"अखजी... "
लॉकडाऊनमुळे वार आणि तारखा सध्या फारशा लक्षात राहत नाहीत .त्यात आता सणांचंही तसंच झालं . आज सकाळी जरा घरात धावपळ दिसली . त्याच्या पाऊलखुणा तशा काल-परवा पासूनच उमटणं सुरू झाल्या होत्या . खाण्याचे वेगवेगळे पदार्थ करण्याची तयारी सुरू होती . उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये येणारे सण जरा जास्तच आपुलकीचे....
अखजी..... अक्षयतृतीया वगैरे भरभक्कम असं नाव सहसा ओठांवर येत नाही. या अखजीला बालपणातील गोड आणि गमतीदार अशा आठवणींचा मुलामा आहे .त्यामुळे आज सकाळीच मुलींनी दारातील झाडाची फुले तोडून आणली आणि बाबांचा फोटो देवपाटाजवळ ठेवला तेव्हाच मन बालपणात अन गावाकडे फेरफटका मारून आलं .
" काय बयना शिंदू यंदा गव्हाचा चीक काई साजरा नोता झाला . त्याच्याच्यानं सांडोया अन कुळ्ळया काई मनासारख्या झाल्या नाईत . " एक दोन दिवस अगोदर शेजारची आजी आईला येऊन सांगत असे . "तुया वावरातले दोन -चार आंबे देजो बरं . मी पाठवीन नाताले सकाऊन . " असही बजावून जात असे .
ही अखजी म्हणजे आईने केलेल्या अनेक पदार्थांच्या मेजवानीचा उत्सवपूर्ण प्रारंभ . सांडोळ्या ,कुरडया इत्यादी तळणशिल अॅटम करण्याची पूर्वतयारी... तोसुद्धा एक उत्सवच रहायचा . दोन-तीन दिवस गहू पाण्यात भिजवून ते भांडं कडक उन्हात गच्चीवर ठेवणे ,तेवढे दिवस त्याचा उग्र पण हवाहवासा वास , त्यानंतर पाट्यावर वाटून त्याचा चीक काढणे, तो शिजवून कुरडया करण्याअगोदर त्यात साखर टाकून क्वालिटी कंट्रोलचे प्रमाणपत्र देण्याचा बहुमान आमचाच राहायचा .४५ अंश से . तापमानात घराच्या गच्चीवर जुन्या धोतरावर या शिजवलेल्या गव्हाच्या चिकापासून सांडोळ्या, कुरडया आणि ज्वारीच्या पिठाच्या बिबळ्या यांची नियोजनबद्ध मांडणी होत असे . यांच्यामुळे तयार झालेली रांगोळी हललीच्या कॉम्प्यूटरमधल्या रेडीमेड डिझाईनला लाजवेल अशी राहायची . संध्याकाळी मग ते पूर्ण धोतर उलटं करून बाजीवर ठेवायचं . मग त्यावर थंडगार पाणी ओतून हळूहळू एकेक कुरडई काढण्याचा सुद्धा एक वेगळाच आनंद राहायचा . मग हे सगळे पदार्थ कुठलीही इजा न करता वेगळ्या भांड्यात स्थानबध्द करायचे . यांच्यासोबतच करंज्या ( कानोले ) आमचा वीक पॉइंट . त्याच्यासाठी गव्हाच्या पिठाची साखर टाकून पिठी भाजतानाच आपण घरात घुटमळत राहायचं . "काऊन रुंगयरुंगय करता रे..... " असं सांगूनही फारसा फरक पडत नसे . मग एका वाटीत ती पिठ्ठी मिळाली की ब्रह्मानंदी टाळी..... असं जाता येता सुरु ठेवायचं . "काट्टयायच्या तोंडायले का मुस्के बांदून ठेवा आता..... " असं आईचं वाक्य आठवून बाजूला ठेवलेल्या मास्ककडे आज उगीच लक्ष गेलं .
हे सगळे पदार्थ अखजीच्या दिवशी अतिशय मानाचे . त्यांच्यासोबत कैऱ्या शिजवून केलेला आमरस, पुरणपोळी, भात ,भजे, वडे ,पापड ,एखादी भाजी अन कढी . याशिवायही काही पदार्थ असत, ते इतके की काहींना ताटात जागा न मिळाल्याने बाहेर ताटकळत बसावं लागायचं. पण हे सगळं आपल्या नशिबात किंवा ताटात यायला वेळ लागत असे. कारण अखजीच्या दिवशी पूर्वजांना नैवद्य दाखवून म्हणजेच पत्रावळीवरील सर्व खाद्यपदार्थाचा नैवेद्य पेटलेल्या गोवऱ्यांवर विडयाच्या पानाने तूप टाकून त्यावर टाकणे नंतर पितरांचे दर्शन . गोवऱ्यांवर हे सगळं टाकल्याने तो धूर मिश्रित सुगंध अजूनही ताजाच वाटतो . पितरांचे जेवण झाल्यानंतरच मग सर्व पानांच्या पाया पडून जेवायला बसावं लागायचं . या अखजीच्या दिवशी सुगंधी वाह्या ( वाळवा ) नव्याकोऱ्या लाल घागरीत टाकून त्यातलं गार पाणी जातायेता पीत राहणे एक वेगळीच पर्वणी राहायची . त्याची जागा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात येणाऱ्या विविध फ्लेवरचे शरबतं अजून तरी घेऊ शकलेले नाहीत . " अरे का डचंडचं पानीच पेत राह्यता ? " असं घरात मोठ्यांनी कितीही म्हटलं तरी दोन -तीन घोटात ते गार गोड -पाणी प्यायचं आणि थेट पळत सुटायचं बाहेर .अखजीच्या दिवशी शाळा लॉकडाऊन अन मित्रांमधलं सोशल डिस्टन्सिंग अदृश्य . आता रोज आरओ मशीनने फिल्टर्ड शुद्ध पाणी फ्रीजमध्ये ठेवून चिल्ड वॉटर सहज उपलब्ध आहे पण त्याला 'तो ' मातीचा गंध मात्र अजिबात जाणवत नाही .
अखजीच्या दिवशी आमच्या बालपणीचा अजून एक आवडता कार्यक्रम म्हणजे गावात विविध ठिकाणी चालणाऱ्या ताशपत्त्यांच्या डावांचे निरीक्षण करणे . विविध सणांच्या वेगवेगळ्या परंपरा असतात तसे आमच्या गावातही अखजीला पैशांनी पत्ते खेळणे ही एक द्रुढ परंपरा . जुगार तसं अप्रतिष्ठेचं लक्षण . हे मान्य असणारेही या दिवशी या खेळात सामील होत असत .अगदी गावातील लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी पत्त्यांच्या डावात बसलेले हमखास पाहायला मिळत . या खेळाची नियमावली अन आचारसंहिता स्थळसापेक्ष असते . वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे संकेत निश्चित झालेले आहेत . आमच्या गावात परेल (तीन पानी )हा पत्त्यांचा खेळ राहायचा . निव्वळ परंपरा आणि मनोरंजन हा प्राथमिक उद्देश आणि पैशांची हारजीत दुय्यम .मग एकाच डावात भाऊ -भाऊ, बाप-लेक, साले- जावई, मालक- नोकर, मित्र-मित्र क्वचितप्रसंगी एकमेकांशी अबोला असणारे पण गुण्यागोविंदाने खेळतांना दिसत असत .बसस्टँडवर चिंचेच्या झाडाखाली, एखाद्या गोठ्यात, जवळपास एखाद्या शेतात हे डाव बसलेले राहायचे. भर उन्हात दिवस दिवसभर पत्त्यांच्या डावात तल्लीन होऊन खेळणारे लोक या अखजीच्या दिवशी पाहायला मिळायचे . या खेळात लावले जाणारे पैसे वाढत वाढत जाऊन कधी कधी ढीग जमा व्हायचा आणि स्वतःसाठी किंवा मुलांसाठी कधी पैसे खर्च करताना न दिसणारे लोकसुद्धा अतिशय असंवेदनशीलपणे डावात नोटा फेकताना पाहून आपलेच डोळे विस्फारत असत . बाहेरून पाहता पाहता आपल्यालाही खेळता यावे म्हणून लहान मुलांच्या डावात आम्ही सहभागी व्हायचो आणि पुढे पुढे घरातल्या घरात सर्व भाऊ उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये एकत्र आल्यानंतर या खेळाचा आम्ही आनंद घेत असतो .त्या दिवशी भर उन्हात झळांमध्ये तासनतास ही मंडळी सर्व काही विसरून या खेळात मग्न व्हायचे .काही ठिकाणी हे पत्त्यांचे डाव प्रायोजित केले जात . मग प्रत्येक डावातून तो आयोजक ठराविक रक्कम काढून ठेवत असे, त्याला 'नाल' म्हणत . खेळ संपल्यावर हारजीतचा हिशेब केल्यावर हा 'नाल' काढणारच बऱ्यापैकी नफ्यात राहत होता . हा डाव सुरू असताना सर्व खेळाडूंना जाग्यावर पाणी, शीतपेये तसेच बिड्या -काड्या ,तंबाखू-पुड्या आणि तत्सम स्टॅमिनावर्धक पदार्थांची जाग्यावर उपलब्धता करून देण्याचं काम त्या आयोजकाकडेच राहायचं . मग खेळणाऱ्यांच्याकडून ते पुरवणाऱ्या व्यक्तीला वेगळी टीप पैशांच्या स्वरूपात दिली जायची . खेळणाऱ्यांनी या पत्त्याच्या डावात आपल्या काही विशिष्ट परंपरा दृढ करून ठेवलेल्या पाहायला मिळत . म्हणजे पत्ते पाहण्याअगोदर डोळे मिटणे, पत्त्यांचं दर्शन घेणे, खेळ चालू असताना चुकून एखादा बाहेरचा माणूस किंवा मुलगा मागे उभा राहिला तर त्याला रागावणे, एखादा डाव जिंकल्यावर ठराविक रक्कम काढून ठेवणे, एक डोळा बंद करून पत्ते पाहणे इत्यादी नमुने पाहायला मिळत . परेलचा खेळ चालू असताना खेळाडूंचे आपसातील संवाद म्हणजे एक प्रकारचे शास्त्रच . "बिलांगीत ख्याले मज्या येते आपल्याले,अशे यका हातावर पत्ते पाह्यनारे भेकाळ रायतात..... " एरवी घरातलं एखादं भांडं पडण्याचा आवाज आला तरी बाहेर पळणारा वासुदेव पत्त्याच्या डावात एखाद्या शूरवीराप्रमाणे वावरत असतो .
लॉकडाऊनचं कारणंच झालं पण तसंही हे निथळ गावपण दूर गेलं असं नाही वाटत तुम्हाला ? अखजीच्या सणासोबतच हे मातीतलं जगणं मिळेल का पुन्हा अनुभवायला ?
----------------------------------------
*©अरविंद शिंगाडे*
*खामगाव जि. बुलडाणा*
*9423445668*
*arvind.shingade@gmail.com*
*रविवार दि .२६ एप्रील २०२०*
Comments
Post a Comment