शिवनिती
महापुरुष व्यक्ती परिचय.
भाग ९
राजमाता जिजामाता, ( जिजाऊ , माँ साहेब )
राजमाता जिजाऊ, आम्हाला आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्मले पाहिजेत, पण त्यासाठी अगोदर आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणाऱ्या राजमाता,राष्ट्रमाता जिजाऊ जन्मला यायला पाहिजेत. ‘हे आई छत्रपती शिवाजी महाराजप्रमाणे पुत्र माझ्यापोटी जन्माला यावा’ असे प्रत्येक महिलेची अशी विचार सरणी ठेवूनच खालील संपूर्ण लेख वाचावा.
राजमाता जिजाऊ ह्या हिंदवी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या. राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा जन्म सिंदखेड, जिल्हा बुलढाणा येथील भुईकोट राजवाड्यामध्ये दि १२ जानेवारी १५९८ रोजी झाला. आकर्षक भव्य प्रवेशद्वार असणारा हा राजवाडा सिंदखेडराजा नगरीमध्ये, मुंबई-नागपूर हायवेला लागुनच आहे. याच वस्तूसमोर नगर पालिका निर्मित एक बगिचा देखील आहे. येथे राजे लखुजीराव जाधवांचे समाधीस्थळ आहे. ही भव्य वस्तू भारतातील संपूर्ण हिंदुराज्यांच्या समाधीपेक्षा मोठी वास्तू आहे. ज्या ठिकाणी राजमाता जिजाऊंनी रंग खेळला, तो महाल म्हणजे रंगमहाल. याच महालात शहाजीराजे आणि जिजाऊंच्या विवाहाची बोलणी करण्यात आली होती.आज हे स्थळ सिंदखेडराजा हे केवळ ऐतिहासिक स्थळ नाही तर एक जगप्रसिद्ध असे पर्यटन स्थळ म्हणून देखील ओळखले जाते.
येथे नीलकंठेश्वराचे प्राचीन मंदिर आहे, या मंदिरामध्ये संपूर्ण पाषाणातून साकारलेले हरीहराचे सुंदर शिल्प आहे, तर राजे लखुजीराव जाधवांनी मंदिराचे पुर्नजीवन केल्याचा शिलालेख येथे कोरलेला आहे. या मंदिरासमोरच चौकोनी आकारात तळापर्यंत उतरण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था असणारी एक भव्य बारव आहे. तर ८व्या ते १० व्या शतकातील अतिप्राचीन असे हेमाडपंथी रामेश्वर मंदिर आहे.
राजेराव जगदेवराव जाधवांच्या कार्यकाळात भव्य किल्यांच्या निर्मितीची सुरवात झाली होती त्याचचं एक सुंदर उदाहरण म्हणजे काळाकोठ. अतिभव्य आणि मजबूत अशा या काळाकोठच्या भिंती २० फुट रुंद आणि तेवढ्याच उंच आहेत. यासोबतच साकरवाडा नावाचा ४० फुट उंच भिंतीचा परकोट येथे बघायला मिळतो, त्या परकोटावर निगराणीसाठी अंतर्गत रस्ता, आतमध्ये विहीर, भुयारी तळघरे, भुयारी मार्ग आहेत. तर या वस्तूचे प्रवेशद्वार देखील अतिसुंदर आहे.
मोतीतलाव म्हणजे सिंचनासाठी पाणी सोडण्याची अति सुव्यवस्थीत आणि त्या काळातील जल अभियांत्रीकीचा अतिउत्कृष्ट नमुना आहे. या तलावाच्या समोरील भाग एका किल्ल्याप्रमाणे बांधण्यात आला असून, विलोभनीय असा परिसर याला लाभला आहे. मोतीतलावाबरोबरच, चांदणी तलाव हे देखील एक प्रेक्षणीय स्थळ आहे. तलावाच्या मधोमध तीन मजली इमारत बांधण्यात आली आहे. या परिसरात अतिशय रेखीव पद्धतीने बांधण्यात आलेली पुतळाबारव आहे. ही म्हणजे असंख्य मूर्ती व शिल्पांचा एकत्र वापर करून बनविलेली देखणी शिल्पकृती. तसेच येथे एक सजनाबाई विहीर आहे, त्या काळी या विहिरीतून गावामध्ये पाणी पुरवठा भुमिगत बंधिस्त नाल्यांच्याद्वारे केल्या जात होत्या, या विहरीत आतपर्यंत उतरण्यासाठी पायऱ्यांची सुविधा देखील आहे
राजमाता जिजाबाई ह्यांची इतर नावे जिजामाता, जिजाऊ, राजमाता, माँसाहेब यांचा जन्म अशा वरील प्रकारे सर्व वैभव लाभलेल्या पवित्र स्थळी दि १२ जानेवारी १५९८ रोजी राजे लखुजीराव जाधव ह्यांच्या राजघराण्यातील सिंदखेडराजा ह्या गावी, जिल्हा बुलढाणा येथे झाला.
ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. सिंदखेडचे लखुजीराव जाधव हे राजमाता जिजाबाईंचे वडील तर आईचे नाव म्हाळसाबाई उर्फ गिरीजाबाई असे होते. लखुजीराव जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. राजमाता जिजाऊ सिंदखेड राजा येथे जाधव वाड्यात खेळत असत, आज देखील त्यांचा वाडा काही भाग पहायला मिळतो, त्याच वाड्यात लहानपणापासून राजमाता जिजाऊ ज्या महालात रंग खेळत असत त्या महालाला रंगमहाल नावाने प्रसिद्ध आहे. अशा राज घराण्याचा वारसा लाभलेल्या राजमाता जिजाऊ ह्यांचा डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये शहाजीराजे भोसले यांच्याशी दौलताबाद येथे विवाह झाला. अनेक ठिकाणी शिवरायांसमवेत जिजाबाईंचा पुतळा आहे.
राजमाता जिजाऊ ह्यांचे सासरकडचे पूर्ण नाव जिजाबाई शहाजीराजे भोसले (वडीलकडील जिजाबाई लखुजीराव जाधव ) असे होते. त्यांच्या मातोश्री / आई म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई लखुजीराव जाधव ह्या आहेत. तर राजमाता जिजाऊ ह्यांना अनुक्रमे संभाजीराजे शहाजीराजे भोसले व छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजेभोसले असे पुत्र रत्न होते.
पुढे लखुजीराव जाधव व शहाजीराजे भोसले यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला, एकदा एक हत्ती पिसाळला होता, हत्तीस पकडण्यास २ पथके तयार केली. पहिले जाधवांचे त्याचे नेतॄत्व दत्ताजीराव जाधव लखुजी जाधव यांचा मुलगा व जिजाबाई यांचा भाऊ. दुसरे पथक भोसले यांचे त्याचे नेतृत्व शरफोजी भोसले शहाजीराजे भोसले यांचे बंधू करत होते. यात दोघांचे भांडण झाले व भोसले यांनी दत्ताजीराव जाधवास ठार केले. त्यानंतर लखुजीराव जाधव आणि भोसले यांच्या मध्ये वाद निर्माण झाला व या प्रसंगानंतर राजमाता जिजाबाईंनी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहत आपल्या माहेराशी संबंध तोडले.
‘ नात्यांना, भावनांना बाजूला सारून आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीरपणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा’ राजमाता जिजाबाईंचा हा गुण शिवाजी राजांत पुरेपूर उतरला होता. एकवेळ लखुजीराव जाधव राजमाता जिजाऊंच्या परगण्यातील भागावर चाल करून आले, त्यावेळी राजमाता जिजाऊ ह्यांनी स्वतः हातात तलवार घेऊन आपल्या वडिलांच्या विरोधात लढायला कंबर कसून उभ्या राहिल्या आणि त्यामुळेच रयतेचे स्वराज्य घडवूनच दाखवले. ह्यावरून राजमाता जिजाऊ ह्या स्वराज्यासाठी आपल्या नात्यांना देखील मुलाहिजा राखत नव्हत्या, म्हणजे स्वराज्याचे स्वप्न किती महान बघितले ह्यावरून लक्षात येते.
राजमाता जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये होती, असे समजते. त्यापैकी सहा मुली वारल्या.(या बाबत नावांचा उल्लेख सापडत नाही) व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजीराजे हा शहाजीराजे राजांजवळ वाढला तर छत्रपती शिवाजी महाराजांची संपूर्ण जबाबदारी राजमाता जिजाबाईंवर होती.
राजमाता जिजाबाईंना पहिले अपत्य झाले त्याचे नाव तो सहा महिन्याचा झाल्यानंतर संभाजीराजे ठेवले. काही वर्षाचा काळ निघून गेला. आणि दि १९ फेब्रुवारी १६३०, फाल्गुन वद्य तृतीया, शके १५५१ या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी डोंगरी किल्ल्यावर राजमाता जिजाबाई यांना मुलगा झाला. मुलाचे नाव किल्ल्यावर असलेल्या शिवाई देवीच्या नावावरून छत्रपती शिवाजीराजे असे ठेवले.
आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान , चारित्र्य , चातुर्य , संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमाता जिजाबाई! हिंदवी स्वराज्याच्या आड येणाऱ्या भेकडांशी लढण्याचं धैर्य शहाजीपुत्र छत्रपती शिवरायांना मिळालं ते राजमाता जिजाऊंच्या निडरपणे जगण्याच्या संस्कारांतून. राजे सिंदखेड वतनाचे ( सध्याच्या बुलढाणा जिल्ह्यातील ) पाच हजारी मनसबदार लखोजीराव जाधव आणि म्हाळसाबाई यांच्या पोटी जिजाऊंचा जन्म झाला . कर्तृत्ववान पित्याच्या पराक्रमाचे पोवाडे पाळण्यात असल्यापासून राजमाता जिजाऊंच्या कानावर होते, पण वयासोबत पारतंत्र्याची जाणीवही वाढत गेली आणि लाचारीच्या व फितुरीच्या रोगाचा त्या मनापासून ज्या वयात बाहुल्यांचा खेळ मांडून संसाराची तालीम करण्यात मुलं दंग असतात , त्या वयात जिजाऊ तलवारीची मूठ घट्ट पकडण्यात दंग होत्या . लष्करी प्रशिक्षणासाठी लखोजींकडे हट्ट करणाऱ्या राजमाता जिजाऊंना शूरवीरांच्या कथा ऐकून स्फुरण चढे . म्हाळसाईंनी आपल्या लेकीला अशा कथा सांगून त्यांच्या शूरपणाला प्रोत्साहन दिले. लोकांनी गुलाम व्हावे, मुसलमानी साम्राज्याची इमाने इतबारे चाकरी करावी आणि मनसबदार, वतनदार व्हावे. ज्ञानी माणसांनी आपल्याच माणसांची घरे लुटून शत्रूने किती कमाई केली याचा हिशेब शत्रूलाच सांगावा. कलाकारांनी आपल्याच माणसांची फजिती रंगवून - रंगवून शत्रूला ऐकवावी. सगळंच विपीरीत घडत होतं. शत्रूचे सरदार आया - बायांची अब्रु वेशीवर टांगत होते. मुलींचा लिलाव होत होता. स्वातंत्र्य कशाला म्हणतात हे विसरून गेलेला समाज निमूटपणे सगळे अत्याचार सहन करत होता. शेतकऱ्यांची तर याहून वाईट अवस्था होती. पिकवावं आपण आणि कणगी मात्र बादशहाची भरावी. घाम गाळावा पण पोट भरू नये. समाजाची ही दयनीय अवस्था राजमाता जिजाऊंना बघवत नव्हती. त्यांना या अन्याय - अत्याचार विरुद्ध लढणारा वीर पाहायचा होता.
राजमाता जिजाऊ ह्यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे १४ वर्षाचे असताना शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याची आपल्या अधिकारात जहागीर सुपूर्त केली. अर्थातच आदिलशाहीच्या जहागीरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली. कुशल अधिकार्यांसमवेत राजमाता जिजाबाई आणि छत्रपती शिवाजी महाराज पुण्यात येऊन दाखल झाले. दख्खनच्या भागात राजसत्ता असणाऱ्या निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वार्यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दादोजी कोंडदेव यांच्या सोबत नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला. प्रतिकात्मक सोन्याचा मुलामा नांगर छत्रपती शिवराय व विश्वासू मावळ्यांना सोबत घेऊन त्यांनी शेतजमीन नांगरली, स्थानिक लोकांना अभय दिले. छत्रपती शिवाजी राजांच्या शिक्षणाची जबाबदारी राजमाता जिजाऊ ह्यांनी यशस्वीपणे पेलली. राजमाता जिजाबाईंनी छत्रपती शिवाजी महाराजाला पारतंत्र्यात सुरू झालेल्या आणि स्वातंत्र्यात संपलेल्या रामायण, महाभारतातील गोष्टी सांगितल्या. सीतेचे हरण करणार्या रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता, बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता, वगैरे-वगैरे. राजमाता जिजाबाईंनी दिलेल्या या संस्कारांमुळेच, छत्रपती शिवाजीराजे घडले. राजमाता जिजाबाईनी नुसत्याच गोष्टी सांगितल्या नाहीत तर सदरेवर शेजारी बसवून राजकारणाचे पहिले धडेही दिले आणि आपण पाहिलेले स्वराज्य घडवले.
छत्रपती शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच राजमाता जिजाबाईंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले . शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वतः बारकाईने लक्ष ठेवले . शहाजीराजांची कैद व सुटका, अफझलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगांत छत्रपती शिवरायांना राजमाता जिजाबाईंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना, खुद्द राजमाता जिजाबाई राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत. आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत. सदरेवर बसून स्वतः तंटे सोडवत.
शहाजीराजे भोसले बंगळूरात वास्तव्यास असतांना छत्रपती शिवाजी महाराजांची चोख जबाबदारी राजमाता जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पेलली. राणीसाहेब सईबाईंच्या पश्चात स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजांचीही संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली. राजांच्या प्रथम पत्नी, सईबाईंचे भाऊ बजाजी निंबाळकर यांना जुलमाने बाटवण्यात आले होते. त्यांची हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा होती, राजांचाही त्याला पाठिंबा होता. या धर्मराजकारणात राजमाता जिजाबाई ह्या महाराजांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्या. एवढेच नव्हे तर महाराजांची राजकन्या सखुबाईंना, बजाजी निंबाळकरांच्या मुलाला देऊन त्यांनी राज-सोयरीक साधली आणि बजाजींना पूर्णपणे धर्मात परत घेतले. या संपूर्ण प्रकरणात त्यांचा दूरदृष्टी व सहिष्णूता दिसून येते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व स्वार्यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत. त्यांच्या खलबतांत, सल्ला मसलतीत भाग घेत. महाराजांच्या गैरहजेरीत स्वतः राज्याची धुरा वहात. छत्रपती शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना राज्याची पूर्णत: जबाबदारी उतारवयातही राजमाता जिजाबाईंनी कौशल्याने निभावून नेली.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना दि ६ जून १६७४ रोजी दुर्गदुर्गेश्वर रायगड किल्ल्यावर समारंभ पार पडला. हा कार्यक्रम आयोजित होण्यासाठी आयुष्यभर स्वप्न पाहणाऱ्या राजमाता जिजाऊ ह्यांनाच सर्व श्रेय जाते. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेल्या निर्णयात स्वराज्य हिताचा बदल करायचा अधिकार फक्त आणि फक्त राजमाता जिजाऊ ह्यांनाच होता.
छत्रपती शिवरायांचे आठ विवाह करण्यामागे देखील, विखुरलेल्या मराठा समाजाला एक करणे हाच त्यांचा दूरगामी उद्देश्य असावा असे वाटते. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. राजमाता जिजाऊ ह्या खरोखरच जगप्रसिद्ध आदर्श माता आहेत. आपल्या मुलांना धैर्य , परोपकार , आत्मविश्वास , शौर्य , न्याय , निर्भय , राष्ट्रप्रेम, जनतेची सेवा या सर्वांचे धडे देण्याचे व त्यांच्यात संस्कार देण्याचा सामर्थ्य प्रत्येक आईमध्ये असतं. स्त्रीने आपली शक्ती ओळखून उज्ज्वल भविष्य निर्मितीसाठी प्रयत्न केलेच पाहिजे. आणि ते सर्व राजमाता जिजाऊ ह्यांनी करून दाखवले.
भवानी आईला जिजाऊंचं हे मागणं पूर्ण करणं भाग होतं , कारण जे दुःख राजमाता जिजाऊचं होतं तेच दु:ख भवानी मातेचं होतं . तिचा धर्म बुडत होता. तिची मंदिरं पाडली जात होती ,देवदेवतांच्या मूर्ती तोडल्या जात होत्या . तिलाही एक कर्तृत्ववान जीव जन्माला घालण्यासाठी समर्थ आई हवी होती . दोघींच्या गरजा एक होत्या . लक्ष्य एक होते . स्वप्न एक होते . या स्वप्नाचा परिपाक म्हणून राजमाता जिजाऊंच्या पोटी जगप्रसिद्ध असे छत्रपती शिवरायांचा जन्म झाला आणि शिवजन्मासोबत हिंदवी स्वराज्याच्या पायाभरणीला सुरुवात झाली. बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता . अशा प्रत्येक गोष्टीत त्यांनी पराक्रमी पुरुषाला भगवंताचे स्थान दिले , तर स्वातंत्र्याला ध्येयाचे स्थान दिले.
राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी दि १७ जून, १६७४ ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला, आपल्या वयाच्या साधारण ८० व्या वर्षी राजमाता जिजाबाईंचे दुर्गेदुर्गेश्वर किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी वृद्धापकाळाने निधन झाले, या पाचाड गावी राजमाता जिजाबाईंची समाधी आहे.
राजमाता जिजाबाई ही आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्या जगातील एकमेव अशा राजमाता होय.
अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ ह्यांचा पुन्हा जन्म व्हावा अशी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना. कारण राजमाता जिजाऊ तुमच्या काळात होत असलेला अन्याय, अत्याचार, बलात्काराच्या जाळ्यात अडकल्या जाऊन आज आमच्या महिला भगिनी, माता त्रास भोगत आणि सोसत आहेत. त्यासाठी आपला जन्म व्हावा हीच प्रार्थना.
शिवनिती भाग...९
Comments
Post a Comment