🚩 शिवनीती 🚩
महाराणी स्वराज्यलक्ष्मी सईबाई भोसले
__________★★भाग 11★★_________
महाराणी, स्वराज्यलक्ष्मी सईबाई भोसले
या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री होत्या.
महाराणी सईबाई यांचा जन्म फलटणच्या निंबाळकर घराण्यात दि. २९ ऑक्टोबर १६३६ रोजी फलटण, महाराष्ट्र येथे झाला होता. त्यांचे वडील मुधोजीराजे निंबाळकर हे होते तर त्यांच्या मातोश्री रेऊबाई निंबाळकर ह्या होत्या. महाराणी सईबाईं या फलटणच्या निंबाळकर घराण्यातील माधोजीराव नाईक निंबाळकर यांच्या कन्या आहेत. तर निंबाळकर हे तंजावरच्या पवार कुळातील राजघराणे आहे. महाराणी सईबाई यांना तलवार बाजीची खूप आवड होती.
त्या फलटणच्या राजघराण्यातील असल्याने त्यांनी घरातूनच लहानपणीच तलवारबाजी, घोडेस्वारी लढाया ह्या गोष्टींत पारंगत झाल्या होत्या, शिकल्या होत्या.
महाराणी सईबाई ह्या बालपणी दिसायला सुंदर, उभा चेहरा, आकर्षक रंग, करारीबाणा, सौंदर्याची देणगी त्यांना मिळालेली होती.
राजघराण्यातील असल्याने निंबाळकर घराणे आणि भोसले घराण्यात सतत संबंध येत असत, त्यामुळे महाराणी सईबाई आणि छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्यात लहाणपणी भेट होत असत, एकत्र खेळत असत. त्या भेटीदरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालसवंगड्या असल्याने सोबत किल्ले, राजकारण असे खेळ खेळत असत. आणि महाराणी सईबाई यांच्यातील सौंदर्य, लढवय्येपणा पारखून राजमाता जिजाऊ ह्यांनी स्वराज्याचे स्वप्नपूर्तीसाठी मराठी सत्ता उभी करण्यात निंबाळकर घराण्याची साथ मिळावी, व छत्रपती शिवाजी महाराजांना शोभून दिसणाऱ्या लाखात एक अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी म्हणून महाराणी सईबाई ह्यांचा स्वीकार करत पुण्यातील लालमहाल येथे छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी सईबाई ह्यांचा शुभविवाह दि. १६ मे १६४१ रोजी राजमाता, राष्ट्रमाता आणि लोकमाता जिजाऊ ह्यांनी साक्षीने आणि संमतीने संपन्न झाला.
महाराणी सईबाई ह्या निंबाळकर व भोसल्यांच्या घराण्यातील नाते जोडणाऱ्या दुसऱ्या महाराणी ठरल्या. कारण त्यांच्या अगोदर निंबाळकर घराण्यातील उमाबाई ह्यांचा विवाह मालोजीराजे भोसले ह्यांच्यासोबत झाला होता, आणि त्या उमाबाई ह्या होत्या, ह्यांनी देखील आपल्या पतींना साथ देत कर्तृत्ववान असे मराठा सरदार मालोजीराजे भोसले ह्यांची ओळख निर्माण करण्यात सहकार्य केल्याचे इतिहास सांगतो. आणि पुन्हा त्याच निंबाळकर घराण्यातील महाराणी सईबाई ह्यांचा विवाह छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत झाला, आणि खरंच इतिहासाला कायम नोंद घ्यावा लागणारा असा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवला, त्यात राजमाता जिजाऊ ह्यांच्या सारखीच साथ महाराणी सईबाई ह्यांनी दिली.
त्यांच्या लग्नाच्या त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे वय केवळ ११ वर्षे होते तर महाराणी सईबाईंचे वय केवळ ७ वर्षे होते. महाराणी सईबाई तेंव्हापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत सावलीसारख्या राहिल्या, त्यांनी कुटुंबाला यशस्वीपणे सांभाळलचं, परन्तु स्वराज्याच्या निर्मितीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांना वेळोवेळी चर्चेत सहभाग घेत काही वेळी महत्वाचे सल्ले देखील सुचवले असल्याचे इतिहासात सापडते.
त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत राहून कर्नाटकात असताना आपले सासरे म्हणजेच शहाजीराजे ह्यांच्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याचे कार्य करण्याची जबाबदारी देण्यात आली. सगळ्या दरबारात आनंदोत्सव साजरा झाला, त्यावेळी ह्याच स्वराज्यजननी स्वराज्याची लक्ष्मी असणाऱ्या महाराणी सईबाई ह्यांना तर कितीतरी मोठा आनंद झाला. ह्या वेळी आदिलशाहीतील सरदार ह्यांना शहाजीराजे भोसले ह्यांचा स्वराज्याची निर्मिती ही संकल्पना न आवडल्याने नाराज होऊन तो आदिलशाहीत सरदारांना एकत्र करत होते. त्याच वेळी 'सर्व नाराज एकत्र करत आहेत' असे शहाजीराजे भोसले भोसले ह्यांना समजले, त्या नाराज सरदारमध्ये मूळचे तळबीडच्या मोहिते घराण्याचे संभाजी मोहिते हे देखील होते. संभाजी मोहिते यांना स्वराज्याची निर्मितीसाठी सोबत घेणे खूप गरजेचे असल्याचे राजमाता जिजाऊ ह्यांच्या लक्षात आले. परन्तु आता मोहिते यांना सोबत घेण्याबाबत शहाजीराजे ह्यांच्या सोबत चर्चा करण्यात आली, आणि शहाजीराजे यांना देखील पटले व मान्य केले की, मोहिते घराण्यातील मुलगी सोयराबाई ह्यांना भोसलेंच्या सुनबाई म्हणून स्वीकार करायचा, असे ठरले. संभाजी मोहिते यांना शहाजीराजे भोसले ह्यांच्या दरबारात बोलावले, आणि संभाजी मोहिते यांना त्यांची मुलगी सोयराबाई ह्यांची सुनबाई म्हणून मागणी शहाजीराजे ह्यांनी घातली, त्यांनी मागणी मान्य केली, तर ह्या घटनेने मोहितेंचा राग संपुष्टात आला, परन्तु सुनबाई म्हणून थोरले पुत्र संभाजीराजे ह्यांच्या साठी की छत्रपती शिवाजी महाराजांच्या साठी दुसरी पत्नी म्हणून शहाजीराजे ह्यांनी निवड केली ह्याचा गोंधळ निर्माण झाला. दरबार चकित झाला, शांत सुन्न झाला होता.
सत्तेचा ध्यास, स्वराज्याची निर्मिती असे स्वप्न पाहत सोयराबाई या अत्यंत सुंदर, देखण्या, रूपवान, आणि लावण्यवतीची निवड छत्रपती शिवाजी महाराजांच्यासाठी, दुसऱ्या पत्नी म्हणून आम्ही मागणी घालतोय असे शब्द कानावर पडताच महाराणी सईबाई आणि बाल छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या पायातील त्राण संपला, दोघे एकमेकांना बघतच राहिले, कारण त्याक्षणाने महाराणी सईबाई ह्यांच्या आयुष्याला वेगळंच वळण मिळणार ह्या भीतीने महाराणी सईबाई आणि छत्रपती शिवाजी महाराज पूर्ण घाबरून गेले होते. ह्यावेळी एवढा मोठा धक्का सहन करत आपल्या लाडक्या पतीला आपल्या नजरेसमोर दुसरी पत्नी आणि आपली सवत म्हणून सोयराबाई ह्यांचा स्वीकार करत महाराणी सईबाई ह्यांनी सासुसासरे ह्यांच्या निर्णयासोबत राहून इतिहासात नोंद घडवली. त्यानंतर महाराणी सईबाई ह्यानी कधीच एक शब्दाची देखील तक्रार न करता उत्कृष्ट श्रेष्ठपत्नी, स्वराज्य जननी, स्वराज्यलक्ष्मी, सलोख्याचे व एकीच्या भूमिका निभावल्या. महाराजांच्या धावपळीच्या जीवनात कधीही तक्रार न करता स्वराज्य उभं करू लागल्या.
छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई ह्यांना सईबाई यांच्या वयाच्या २४ व्या वर्षी दि. १४ मे १६५७ रोजी जगप्रसिद्ध असे पुत्र, धर्मरक्षक, स्वराज्याचे दुसरे छत्रपती, संभाजी महाराजांना जन्म दिला. त्यापूर्वी राजकन्या सखुबाई ह्यांचा जन्म झाला होता. ह्या राजकन्या सखुबाई ह्यांना पुढे राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज ह्यांनी बजाजी निंबाळकर ह्यांचे पुत्र महादजी सोबत विवाह करून दिला होता. ह्याच छत्रपती संभाजी महाराजांच्या बाळंतपणमध्ये महाराणी सईबाईंची तब्येत बाळांतव्याधी मुळे खालावली. त्या राजगडावर असत, त्याचवेळी आदिलशाही सरदार अफजलखान मजल दरमजल करत स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांना संपवण्यासाठी चालून आला होता. ह्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चिंतेत होते, ह्यावेळी राजमाता जिजाऊ ह्यांच्या सोबत चर्चा करत प्रतापगड लढाईसाठी महाराजांनी निवडला होता. त्यामुळे महाराज प्रतापगडावर राहून अफजलखान ही पीडा संपवण्यासाठी "शिवनीती" आखत होते, तर तिकडे राजगडावर महाराणी सईबाई यांची तब्बेत आणखीच खालावली जात होती, त्यासाठी देशविदेशातील वैद्य बोलावून उपचारासाठी प्रयत्न करत होते, पण यश मिळत नव्हते. तेंव्हा हवा, वातावरणात बदल म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ व महाराणी सईबाई ह्यांना प्रतापगड येथे आणले, परन्तु प्रकृती सुधारणा होत नसून आणखीच चिंताजनक होत आहे हे लक्षात घेत पुन्हा राजगडावर राजमाता जिजाऊ व महाराणी सईबाई ह्यांना पाठवण्यात आले. त्यानंतर अफजलखान वाई येथून घाट चढवून वर आणत "शिवनीती" योजनेतून अफजलखानला प्रतापगडकडे महाराजांनी यायला भाग पाडले. आणि त्याच दरम्यान महाराज आपल्या जीव की प्राण असणाऱ्या प्रिय अशा महाराणी सईबाई ह्यांना भेटायला गेले. त्यावेळी राजमाता जिजाऊ ह्यांच्या महालात महाराज प्रवेश करत असताना राजमाता जिजाऊ ह्या बाळ शंभूराजे ह्यांना काहीतरी सांगत होत्या, पण छत्रपती शिवाजी महाराज दिसताच बोलणं थांबलं, त्यावेळी महाराजांनी नमस्कार करत, अफजलखान ह्याच्या भेटीची चर्चा राजमाता जिजाऊ सोबत करू लागले. त्यावेळी राजमाता जिजाऊ सूचक मार्गदर्शन करू लागल्या, "राजे, खान धूर्त आहे, दगेबाज आहे, विश्वास ठेवू नका, घातपात होऊ शकतो." त्यावेळी महाराज खात्रीपूर्वक सांगतात, "माँ साहेब काळजी करू नका, आम्ही नक्कीच यशस्वी होऊ फक्त आपला आशीर्वाद द्यावा." त्यावेळी राजमाता जिजाऊ म्हणतात, "राजे, हीच मोठी संधी आहे, खानाचा बदला घ्यायची, कारण ह्याच क्रूर खानाने तुमचे थोरले बंधू संभाजीराजे ह्यांचा दगाबाजीने मारलं होत, त्याचा बदला घ्यायची खूप मोठी संधी आली आहे, ह्याच संधीच सोनं करा, राजे विजयी व्हा!, आमचा तर आशीर्वाद आहेच, पण आई तुळजाभवानीचा देखील आशीर्वाद तुमच्यासोबत आहे, जा राजे! विजयी व्हा."
ह्यावेळी शंभूराजे छत्रपती शिवाजी महाराजांना विचारतात, "आबा, खान म्हणजे कोण आहे हो?" युद्धात देखील न घाबरणारे छत्रपती शिवाजी महाराज ह्या अचानकपणे समोर आलेल्या शंभुराजे ह्यांच्या प्रश्नाने स्तब्ध झाले, आणि राजमाता जिजाऊ ह्यांनी तत्परतेने उत्तर देत, "दुसऱ्यांना दगेबाजी करत, क्रूरपणाने मारत फिरतो, त्याला दयामाया नसते असा आहे खान!, त्याचा अंत निश्चित असतो!.."
ह्यानंतर राजमाता जिजाऊ महाराजांना म्हणतात, "राजे, सूनबाईंना भेटलात का? त्यांना भेटून जावा." महाराज म्हणाले, "भेटायला जातो आहोत."
महाराज महाराणी सईबाई ह्यांच्या महालात प्रवेश करते झाले, महाराजांनी निपचत पडलेल्या स्वराज्यलक्ष्मीला बघितले, महाराजांनी पलंगाजवळ जात महाराणी सईबाई ह्यांचा हात आपल्या हातात घेतला. महाराज बोलू लागले, तसे महाराणी सईबाई ह्या महाराजांना सांगू इच्छित होत्या, पण बाळंतपण शिसारीने ग्रासलेल्या स्वराज्यलक्ष्मी महाराजांना सांगू लागल्या,"स्वारी आपण स्वराज्याची स्थापना करावी, आम्ही आपल्या सोबत जेवढी साथ देणं शक्य होती तेवढी दिली आहे, आमचा प्रवासाचा मार्ग ठरला आहे, त्याच मार्गाने आम्ही आता कायमच्या प्रवासाला निघत आहोत. आपण स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करावे." त्याच वेळी महाराणीचे करारीबाणा दाखवणारे नेत्रातून अश्रुंचे थेंब गंगा नदीसमान स्वराज्याची उभारणीसाठी वाहताना जाणवत होते, महाराज देखील त्यावेळी भावुक होऊन, महाराणी सोबत राहणे महत्वाचे मानत होते आणि स्वराज्याचा दुष्मन अफजलखान पुराण संपवून टाकणे देखील महत्वाचे वाटत होते. त्यावेळी महाराणी सईबाई ह्यांना उबाळी येते, ती गिळत महाराणी सईबाई बोलत्या झाल्या, "आम्ही तुम्हाला शेवटची एक इच्छा बोलू इच्छितो." त्यावर महाराज बोलतात, "निःसंकोचपणे बोला, सांगा, आदेश करा, राणीसाहेब आम्ही आपण सांगाल तो शब्द जपू, तुमची इच्छा सांगावी."
त्यावर महाराणी बोलतात, "आम्ही आपणास शंभूराजे सारखे सुपुत्र जन्मास दिले आहे, आता आम्ही त्यांचा सांभाळ तर नाही करू शकत, पण आपण त्या बाल शंभूराजे ह्यांना आपणच आबा आणि आई, ह्या दोन्ही भूमिका निभावत, बाल शंभूराजे ह्यांचा सांभाळ करावा." ह्यावर महाराज महाराणी सईबाई ह्यांना "आबा आणि आई" ह्या दोन्ही भूमिका करत सांभाळायचे आश्वासन देतात व सईबाई ह्यांचा हात हळुवार खाली ठेवत गळ्यातील कवड्याची माळ हात लावून जगदंब म्हणण्यासाठी उचलायला पाहतात, पण तीच कवड्याची माळ प्रचंड गडासारखे डोंगरी किल्ले पायाखाली खेळवणारे छत्रपती शिवाजी महाराजांना ती कवड्याची माळ जड होऊन उचलणे देखील जड जाते. महाराज प्रतापगड कडे रवाना होतात. आपल्या वेदना सहन करत करत, वैद्य उपचार कामी न आल्याने ह्या स्वराज्यजननी, स्वराज्यलक्ष्मी, थोरल्या महाराणी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी सईबाई भोसले
ह्या छत्रपती संभाजीराजे केवळ दोन वर्षांचे असताना ५ सप्टेंबर १६५९ रोजी स्वराज्याचा कायमचा निरोप घेतात. त्या बाल शंभूराजे ह्यांना मातृप्रेम काय असत हे समजायच्या आतच शंभूराजे आईपासून पोरके होतात, पण छत्रपती शिवाजी महाराज त्यांना कधीच जन्मदात्री आई नसल्याची उणीव भासू देत नाहीत. पुढे अशा प्रकारे राजमाता जिजाऊंच्या संस्कार सोबतच धाराऊच्या आधाराने छत्रपती शिवाजी महाराज आपल्या पुत्रास जगप्रसिद्ध असे धर्मरक्षक, स्वराज्याचे दुसरे जगप्रसिद्ध छत्रपती संभाजी महाराज घडवतात, आणि महाराणी सईबाई ह्यांना दिलेला शब्द, "आबा आणि आई" भूमिका यशस्वीपणे पूर्ण करतात. आणि छत्रपती शिवाजी महाराज आपल्या अखेरच्या क्षणी देखील आपल्या मुखातून "सई" हेच शब्द उच्चारून स्वराज्य, रयत, आणि कडाडणाऱ्या सह्याद्रीचा, हिंदवी स्वराज्याचा निरोप घेतात, ह्यालाच म्हणायचं पतिपत्नी मधील प्रेम.
अशा स्वराज्यलक्ष्मी, स्वराज्य जननी, महाराणी सईबाई छत्रपती शिवाजी महाराज भोसले ह्यांना शतशः प्रणाम!..
महाराणी सईबाई भोसले ह्यांची समाधी राजगडावर चौथरा स्वरूपात आहे, आणि राजगड पायथ्याला पालगाव मध्ये एक आहे. अनेक इतिहासकारांच्या संशोधनातून जगप्रसिद्ध स्वराज्याच्या उभारणीत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या महाराणी सईबाई ह्यांची समाधीचा जीर्णोद्धार करत, त्याठिकाणी जगप्रसिद्ध दोन छत्रपती घडवणाऱ्या माऊलीची माहिती भविष्यात जन्मणाऱ्या पिढीला जतन करत त्यांना इतिहास समजण्यासाठी उपलब्ध व्हावी, म्हणून शासनाच्या सोबतच सामाजिक कार्यकर्ते आणि शिवप्रेमी मित्रांनी एकत्र येऊन जीर्णोद्धारसाठी सहकार्य करावे. आपणास सहकार्य करण्याचे भाग्य समजून घेत, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज ह्यांच्या कर्तृत्वामधले ऋण फेडणे तर ह्या जन्मी शक्य नाहीच, पण असा ऐतिहासिक ठेवा जपूण आठवणी व इतिहास जागा ठेवूया.
पुन्हा एकदा महाराणी सईबाई ह्यांना मानाचा मुजरा!!!......
Comments
Post a Comment