"मृत्युंजय ००१"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मूळ लेखक - शिवाजी सावंत.
संकलन - शिवपुत्र - लक्ष्मण काटेकर.
📞 ७५८८०२०८८६.
https://shivnitee.blogspot.com
कर्णाच्या दानशूर तत्वाला तोड नाही हेच खरं. मृत्युंजय एवढी अमाप लोकप्रियता कुठल्याही मराठी कादंबरीकाराच्या पहिल्याच कादंबरीला लाभलेली नाही. भारताच्या राजकीय पुनरुत्थान बरोबरच महाभारताचे आणि विशेषतः त्यातील प्रसंगाचे आणि व्यक्तिरेखांचे नव्या व्यापक मानवतावादी दृष्टिकोनातून साहित्यिक पुनरुज्जीवन झाले. कुंतीपुत्र राधेय या विषयी तर विशेष आस्था व्यक्त झाली. आणि कुसुमाग्रजांच्या 'कौंतेय' सारख्या अनन्यसाधारण साहित्यकृतींचा लाभही मराठी साहित्याला याच संस्थेतून झाला 'कौंतेयने' नाट्यक्षेत्रात यशस्वी कामगिरी केली, त्यासारखी कामगिरी अशा यशस्वी तर येणे कादंबरीच्या क्षेत्रात 'मृत्युंजय' यांनी केली आहे. हे आता सर्वमान्य झाले आहे.
'अनिवार्य नियतीचं गरगर फिरणे महान संयमानं सहन करीत जगायचं असतं' हे कर्णाचं सांगणं आहे. कृष्णाप्रमाणेच कर्ण पौरूषचैतन्याचे आणि वर्णनिर्भयतेचे समर्थ आविष्करण आहे. जो कोणी जीवनसंघर्षात पिचला आहे त्याला संघर्षात आणि पिचण्यात सुद्धा पुरुषार्थी आणि शक्तिशाली 'जीवन' सामावले आहे. हा कर्णाचा तेजस्वी संदेश आहे. आणि पांडवांच्या विजयाचे डांगोरे फिके पाडणारा हा संदेश आहे. मौनाच्या विलक्षण रूपात! या मौनाच्या जोरावर मृत्यूच्या महाद्वारात सुद्धा जीवनाचा धुंद विजय करणारे अनुभविला. म्हणूनच त्याच्या या भावकथेचे नाव आहे "मृत्यूंजय" हेच.
________________________________
https://shivnitee.blogspot.com
_________________________________
अर्घ्यदान !
त्या दिग्विजयी , दानविक्रमी , अशरण सूर्यपुत्र कर्णाला हे एकविसावे अर्घ्यदान देण्यासाठी जलांजली उचलली - लेखणी हाती घेतली मात्र. कुठूनतरी सरसरत एक विचारलहर आली आहे. नेहमीसारखी की ओंजळ गंगेच्या जलानं भरून ओसंडत नाहीय. ते तर आहेच पण त्यात लोकगंगेच्या निरपेक्ष प्रेमाचं सुगंधित केशरही नकळत मिसळलं आहे!
नव्या 'एकविसाव्या शतकाच्या भूकंपासारखे हादरे देत येऊ घातलेल्या घटनांच्या सुरुवातीस मृत्युंजयाची ही 'एकविसावी' आवृत्ती पूर्वीच्याच उत्साहाने प्रकाशित होत आहे!
वीस व एकवीस हे अंक आपपत: जुळून आले आहेत. म्हणूनच मनात विचार येऊन गेला. येणाऱ्या शतकात या सूर्यपुत्राच्या कथेचं स्वागत कसं होईल? ती वाचकांना शिळी म्हणन नकोशी वाटेल ? अंतरंगातला मलाच अपरिचित असलेला एक आदिम आवाज ठासून सांगतो आहे - " मुळीच नाही ! मृत्युंजय शिळी होणार नाही . तो पूर्णत: वाचकांचा ऐवज आहे.
ती सूर्यपुत्रकथा आहे . उलट दिवसागणिक , तासागणिक , क्षणागणिक झपाट्यानं विकसित होणाऱ्या विज्ञानाच्या पाठबळावरच वाचकाला या कलाकृतीच्या दोन ओळींमधला अव्यक्त आशय अधिक मात्रेनं भिडत जाणार आहे !" मी या विषयी मनोमन पूर्णत : निश्चिंत आहे.
दोन वर्षांपूर्वीच ' युगंधर ' ही श्रीकृष्णचरित्रावरील महाकादंबरी शब्दबद्ध करून कॉन्टिनेन्टलकारांना दिली . तिची दुसरी आवृत्तीही प्रकाशित झाली आहे . तिच्यासाठी 'आचमन' या शीर्षकाचं मनोगत लिहून द्यावं लागलं. ते लिहिताना मन असंख्य स्मृतींनी शिगोशीग भरले होतं. काही काळ लेखणीच स्तब्ध झाली होती. त्याहून कितीतरी सखोलपणे एका अवर्णनीय रितेपणाच्या भावानं, दोन सुहृदांच्या जाण्यामुळं या क्षणीही मन सुन्न आहे; तात्यासाहेब व भय्यासाहेब यांच्या - (स्व.) कुसुमाग्रज व अनंतराव यांच्या खरोखरच दोघांनीही माझ्यावर निखळ - निरपेक्ष व अकृत्रिम - निरलस प्रेमच केलं. ज्या कृष्णकथेबद्दल दोघांनीही मला प्रत्येक भेटीत विचारलं ती 'युगंधर' बघायला - वाचायला दोघेही खरोखरच हवे होते.
नूतन शतकाच्या तोंडावर हे लिहिताना ज्यांनी मृत्युंजयाचं शारदाप्रसादात घरगुती पद्धतीनं अगदी आटोपशीर साधं पूजन केलं , त्या महाराष्ट्र वाल्मीकी (स्व.) अण्णांची ( गदिमांची ) प्रकर्षानं आठवण होत आहे. एका साध्या पोस्टकार्डानं दिलेल्या आग्रही आमंत्रणावरून दिल्लीहून येऊन माझ्या 'छावा' कादंबरीचं पुण्यात असंच साधं पूजन करणारे ( स्व.) यशवंतराव चव्हाण यांची अभिजात साहित्यरसज्ञता मी कसा काय विसरणार ? 'मृत्युंजय ' वर आपल्या जनप्रिय दै. मराठात मृत्युंजय' नावाचा 'प्रचंड'अग्रलेख लिहिणाऱ्या आचार्य अत्र्यांची आठवण कशी काय पुसली जाणार ? गेली तीस वर्षे ज्यांच्या मुखपृष्ठानं व आतील सजावटचित्रांनी 'मृत्युंजय' मराठी स्त्री - पुरुष वाचकांच्या घरोघरी पोचली, ती तीन पिढ्यांनी साहित्यानंद आस्वादत वाचली ते अद्वितीय ( स्व .) दीनानाथ दलाल यांच्या मुखपृषासारखेच आजही माझ्या मनात टवटवीत आहेत.
'युगंधर' च्या निमित्ताने लेख लिहिताना ज्यांनी ' न मावळणारा सूर्य ! ' अशा मला चक्रावून टाकणाऱ्या ग्रंथसदृश शीर्षकातच त्या श्रीकृष्णकथेबद्दल सर्व काही सांगन टाकलं ते मला ज्येष्ठ बंधुतल्य असलेले प्राचार्य शिवाजीराव भोसले ; मुंबईच्या आपल्या 'प्रभुकंज' या निवासावर 'मृत्युंजय' साठी मूकपणी हसतच माझ्या हातावर धन भरलं ( कुठल्याही पुरस्काराला मागे टाकेल असं ) शुभ्र - धवल पाकीट ठेवणाऱ्या - यासाठीच कोल्हापूरला नुकत्याच झालेल्या भूषणसोहळ्यात अंतर्बाह्य अभिजात श्रीकृष्णभक्त ज्या दीदींना 'युगंधर' ची कच्ची प्रत तशाच मूकपणे दाखवावीशी वाटली, त्या स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे व अशा शब्दशः अनेक सुहृदांचे प्रेमत्राण मी मनोमन वागवून आहे.
कॉन्टिनेन्टलचे अनिरुद्ध व रत्नाकर कुलकर्णी यांना मी बंधूच मानतो. त्यांचे आभार कसले मानायचे ? कॉन्टिनेन्टलचे परिवारासारखे सर्व सहकारी, मराठीचे सर्वदूर पसरलेले स्त्री - पुरुष वाचक, या संस्कारित आवृत्तीच्या अक्षरजुळणीचे जोखमीचे काम पार पाडणाऱ्या सौ . रेखा कुलकर्णी आणि मुद्रक श्री . निगुडकर बंधू यांचा मी मनःपूर्वक आभारी आहे .
युगंधरचा वेध घेताना ऋग्वेदातील एका आशयश्रीमंत ऋचेचा पलिता हाती घेतला होता.
'ॐहिरण्मयेन पात्रेन -
सत्यस्यापिहितम् मुखम्
तत्वम् पुषण्णपावृणु
सत्यधर्माय दृष्टये ! '
तुम्हा सर्वांच्या सदिच्छांमुळे - माझ्या आचेला बळ मिळाले आहे. प्रत्यक्ष श्रीकृष्णच, सत्यमुखावरील दिपवणारं झाकण काढून , चमत्काराशिवाय आपलं 'पूर्णपुरुष' हे सार्थ दर्शन युगंधरातून नक्कीच घडवेल !
त्यानं मनी आणलं आणि कृपा केली तर अशक्य ते काय आहे ?
या नम्र विश्वासासह त्या श्रीकृष्णभक्ताला व दानवीर कर्णाला हे एकविसावे 'अर्घ्यदान' नम्रभावे अर्पण करतो.
इति शुभं भवतु !
- शिवाजी सावंत
दि . १३ एप्रिल २००२
गुढी पाडवा
C - २ / २६ स्टेट बँक नगर
पंचवटी , पाषाण , पुणे ४११००८.
क्रमशः.........
_______________________________
मूळ लेखक - शिवाजी सावंत
संकलन - शिवपुत्र लक्ष्मण काटेकर.
📞 ७५८८०२०८८६
Comments
Post a Comment