#Inspirational Of India
🌈 पहिले पुष्प
#मा. श्री रमेश घोलप,(IAS)
जिल्हाधिकारी, कोडरमा, झारखंड
✒️ लेखन
@ शिवश्री_लक्ष्मण_काटेकर
#Shivnitee@gmail.com
#+91 75 880 20 886
स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्या होतकरु विद्यार्थी मित्र/मैत्रिणींसाठी आम्ही आज एक प्रेरणादायी माहिती घेवून आलो आहोत. एक मुलगा आईसोबत रस्त्यावर बांगड्या विकून आयएएस अधिकारी कसा होतो, हा रामूचा जीवनसंघर्ष आपणास नक्कीच प्रेरणादाई ठरेला.
जेव्हा आपण दृढनिश्चय करतो व यश मिळविण्यासाठी दिवसरात्र एकत्र करुन प्रामाणिकपणे प्रचंड मेहनत घेतो, तेंव्हा यश आपलेच असते. याचे मुर्तीमंत उदाहरण आहे ते आयएएस अधिकारी रमेश घोलप यांचे…
रमेश घोलप ह्यांचे पूर्ण नाव रमेश गोरख घोलप असून त्यांच्या मातोश्री विमल घोलप ह्या आहेत. त्यांचे मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील महागाव हे आहे.
रमेश घोलप ह्यांचा जन्म गरीब कुटुंबातील घरात दि ३० एप्रिल, १९८८ रोजी झाला. तसेच त्यांचा दि ३० एप्रिल २०१३ रोजी मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील असून शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या पुणे येथे शिक्षण घेतलेल्या रुपालीताई सोबत झाला. आणि त्या आज देखील त्यांना उत्कृष्ट प्रकारे साथ देत आहेत. तर त्यांना अक्षीत आणि दिगंत असे दोन छान चिमुकली अपत्य आहेत.
ते आज लाखो तरुणांचे आदर्शस्थान आहेत. लहानपणी रमेश घोलप यांना पोलीओ झाला. तेंव्हा त्यांच्या घरची परिस्थिती प्रचंड हालाखीची होती. दोन वेळेच्या जेवणाचेही वांधे होते, पोटासाठी त्यांची आई रस्त्यावर फिरुन बांगड्या विकत असे. रमेश यांच्या वडीलांचे सायकल दुरुस्तीचे एक छोटेसे दुकान होते. त्यांच्या परिवारामध्ये चार सदस्य होते, मात्र वडिलांना दारुचे प्रचंड व्यसन असल्याने संपुर्ण परिवार रस्त्यावर आला होता. दारुचे व्यसन इतके वाढले की, त्यांना दवाखान्यात भरती करावे लागले. यामुळे परिवाराचा पोट भरण्यासाठी आईसोबत रमेश हे देखील बांगड्या विकण्यासाठी फिरु लागले. मात्र 'आपल्या मुलाने खुप शिकावे' ही आईची ईच्छा होती.
गावात प्राथमिक शिक्षण पुर्ण केल्यानंतर हायस्कुलमध्ये प्रवेश घेण्यासाठी रमेश आपल्या काकांच्या गावी गेले. सन २००५ मध्ये रमेश घोलप जेंव्हा १२ वी विज्ञान शाखेत होते, तेंव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले. काकांच्या गावापासून स्वत:च्या घरी महागाव येथे जाण्यासाठी बसचे भाडे केवळ सात रुपये होते. मात्र रमेश त्यांना केवळ सात रुपये भाडे द्यावे लागत होते. परंतू दुदैव्य इतके की त्यांच्या कडे सात रुपये देखील नव्हते. तेंव्हा शेजार्यांच्या मदतीने रमेश वडिलांच्या अंत्यविधीला कसेबसे घरी पोहचले. वडीलांचे छत्र डोक्यावरुन हरपल्यानंतरही त्यांनी १२ वीत ८८.५० टक्के मिळवले. घरची जबाबदारी असल्याने डीएड करुन गावातल्या एका शाळेत २००९ साली ते शिक्षक म्हणून रुजू देखील झाले. पण त्यांचे मन लागेना त्यांना सतत मोठ्या नोकरीचे स्वप्न दिसत होतं, मग त्यांनी ही नोकरी जास्त दिवस नोकरी न करता ६ महिन्याच्या साठी नोकरी सोडून दिली आणि पुणे येथे upsc च्या तयारीसाठी गेले. त्यांना स्वतःचे असे एक घर देखील नव्हते, ते एक नातेवाईकाच्या इंदिरा आवास योजनेतील घरी भाड्याने रहात असत. त्याच दरम्यान नोकरी करत त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत बी.ए.ची डीग्री देखील घेतली. आपला मुलगा खुप शिकला आणि शिक्षक झाला, याचे कौतूक आईसह गावकर्यांनाही होते. मात्र रमेश यांचे लक्ष काही तरी वेगळेच होते. रमेश यांनी सहा महिन्यांकरीता नोकरी सोडून देत युपीएससीची तयारी केली.२०१० मध्ये त्यांनी पहिल्यांदा ही परीक्षा दिली तेंव्हा त्यांच्या पदरी निराशा पडली. मुलाची जिद्द पाहून आईने गावातून काही पैसे उसनवारीने घेतले. त्यानंतर रमेश पुणे येथे जावून युपीएससीची तयारी करु लागले. यावेळी रमेश यांनी शपथ घेतली होती की 'जोपर्यंत ते मोठे अधिकारी होत नाही तो पर्यंत गावकर्यांना आपले तोंडही दाखविणार नाही.'
प्रचंड इच्छाशक्ती व प्रामाणिक मेहनत काय करु शकते, याची प्रचिती २०१२ मध्ये आली. रमेश हे यूपीएससीच्या परीक्षेत २८७ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
अविस्मरणीय! दिवस म्हणजे ३० जून २०१२ रमेश घोलप सरांचा स्वतःवरील विश्वास सार्थ ठरविलेला दिवस घटना यवतमाळ येथील आहे. ते कार्यक्रम साठी तयारीत होते कार्यक्रम स्थळी पोहोचले. दि. ३० जून २०१२ च्या दुपारी कार्यक्रमाला सुरूवात झाली. हजारो विद्यार्थ्यांच्या समोर मोठ्या आत्मविश्वासानं बोलत होते.रमेश घोलप सर आपल्या भाषणाच्या शेवटी पुन्हा एकदा ठासून सांगित होते की, "गेले २ महिने झालं सांगत आहेत की, आणि तेथे देखील आवर्जून सांगितले की, एम.पी.एस्.सी. चा रिझल्ट लागेल. खरंच मुलाखतीमध्ये २०० पैकी ११० जरी गुण मिळालेले असतील तर, अजून एका तासांनी तुमच्यासमोर बोलणारा रमेश घोलप महाराष्ट्रात पहिला आलेला असेल!" ह्याला म्हणायचं आत्मविश्वास, खात्री आणि ध्येयासाठी घेतलेलं वेड. प्रयत्न केला तर पुराच नाद करायचा.
यवतमाळ मधील त्यादिवशीचा कार्यक्रम संपला. आणि त्यांनी मुलांच्या गराड्यामध्ये त्यांना ऑटोग्राफ देण्यात व्यस्त होते. तेवढ्यात बाजूने कोणीतरी ओरडले, 'अरे! एम.पी.एस.सी. चा रिझल्ट लागला.' तात्काळ रमेश घोलप यांनी लगेचच फोन उचलला आणि पुण्यामध्ये असणार्या निशिकांत पळसकर या या त्यांच्या मित्राला फोन लावला. त्यानं आनंदाची गोड बातमी लगेचच दिली की, 'मास्तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी ची पोस्ट मिळालीय!' असं मोठ्या आनंदानं सांगितलं. रमेश घोलप मात्र महाराष्ट्रात कितवा आलोय हे जाणून घेण्यासाठी उत्सुक होतो. त्यांनी पळसकर या मित्राला विचारलं, 'अरे, महाराष्ट्रात कितवा आलोय?' त्यावर ' एकूण १८०० पैकी १२४४ गुण आहेत. महाराष्ट्रात पहिले आले आहात!' या मित्राच्या उत्तरानं रमेश घोलप मोठ्यानं ओरडत सांगू लागले "पहिला!...महाराष्ट्रात पहिला!" .त्या कार्यक्रमात स्टडी सर्कलचे डॉ. आनंद पाटील हेही उपस्थित होते. त्यांना ही बातमी समजली. रमेश घोलप यांना गुण १२४४ आहेत हे कळाल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया होती, "रमेश घोलप, अरे ! १२४४ गुण म्हणजे महाराष्ट्रात फक्त पहिला नाही आलास, तर आजपर्यंतचे सगळे रेकॉर्ड मोडून पहिला आला आहेस !"
कोणत्याही प्रकारच्या क्लासेसला न जाता महागडी पुस्तके न खरेदी करता गरीब व निरक्षर आई-वडीलांचा मुलगा आयएएस अधिकारी झाला. त्यांची पहिली नियुक्ती कुंती (झारखंड) येथे झाली. तेथे एक प्रमाणिक अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.
त्यांनी आवर्जून लिहितात की, माझी प्रशासनात येण्याची प्रेरणा या लेखात रमेश घोलप स्वतः लिहितात की, 'माझ्या आई-वडिलांनी कधीही नव्हतं ठरवलं की मुलाला आय.ए.एस. करायचं...'
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करताना लोकांच्या समस्या जवळून अनुभवल्या. प्रकल्पग्रस्त असणार्या लोकांच्या अडचणी, समस्या पाहिल्या.. रावसाहेब तर दूरच पण भाऊसाहेबांना भेटण्यासाठीही त्यावेळी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागायची. अर्धा एकरही शेती नावावर नव्हती, रहायला स्वतःचं घर नव्हतं, आई घरोघरी जाऊन बांगड्या भरायची आणि अशावेळी लोकप्रतिनिधी आणि अधिकार्यांना भेटून आम्हाला इंदिरा आवास योजनेतून एखादं घरकूल मंजूर करा म्हणून विनवणी केली की उत्तर मिळायचं-'तुमचं नाव बी.पी.एल. च्या यादीत नाही त्यामुळं नियमानुसार तुम्हाला ते मंजूर करता येणार नाही' असं उत्तर मिळायचं. नियम मोडून ते आपल्याला मिळणार नाही हे माहित असल्यामुळं शांत बसायचो पण, कित्येक एकर शेती नावावर असणार्या आणि गाडीवर फिरणार्या, अगोदरच चांगलं बांधकाम करून रहणार्यांना जेंव्हा घरकूल मंजूर व्हायचं तेंव्हा मात्र व्यवस्थेविरूद्ध चीड निर्माण व्हायची. गावातील एका शासकीय सेवेत नोकरीला असलेल्या महिलेकडून विधवा, वृद्ध महिलांकडून पेंशन मिळवून देते म्हणून पैसे घेतले जायचे. बिचार्या नशिबानं आणि परिस्थितीनं गांजलेल्या या बायका पेंशनच्या आशेनं अर्थिक शोषणाच्या शिकार व्हायच्या. त्या बायकांपैकीच एक माझी आई-आक्काही होती. हे कुठतरी बदललं पाहिजे असं मनापासून त्यांना वाटायचं. त्या काळात वर्षातील १२ महिने राशनचा तांदूळ आणि रॉकेल मिळाल्याचं कधीही आठवत नाही. वर्षातील किमान ३ महिण्यांचा तरी माल 'या महिन्यात वरूनच माल आला नाही' असं खोटं सांगून गायब केला जात असे. रात्री लाईट गेल्यानंतर चिमणीपुढं वाचत असताना 'अरे, चिमणीची वात जरा लहान कर. एकतर रॉकेल दोन महिन्यांतून आलंय आणि ते पण कमीच आलंय. परत कधी येईल माहीत नाही त्यामुळं जरा जपून वापरायचंय. नाहीतर सकाळी कर अभ्यास आता झोप' अशी वाक्यं कानावर पडायची तेंव्हा राशन दुकानदाराचा जाम राग यायचा.
'डगळ्या प्यांटीला काडीचा आधार' असे दिवस होते ते. बेल्ट नसल्यामुळे अनेक मित्रांसारखी त्यांची डगळी प्यांट कमरेवर टिकविण्याची जबाबदारी करदोडा आणि लाकडाच्या काडीची असायची. विद्यार्थी दशेत मला चप्पल घालून चालताना त्रास होई आणि शूज घेण्याची ऐपत नसल्याने कित्येक वर्षे अनवाणीच फिरले होते. वडिल आजारी असताना सरकारी दवाखाण्यात जाण्याचा योग येई. तेंव्हा चांगल्यापेक्षा कटूच अनुभव जास्त यायचे. महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थी संघटनेचं नेतृत्व करत असताना जेंव्हा मोर्चा किंवा आंदोलनं केल्यानंतर निवेदन द्यायला जेंव्हा तहसिलदारकडं जायचे तेंव्हा मनात वाटायचं की, 'आपण तहसिलदार असायला पाहिजे!'
आज प्रशासनात काम करताना जनता दरबार लावून जेंव्हा ३ तासात ऑन दी स्पॉट पेंशन मंजूर करतात तेंव्हा त्यांना अक्कासह त्या महिला आठवतात. बालकामगारांना मुक्त केल्यानंतर त्यांना स्वखर्चाने गणवेश, स्कूल बॅग, शूज, बेल्ट देत असताना त्यांना त्यांचे दिवस आठवून जातात. खूंटी आणि बोकारो जिल्ह्यात काम करत असताना अनेक राशन दुकानदार आणि रॉकेलचे हॉकर्स यांना काळाबाजारी आणि अनियमिततेच्या नावाखाली जेलमध्ये पाठविले. एके दिवशी ३९ दुकानदारांची लायसेन्स सस्पेंड करून १२३ दुकानदारांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या होत्या. तेंव्हा रमेश घोलप साहेबाना त्यांच्या घरातील ती रॉकेलची चिमणी आठवायची. अनेक सरकारी हॉस्पिटल्सना भेटी देऊन तेथील स्थिती सुधारण्याचे प्रयत्न केले त्यावेळी वडिल आणि त्यांच्यासारखे सरकारी दवाखान्यातील अपुर्या सुविधांचे आणि दुर्लक्षितपणाचे बळी ठरलेले लोक आठवायचे. आज अधिकारी म्हणून त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रकल्पग्रस्त लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी जेंव्हा भेटी घेतात आणि बैठका घेतात तेंव्हा गावातील अधिकार्यांकडून आपल्या प्रश्नांची सोडवणूक होईल म्हणून आशेनं त्यांची वाट बघणारे गांवकरी डोळ्यासमोर येतात. योग्य व्यक्तींनाच इंदिरा आवास मिळाले पाहिजे, असा प्रयत्न आज जेंव्हा एक अधिकारी म्हणून करतात तेंव्हा त्यांचे बेघर असतानाचे दिवस आठवतात.
"परिस्थिती बदललीय. इतकी वर्षे प्रश्न शोधणारा मी आज उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतोय.व्यक्ती शाळेतील शिक्षणाइतकाच किंबहुणा त्यापेक्षा जास्त समाजातील अनुभवांवरून घडतो असं माझं मत आहे. ज्या समाजानं मला घडविलं त्या समाजाचं मी काहीतरी देणं लागतो ही भावना मी कधीही विसरणार नाही. आयुष्यात कितीही पुढं गेलो तरी मागे वळून पाहण्याचा संस्कार जपून ठेवीन. परीक्षेनंतर अधिकारी झालो हे काही अंशी यश असेल कदाचित..पण खरं यश मिळालेल्या पदाचा वापर लोकांच्या कल्याणासाठी करण्यात आणि त्यातून मिळणार्या समाधानात आहे अशी माझी भावना आहे. लोकांसाठी काम करण्याची तळमळ हीच माझी प्रशासनात येण्याची प्रेरणा आहे आणि शेवटपर्यंत मी माझ्या प्रेरणेशी बेईमानी कधी करणार नाही!"
- असे रमेश घोलप लिहितात.
तसेच त्यांना आवडलेली खास चार ओळी आपल्यासाठी सादर, कोणाच्या आहेत माहीत नाही पण छान नक्कीच आहे.
विझलो आज जरी मी,
हा माझा अंत नाही.....
पेटेन उद्या नव्याने,
हे सामर्थ्य नाशवंत नाही...ll
छाटले जरी पंख माझे,
पुन्हा उडेन मी.
अडवू शकेल मला,
अजुन अशी भिंत नाही ..
माझी झोपडी जाळण्याचे,
केलेत कैक कावे..
जळेल झोपडी अशी,
आग ती ज्वलंत नाही..
रोखण्यास वाट माझी,
वादळे होती आतूर..
डोळ्यांत जरी गेली धूळ,
थांबण्यास उसंत नाही..
येतील वादळे, खेटेल तुफान,
तरी वाट चालतो..
अडथळ्यांना भिवून अडखळणे,
पावलांना पसंत नाही ....
मा रमेश घोलप ज्यावेळी कार्याच्या व्यापातून सुट्टी मिळते त्यावेळी मूळ गावी म्हणजेच महागाव येथे येऊन आपल्या बालपणापासूनचे मित्र महादेव कोकरे पाटील महागांवकर व अमोल गायकवाड यांच्य़ासोबत भेटतात, तसेच वयस्कर व्यक्ती ज्या नोकरी लागण्या पूर्वी आवर्जून विचारत होत्या, चौकशी करत असत त्यांना भेटतात तेंव्हा भेटता क्षणी कपाळावर दोन्ही हात फिरवून बोटे मोडत भरलेल्या डोळ्यांनी, "कसा हाइस रं माझ्या राजा?" अशी मायेनं विचारपूस झाली की आपण 'गावाकडच्या माती'त पोहोचल्याची जाणीव होते.
अशा त्यांनी अनेक ठिकाणी झारखंड राज्यात नोकरी करत आपली छाप ठेवली आहे. आपल्या ध्येयवादी रमेश घोलप ह्यांची दि. २७ ऑक्टोबर २०१६ ला सहसचिव, उच्च, तंत्रशिक्षण आणि कौशल्य विकास विभाग, झारखंड राज्य शासन, झारखंड येथे नवीन नियुक्ती करण्यात आली.
आणि दि ३० जून २०१९ रोजी जिल्हाधिकारी म्हणून कोडरमा राज्य झारखंड येथिल श्री. भुवनेश प्रताप सिंह IAS यांच्याकड़ून सुत्रे स्विकारली. किती योगयोग म्हणजे आजच्याच दिवशी २०१२ साली MPSC चा रिझल्ट लागला होता आणि रमेश घोलप महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालो होतो. ते आज देखील जिल्हाधिकारी म्हणून कोडरमा झारखंड येथे कार्यरत आहेत.
त्यांनी कोरोनाच्या प्रादुर्भाव होत असताना स्वतः जिल्ह्यातील उत्कृष्ट नियोजन करत आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मा रमेशजी घोलप यांना पुढील कार्यासाठी खूप खुप शुभेच्छा!!!....
आम्हाला अभिमान आहे की रमेश घोलप हे माझ्या सोलापूर जिल्ह्यातील आहे.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्या सर्व मित्र/मैत्रिनींनो छोट्याशा अपयशाने खचून जाऊ नका, परिस्थितीचा बाऊ करु नका. तुम्ही अधिकारी होण्याचे जे ध्येय निश्चित केले आहे, त्या मार्गावर प्रामाणिकपणे वाटचाल करा, यश तुमची वाट पाहत आहे…..भविष्यातील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा!
Comments
Post a Comment