची सेवा समजुन वाजत गाजत घरापासून मंदिरा पर्यंत दंडवत घालत जात असतात. दंडवत म्हणजे पाच पावलावर खाली झोपून डोक्याच्या केसांपासून ते पायाच्या अंगठ्यापर्यंतचा भाग जमिनीला टेकवणे. ही प्रथा साधारण 1995 नंतर बंद पडत चालल्याचे जाणवते, असे दंडवत माझ्या आईने घातल्याचे आठवते परंतु आता सुशिक्षित मंडळी वरील दोन्ही पद्धतीला फाटा देत असल्याचे जाणवते. सोबत गूळ पेढे असा प्रसाद सर्वाना वाटला जात असे.
त्यानंतर महिला मंडळी घरी पुरणपोळीचा नैवद्य तयार करतात व जेवणासाठी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला जातो, ‘अक्षय तृतीया’ हा दिवस साडेतीन मुहूर्ता पैकी एक मुहूर्त असल्याने त्यादिवशी सणाची धुमधाम दिसून येते. घरात सर्वजण नवीन कपडे खरेदी करतात, तत्पूर्वी महिला वर्ग घराची सारवण सुरवन करून ठेवतात आकर्षक रांगोळीने घराची दारे सजलेली असतात. स्वयंपाक होताच घरातील देव शेतातील देव म्हसोबा, मुंजोबा या देवांची पूजा होते.
याच दिवशी पितृ जेवण म्हणजे पूर्वज यांच्या नावे जेवण घातले जाते, प्रतील म्हणून एक नातेवाईक यांना जेवायला बोलावले जाते त्यांची पूजा करून गोडधोड जेवणाचा कार्यक्रम होतो. घरातील सर्वजण, आलेले नातेवाईक जेवणाचा यथोचित स्वाद घेतात. इकडच्या तिकडच्या गप्पा मारत, दुपारची विश्रांती घेतात, आम्ही पूर्वी विहिरीवर पोहायला जायचो, पण आता विहिरी ओस पडल्या, पाणीच राहील नाही, तिथं पोहणे संपल्याचे समजावे लागेल.
दुपारी 4 ची वेळ सगळेजण आवराआवरी करू लागतात, फ्रेश होऊन नवीन कपडे घालून वाडी वस्तीवरील सर्व जणांची पावले गावाच्या दिशेने निघतात. कारण मुख्य कार्यक्रमाची ओढ लागलेली असते, नवीन कपड्यात जातपात धर्म पंथ विसरून सर्वजण नटलेले दिसून येतात. चालत असताना भेट होते आपुलकीने ‘कधी आलात ?’ हा प्रश्न प्रत्येक जण प्रत्येकाला विचारतो, कसं आहे ?, बरं आहे का? अशा चर्चेत गावाच्या जवळ सगळे पोहोचतात. स्टँड वर पुरुष मंडळी जमून थांबतात तर महिला मंडळी गावात शिरतात.
आणि श्री नागनाथ महाराज यांच्या मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतात, मंदिराला 5 किंवा 7 नारळाचे तोरण बांधतात देवाला नारळ फोडतात व आपली जागा धरण्यासाठी मुख्य ठिकाणाकडे जातात.
सायंकाळी 6 वाजता श्री ढेरे हे बादाळे वस्ती येथून चालत स्टँड कडे येतात. ह्यावेळी वस्तीवरील व गावकरी मंडळी सोबत असतात. श्री ढेरे देव स्टँड वर येताच गावाच्या वतीने तोफांची सलामी दिली जाते. गावातील प्रत्येकाला समजते की देव जवळ येत आहेत. आणि गावातील पंच कमिटी सोबत गावकरी सह श्री ढेरे देव वाजत गाजत श्री नागनाथ महाराजांच्या देवळात येतात.
त्यावेळी जुनी वाद्य,भोंगा, हलगी ताशा वाजवला जात असतो. निनाद खूप मोठा असतो. आणि मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होते, माहीत नाही अंधश्रद्धा की श्रद्धा पण घडत असते ते वर्णन करत आहे, हे माझे मत नसून जे दिसत ते लेखन करत आहे. त्याचवेळी श्री ढेरे यांच्या अंगात श्री नागनाथ देव येतो आणि वाजंत्री जोर जोरात वाजवू लागतात, काही लोक गोमूत्र शिंपडू लागतात. तर काही जण भात फेकतात, काहीजण जोरात आरोळी देतात,”नागनाथ महाराज की जय”,”नागनाथ खिद्रीबाळाचं चांगभलं” अशा घोषणा होत आणखी आता 4 ते 5 जणांच्या अंगात येऊ लागले आहे. ह्या अंगात आलेल्या लोकांना काही मानाचे लोक पकडून धरतात आणि वाजत गाजत वेशीतून ज्या मार्गे गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होणार असतो त्या मार्गाने हे सगळे मान्यवरांच्या सह चालायला लागतात. यावेळी रस्ता दुतर्फा भरगच्च झालेला असतो. कारण अगोदरच मंडळींनी रस्त्याच्या कडेला शेजारील घरावर, मिळेल तिथे उभे राहायला मिळाले तर बस एवढी जागा पकडलेली असते उद्देश फक्त 5 मिनिटांचा कार्यक्रम डोळ्यात साठवण्यासाठी गच्च असं उभा राहतात. साधारण 30 ते 40 हजार लोकांची उपस्थिती असते गावचे, शेजारील गावे, आसपासचे, नातेवाईक, तालुक्यातील, काही जिल्हे किंवा राज्याबाहेरील देखील आपली उपस्थिती आवर्जून नोंदवतात. हे श्री ढेरे देवाबरोबरील मंडळी वाजत गाजत ह्या साधारण खेड्यातील 10 फुटाच्या रस्त्या असताना 6 फुटाच्या जागेत गाड्या एकमेकींना बांधून तयार असतात तिथे जातात.
गाड्या म्हणजे 12 बैल गाड्या सकाळ पासून गावकऱ्यांनी जमवलेल्या असतात. त्या बैलाशिवाय एकमेकींना मोठ्या दोरने बांधल्या जातात. त्याची पूजा देखील सकाळ पासून केली जात असते. आता बैलगाड्या कमी झाल्याने गावकऱ्यांनी फक्त यात्रेसाठी नवीनच लोखंडी साहित्याच्या गाड्या बनवून गावची परंपरा जपण्याचा मान मिळवला आहे.
अशा ह्या बैलगाड्यात मिळेल तिथे दांड्यावर, जुवर, हौदात असे कुठेही लोक अगोदरच उभे राहिलेले असतात, सगळ्या 12 बैलगाड्या तुडुंब भरलेल्या असतात, मी 2 वर्ष उभरलो होतो पण नंतर नाही उभारत कारण बघण्याचा आनंद मिळत नाही. अशा तयार गाड्या जवळ सागरी ढेरे देव येताच गाड्याला गुलाल टाकून पूजल जात आणि गाड्या ओढण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात होते.
श्री ढेरे ह्यांच्या डोक्याच्या शेंडीला पहिल्या गाडीचे दांडीचा भाग बांधला जातो फक्त त्या इकडे तिकडे सरकू नये म्हणून मनाचे 5 जण दांड्या व जु पकडतात, आणि जोरात घोषणा होतात. जय जयकार होतो- “नागनाथ महाराज की जय, नागनाथ खिद्री बाळाचं चांग भलं ” अशी घोषणा देत गुरव कुटुंब मधील एक जण नागनाथ मूर्ती असलेले ताटात व कापुराची आरती पेटवून ते ताट हातात घेऊन पहिल्या गाडीत सर्वात पुढे थांबतो आणि श्री ढेरे एकटे डोक्याच्या केसांच्या शेंडीने त्या सगळ्या 12 बैलगाड्या, माणसाने भरगच्च भरलेल्या अशा 12 बैलगाड्या गावातील रस्त्याने लोकांच्या गर्दी असताना घरांची दाटी असताना, छोटे मोठे वळण पार करत न थांबता न थकता कोणतीही अडथळा न येता साधारण 750 मीटर अंतर पार करतात आणि वेशीवर नेऊन पहिली गाडीची दांडी ठेवली जाते व गाड्या ओढण्याचा हा विधी पाहण्याचे स्वप्न सर्व लोकांची ह्याची डोळे ह्याची देही ह्याची क्ष्मी पूर्ण झाल्याचे आनंद मनात घेऊन घराकडे निघतात. तो पर्यंत गाड्या ओढण्यानंतर श्री ढेरे व इतर सर्वजण श्री नागनाथ महाराज देवळासमोर येतात व अंगात आलेले देव घोषणा देत संपवतात, त्या देवांना मानाचा आहेर देत सन्मानित केले जाते. ह्यावेळी आजपर्यंत सूत्र संचलन श्री कल्याण गायकवाड करत होते परंतु ह्यावर्षी त्यांच्या देव आज्ञे नंतर आता श्री राजेंद्र घळके यांनी केले व यात्रा वर्गणी व यात्रा सुख शांततेत पार पाडण्याचे आवाहन गावकऱ्याना केलं जातं, यात्रेतील मुख्य एक विधी असा यशस्वी होतो.
ह्याच यात्रेत चमू गोपाळ, महिला मंडळी साठी साहित्य विक्रेते, खेळणे विक्री, झोपाळा घेऊन येत असत, खाऊची दुकाने, कुल्फी, बर्फाचा गोळा, भेळ अशा खाऊ सोबतच रेवडी शेव विकणारे देखील विक्रेते येत असतात. आज पर्यंत ते जमिनीवर बसून विकत असत परंतु ह्या वर्षी त्यांनी देखील विक्रीचा नमुना बदलवत एक कट्टा बनवून जमिनीवर 2 फुटावर दुकान मांडल्याचे दिसून आले. लहान मुले ह्या वस्तू खेळणे खाऊ खरेदीत वेगळाच आनंद मानतात, आम्ही देखील असे साहित्य लहानपणी खरेदी करत असू, फरक एवढाच त्यावेळची खेळणी बदलली आणि आताची खेळणी आधुनिक आली.
सर्वजण आपापल्या घरी जाऊन गूळ, पेढे एका ताटात घेऊन शेरणी वाटायला आणतात सर्वाना वाटत आपुलकी निर्माण करतात. आणि पुन्हा घरी एकत्र जेवणावळ होते व थोडी विश्रांती घेतली जाते कारण रात्री यात्रेतील दुसरा मुख्य भाग पाहण्यासाठी जागरण होणार असते.
रात्रीचे 12 वाजता श्री नागनाथ मंदिर पासून यात्रेतील दुसरा टप्पा सुरू होतो “छबिना”
“छबिना” म्हणजे साडेतीन बाय चार फुटांचे नंदी व पालखी रात्रभर वाजत गाजत गावातून मिळवण्याचा कार्यक्रम सुरू होतो. पूर्वी ह्या पालखी समोर हालगी,भोंगा, पिपाणी, तुतारी, ढोल ताशे लेझीम, अशी वाद्ये वाजवली जात असत परंतु काळ बदलत, बँड पथक आले आता DJ आले, परंतु जुनी माणसे हालगी, पिपाणी वाद्य अजून देखील वाजवत असतात.
ह्यावेळी तोफांच्या सलामी दिल्या जातात, तसेच मिरवणुकीत लोकांचा विचार होऊन दूरवर अशी फटाके फोडले जातात. असे एक नंदी असताना आणखी एक नंदी भेट दिल्याने आता दोन नंदीची मिरवणूक निघते. सर्व जण ह्या मिरवणुकीत दुःख संकट विसरून नाचतो, आनंद घेतो. गुलालाची उधळण केली जाते, तसेच ह्या नंदीला व पालखीला एकदा उचलले की खाली टेकवले जाते नाही. एका नंदीला चार जण उचलून धरत असतात अशा वेळी पालखी व नंदीला खांदा देण्यात भाग्य मानले जात असल्याने 5 पावले प्रत्येकजण खांदा देत असतो असेच मी देखील खांदा देत असतो. ह्यावेळी नंदीला 5 किंवा 7 नारळ किंवा नोटांची माळ नंदीच्या गळ्यात वर चढून घातली जाते, ह्यासाठी वर चढता आले पाहिजे व गळ्यात हार जास्त होताच नियोजन मंडळी नारळ काढून पोत्यात भरून मंदिरात नेऊन ठेवतात.अशी मिरवणूक गावातून जात असताना काही कुटुंबे घरासमोर मिरवणूक येता पालखी व नंदीची पूजा करतात व दर्शन घेतात. ही मिरवणूक साधारण 5 वाजेपर्यंत चालते व नंदिसह पालखी पुन्हा श्री नागनाथ मंदिर समोर येते व आरती करून सूर्योदय होण्यापूर्वी मिरवणूक संपते हा यात्रेतील दुसरा टप्पा संपतो.
दुसऱ्या दिवशी सकाळी यात्रा कमिटीच्या वतीने सवाल जवाब हालगी तुरा कार्यक्रम सादरीकरण होते. बाहेरील गावच्या लोकांची करमणूक साधारण 3 तास ही मंडळी कथा प्रबोधन समाज हित सांगून करत असतात.
यात्रेतील शेवटचा भाग म्हणजे कुस्त्या, पूर्वी प्रत्येक गावात तालीम होती मुलं काम करत शाळा शिकत व्यायाम करी आणि काहीजण कुस्ती खेळत असत, त्यांना एक हक्काचं व्यासपीठ म्हणजे गावची यात्रा असते, त्या नुसार दुसऱ्या दिवशी दुपारी 3 च्या दरम्यान पंच मंडळी व कुस्ती रसिक एका आखलेल्या आखाड्यात लहान पासून मोठ्या कुस्त्या भरवल्या जात. त्यांना रोख रक्कम बक्षीस म्हणून दिल जाते व त्यांचे कौतुक केले जात असे, अशा कौतुकाची थाप पाठीवर मिळवायला वर्षभर तालीम गाजवावी लागे, मी व्यायाम केला पण कुस्ती नाही कधीच खेळलो. शेवटी मोठ्या कुस्त्या होत आणि कधी कधी निकाली न निघता सोडवल्या जात व सर्वाना समाधानी ठेवत बक्षीस विभागून दिल जात असे, असे कुस्त्या अंधार पडताच संपवल्या जात असत असा तिसरा टप्प्यात यात्रेचा शेवट होत असे.
अशा “यात्रा माझ्या गावची” म्हणून घडत असताना जुनी नाती, मित्रमंडळी, नातेवाईक, शेजारी पाजारी, गाववाले, सगेसोयरे, सगळे एकमेकांना भेटत असतात, जुन्या आठवणी नव्या दिशा ठरवल्या जात असतात. म्हणून यात्रा अजून टिकवल्या पाहिजेत. जपल्या पाहिजेत. कितीही मोठा श्रीमंती झालात तरी गावाची नाळ जपली पाहिजे, जगाच्या इतिहासात काही पाने आपल्या गावाची म्हणूम नोंदवलीच पाहिजेत. अशीच आपली गावची माहिती इतरांना देखील समजली पाहिजे. व गावाची ओळख जगाच्या इतिहासात दाखवली पाहिजेत, व गाव करील ते राव काय करील हे जाणले पाहिजे.
अशी आहे “यात्रा माझ्या गावची” आपणास नक्कीच आवडली असेल, तर इतरांना आहे अशी शेअर करा. व तुमच्या गावाची यात्रा वर्णन करण्याची संधी नक्की आपण द्यावी ही विनंती. जे दिसत होतं ते लिहिलं काही अपशब्द, चुकीचे शब्द आले असल्यास क्षमस्व केवळ यात्रा इतरांना समजावी म्हणून लेखन केले आहे.
धन्यवाद!!!…..
शिवश्री लक्ष्मण काटेकर,
शिवनिती
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Comments
Post a Comment