वाचाल तर वाचाल
*छत्रपती शिवाजी महाराजांना वाचा*
छत्रपती शिवाजी महाराज की...हे शब्द कानावर पडताच ज्यांच्या मुखातून आपोआप 'जय' बाहेर पडतो,रक्त सळसळते,छाती अभिमानाने फुगते,अंगावर सर्रकन काटा येतो अशा मराठाबहुजन बंधू आणि भगिणींनो,
एक राजा जो रयतेसाठी जगला,
एक योद्धा जो अन्यायाविरूद्ध लढला,
एक नेता जो लोकहितासाठी झटला,
एक असामान्य माणूस ज्याने गुलामी नाकारून स्वराज्याला जन्म दिला....
होय त्या महापुरूषाची,
महाराष्ट्राच्या आराध्यदैवताची,
आखिल भारतीयांच्या स्फूर्तीदायी दैवताची,
छत्रपती शिवाजी महाराज यांची आज पुण्यतिथी
शिवजयंती असो अथवा पुण्यतिथी
अर्थातच
आखिल बहुजन माणसांसाठी एक उत्सव.
शिवजयंतीचा दिवस असो की पुण्यतिथीचा हा आपल्या सर्वांसाठी मोठ्या उत्साहाचा अन् अभिमानाचा दिवस होय.
ज्या राजाचे जीवनकार्य तुम्हा आम्हाला प्रत्येक क्षणाला प्रेरणा देते,
ज्या राजाचे चरित्र तुम्हा आम्हाला जगण्यासाठी ऊर्जा देते,
ज्या राजाचे गुण तुम्हा आम्हाला जीवनाची दिशा देतात.
त्या राजाला डोक्यावर आणि त्याचबरोबर डोक्यात आपण घेणारच यात कोणतीही शंका नाही.
शिवजन्मापुर्वीचा काळ होताच फार भयंकर.
जन्म घ्यायचा गुलामगिरीत, जगायचे गुलामगिरीत अन् मरायचेही गुलामगिरीत.
अशा दुष्टचक्रात पिढ्यान् पिढ्या मरत होत्या.
या काळात कोणी विरोधात 'ब्र' जरी काढण्याचा प्रयत्न केला तर त्याला एक तर मरणयातना मिळायच्या किंवा थेट मरणच.
मग कोण करणार हिंमत?
कोण मागणार स्वातंत्र्य?
अशा अन्यायरूपी अंधकाराच्या काळोखात बुडालेल्या भुमीवर एक तेजस्वी प्रकाशकिरण अवतरतो जो अवघी भुमी प्रकाशमय करतो,भुमीवरील प्रत्येक रयतेच्या चेहऱ्यावर हास्यछटा उमलवतो.
शिवनेरीवर रयतेच्या राजाने जन्म घेतला.
तो दिवस होता फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१
१९ फेब्रुवारी १६३०
माता जिजामातेने शिवरायांवर लहानपणापासूनच सत्यासाठी, न्यायासाठी लढायला शिकविले.
माझ्या बांधवांना गुलामगिरीतून मुक्त करायचेच हाच उद्देश डोळ्यासमोर,हृदयात ठेवून सह्याद्रीच्या कड्याकपारींच्या प्रदेशात भटकंती करून शिवरायांनी सवंगडी गोळा केले,तानाजी,नेताजी,येसाजी, बाजी,सूर्याजी यांसारखी जीवाला जीव देणारे मावळे जमवले,
श्री रायरेश्वराच्या साक्षीने हिंदवी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली.हर हर महादेव ही गर्जना आसमंतात घुमली.
स्वराज्यस्थापनेचा प्रवास सुरु झाला.
शिवाजी महाराजांनी शौर्य,कल्पकता,संघटना कौशल्य,राजधर्मपालन, स्त्रीदाक्षिण्य आदि गुणांनी ५ शतके पारतंत्र्यात पडलेल्या या भुमीला स्वातंत्र्य मिळवून दिले.
आज ३०० पेक्षा जास्त वर्षे होऊनही महाराजांचे कार्य, पराक्रम,विचार यांची प्रेरणा ताजीच आहे.
शिवकालापुर्वी,शिवकाल समांतर आणि शिवकालानंतर अनेक राजे ,महाराजे,सुलतान होऊन गेले.त्या इतर राजांशी तुलना केली तर शिवाजी राजांचे स्वराज्य विस्ताराने फार मोठे नव्हते,परंतु तरीही इतर असंख्य राजांपेक्षा,सुलतानांपेक्षा सर्वांत जास्त पोवाडे गायले गेले ते आपल्या शिवबाचे.
याचे कारण आहे शिवरायांचा महत्त्वाचा गुण....
प्रजाहितदक्षता.
प्रजेला कोणताही त्रास होता कामा नये हा विचार घेऊन स्वराज्यनिर्मिती करणाऱ्या राजा शिवाजींना मानाचा मुजरा.
प्रजेवर मुलांप्रमाणे प्रेम करणाऱ्या माझ्या शिवबाकडून आजच्या काळातील नेत्यांनी,लोकप्रतिनिधींनी आदर्श नक्कीच घेतला पाहिजे.
प्रजेचे हित जोपासता यावे यासाठी स्वकीय नातेवाईकांशीही दोन हात करणाऱ्या माझ्या शिवबाचा आदर्श आजच्या पुढाऱ्यांनी घेतला पाहिजे.
फक्त शिवजयंती आली की महाराजांचा जयजयकार करण्यापेक्षा जीवनातील प्रत्येक क्षण महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन व्यतीत केला पाहिजे.
केवळ गाडीवर छत्रपती ,दुकानावर आणि अंगात घातलेल्या शर्टवर महाराजांचे नाव लिहिले म्हणजे शिवभक्त होत नाही, तर खरा शिवभक्त होण्यासाठी शिवरायांच्या विचारांचे मेंदूत पुजन केले पाहिजे,शिवरायांच्या जीवनकार्याचे सदैव स्मरण केले पाहिजे,शिवरायांच्या गुणांचे जीवनात अवलंबन केले पाहिजे तर आणि तरच आपल्याला खरे शिवराय कळले असे म्हणता येईल.
चला तर शिवरायांच्या विचारांवर जगुया,शिवरायांच्या विचारांवर समाज घडवूया तर आणि तरच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना खरा मानाचा मुजरा ठरेल.
छत्रपती शिवाजी महाराज की....जय.
Comments
Post a Comment