राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे आईकडील आजोबा लखुजीराव जाधवराव.
राजे लखुजीराव यांच्या जन्माची नोंद उपलब्ध नाही, परंतु त्यांचे मृत्यु समयी वय ८० होते, म्हणजे त्यांचा जन्म इसवी सन १५५० म्हणता येईल.
बुलढाणा जिल्ह्यातील एक इतिहासप्रसिद्घ गाव. ते मेहकरच्या नैर्ऋत्येस सु. ५२ किमी. आणि देऊळगाव राजाच्या आग्नेयीस सु. १४ किमी.वर वसले आहे. या लखुजी जाधव यांच्या प्रासादाचे प्रवेशद्वारगावाच्या नावाविषयी काही दंतकथा असून त्यांपैकी सिंधुरामनामक राजाने ते वसविले, म्हणून त्याचा अपभ्रंश होऊन ते सिंदखेड झाले असावे तर काहींच्या मते हे सिद्घक्षेत्र म्हणजे संतांची भूमी वा खेडे होते. सर्वसामान्यतः या गावाच्या परिसरात सिंदी वृक्षांची विपुलता आहे. त्यावरुन सिंदखेड हे नाव रुढ झाले असावे.
लखुजीराव जाधव ह्यांचे गाव सिंदखेड राजा येथील होते. या गावाचा प्राचीन इतिहास ज्ञात नाही तथापि मध्यकाळात बहमनींची सत्ता यावर होती. अलाउद्दीन अहमद ( कार. १४३६– ५८) या बहमनी सुलतानाने तेथील काजीस हा परगणा जहागीर म्हणून १४५० मध्ये दिला. या घराण्याने सु. १०० वर्षे जहागीर उपभोगली. नंतर या परगण्याची सर्व सूत्रे जाधव घराण्याकडे आली. ते देवगिरीच्या यादव वंशाचे असून यादवचे जाधव झाले असावेत. या घराण्यातील लखुजी (लुखजी ) जाधव हे एक पराक्रमी सरदार होत. त्यांची कन्या जिजाबाई हिचे हे जन्मस्थान असून, तत्कालीन शूर सरदार शहाजीराजे त्यांचे जावई होत. छ. शिवाजीं महाराजांचे लखुजीराव हे आईकडील घराण्याकडून आजोबा होत.
निजामशाहीत त्यांना पंचहजारी मनसबदारीचा हुद्दा इ सन १५७० साली होता.त्यानंतर निजामशहाला १२ वर्षांपासून देवगिरी किल्ला जिंकता येत नव्हता तो राजे लखुजीराव जाधवराव यांनी इ सन १५७२ साली स्वपराक्रमाने मिळवून दिला, त्यासमयी निजामशहाने त्यांना १०,००० हजारी मनसब,९ सरकार ,२८ महाल व ५६ चावड्या ही जहागिरी वंशपरंपरागत करुन दिली.पुढे इ सन १६०५ साली राजे लखुजीराव जाधवराव यांना निजामशाहीत १५ हजारी मनसबदारी व वजीर पद बहाल करण्यात आले.पुढे इ सन १६२१ साली राजे लखुजीराव जाधवराव हे मोगलांकडे गेल्यानंतर त्यांना २४००० जात व १५००० स्वार ही मनसबदारी, मीर-ए-समद हे पद, दक्षिणेत त्यांना स्वतःला तसेच त्यांचे पुत्र,नातु व सोयऱ्याना वतन देऊन सन्मान केला गेला. इ सन १६१५-१६२९ या काळात राजे लखुजीराव जाधवराव व त्यांचे जावई शहाजी महाराज साहेब यांनी एकत्रीत मराठा सत्ता बळकट करण्यासाठी प्रथम केले. त्यांनी १६१४ ते १६२९ दरम्यान कधी मोगल, तर कधी निजामशाही यांची अदलून बदलून चाकरी केली आणि अनेक लढाया जिंकल्या. निजामशाहीत १०,००० घोडेस्वारांच्या पलटणीचे ते सेनापती होते, तर मोगलांकडे त्यांना १५,००० घोडदळाची मनसबदारी दिली होती. मलिक अंबरच्या मृत्यूनंतर निजामशाहीत फतेखान हा त्याचा मुलगा कारभारी झाला परंतु हमीदखान या सरदाराच्या चिथावणीवरुन निजामशाहाने त्यास तुरुंगात टाकले व हमीदखानास कारभारी केले. त्यामुळे इतर सरदारांना धास्ती वाटू लागली. त्यांपैकी लखुजीराव हे एक होते. त्यांनी मोगलांकडे जाण्याचा बेत आखला. ही बातमी निजामशाहास कळताच त्याने मुजरा करण्यासाठी त्यांस दौलताबादच्या किल्ल्यातील दरबारात बोलविले आणि अचानक झालेल्या हल्ल्यात लखुजी व त्यांचे राघव, यशवंत व अचलोजी हे तीन मुलगे ठार झाले (१५ जुलै १६२९). त्यांची समाधी सिंदखेडराजा येथे आहे.
तेव्हा शहाजीराजांनी निजामशाही तर सोडलीच, पण त्याचा सूड घेतला. लखुजींच्या खुनाच्या वेळी त्यांची पत्नी गिरजाई, भाऊ जगदेवराव आणि एक मुलगा बहादुरजी छावणीत होते. ते तत्काळ सिंदखेडला गेले. नंतर जाधवराव मंडळींनी मोगलांकडे मनसबदाऱ्या पत्करल्या. दक्षिण हिंदुस्थानात हैदराबाद येथील निजामाकडे सत्ता गेल्यानंतर (१७२४) जाधवरावांची जहागीर निजामशाहाच्या अंमलाखाली आली. ती पुढे शिंद्यांनी जिंकून सु. ६० वर्षे त्यावर आधिपत्य गाजविले. पुढे १८०३ मध्ये निजामाने त्याचे स्वामित्व पुन्हा मिळवून जाधव घराण्यातील वंशजास त्याचे हक्क दिले तथापि मोहन सिंग, सदलाम खान, गाझी खान आदींनी शहरात लूटमार केली. इंग्रजांनी ती थांबविली मात्र जाधवांच्या सैन्यातील अरब शिपायांनी बंड करुन (१८५१) जहागिरीची सूत्रे आपल्या हाती घेतली. इंग्रजांनी हैदराबादच्या निजामास मांडलिक केल्यानंतर इथे त्यांचा अंमल प्रस्थापित झाला. लखुजीराव जाधव व त्यांचे वंशज यांच्या काळात बांधलेल्या वास्तूंचे–विशेषतः राजप्रासाद, किल्ला, तलाव, स्मारके यांचे – अवशेष अद्यापि अवशिष्ट आहेत.
या अवशेषांपैकी जाधव कुटुंबियांनी सु. १६५० मध्ये अर्धवट बांधलेल्या काळ्या दगडातील चौरस किल्ल्याच्या भिंती व चार बाजूंचे भव्य वर्तुळाकार बुरुज अद्यापि अवशिष्ट आहेत. याशिवाय शहरातील नैर्ऋत्य भागातील हेमाडपंती नीलकंठेश्वर मंदिर सुस्थितीत असून, त्यावर एक पुसट शिलालेख आहे. पश्चिमेस दोन तलाव असून, त्यांपैकी एक मोती तलाव सुस्थितीत आहे. लखुजींचा राजप्रासाद, रंगमहाल या वास्तू दुर्लक्षिल्यामुळे त्यांची पडझड झाली आहे मात्र लखुजींचे स्मारक व समाधिस्थान प्रेक्षणीय असून, त्याच्या प्रवेशद्वारावर हत्तीवर स्वार झालेल्या दोन सिंहाच्या मूर्ती आकर्षक आहेत. प्रवेशद्वाराच्या उजवीकडे एक शिलालेख आहे. तो भग्न स्थितीत असून उर्वरित मजकुरात जाधव घराण्याची वंशावळ आहे. या स्मारकाच्या बाजूला एक छोटे रामेश्वराचे लखुजींनी बांधलेले मंदिर आहे. याशिवाय जगदेवरावांनी बांधलेला एक मोठा तलाव आहे.
विदर्भात सिंदखेड येथे त्यांचे वतन होते. सिंदखेडकर जाधवांचे घराणे ही मुळ देवगिरीच्या यादव वंशाचीच एक उपशाखा आहे. देवगिरी येथील यादवांच्या रायाचा अंत झाल्यावर यादवांची दैन्यावस्था झाली. उदरनिर्वाहासाठी ते सर्वत्र पसरले. याच घराण्यातले वारस पुढे काही पिढ्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथे स्थायिक झाले. सिंदखेडच्या जाधव घराण्यात लखूजी हा कर्तृत्ववान आणि विख्यात पुरुष उदय पावला. यादवांचे राज्य नष्ट झाल्यानंतर लखूजी जाधव यांनीच जाधव घराण्याला उर्जितावस्था प्राप्त करुन दिली. लखूजीचे नाव लक्ष्मण असेही होते तथापि ते लखूजी याच नावाने इतिहासात प्रसिद्ध आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडच्या जाधवाचे घराणे प्राचीन आहे. शिवपूर्वकाळात विशिष्ट परिस्थितीत निजामशाही आणि आदिलशाही यांच्या आश्रयाने जी काही मराठी कूळे उदयास आली त्यात सिंदखेडकर जाधवराव, वेरुळचे भोसले, वासीमचे उदाराम देशमूख,पोतले आणि फलटनचे नाईक निंबाळकर, सरनाईक पवार ही कूळे विख्यात होती. जाधव घराणे हे लखूजी जाधवरावांच्या यांच्यामुळे निजामशाहीतच्या आमदानीत पुढे आले. लखूजीने बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडला देशमूखी मिळवली. यादव राजांच्या राजवटीत मराठी राज्य नष्ट झाले परंतु जाधव कुळात जन्मास आलेल्या कन्येच्या जिजाबाई पोटी तिनशे वर्षांनी पुन्हा मराठ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन करणारा छत्रपती शिवाजी महाराज हे असामान्य असे पुरुष जन्मास आले छत्रपती शिवाजी महाराजाला जन्म देणारी जिजाबाई लखुजी जाधवरावांची कन्या होती.
लखुजीराव जाधव ह्यांना पुत्र - १) राजे दत्ताजीराव २) राजे अचलोजीराव ३) राजे बहादुरजी ४) राजे राघोजी राव . कन्या- राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब.
लखुजीराव जाधव ह्यांचे वंशज शाखा सिंदखेडराजा परिसरात देऊळगाव राजा,आडगाव राजा,किनगाव राजा,उमरद रुसुमचे (देशमुख),जवळखेड व मेहुणा राजा या असुन सिंदखेडराजा परिसराव्यतिरिक्त वंशजशाखा- करवंड(ता चिखली जिल्हा बुलढाणा).
Comments
Post a Comment