#कोल्हापूर उर्फ करवीर संस्थान-
#भाग- ५
#कोल्हापूरातील_सत्तांतर-
अनेक मराठा सरदार ताराबाईंच्या पक्षातून शाहूमहाराजांच्या पक्षात सामील झाले. परंतु वाडी कुडाळचे खेमसावंत भोसले आणि सिधोजी घोरपडे मात्र ताराबाईंच्याच पक्षात राहिले. खेमसावंतांच्या मदतीने ताराबाईंनी आपला फौजफाटा परत जमवून मालवणहून प्रथम रांगण्याकडे आणि तिथून पन्हाळ्याकडे मोर्चा वळवला. पन्हाळ्यावर असलेल्या शाहूमहाराजांच्या तुटपुंज्या शिबंदीचा ताराबाईंच्या सैन्यापुढे निभाव लागला नाही. विशेष प्रतिकार न होता पन्हाळगड आणि कोल्हापूरचा परिसर परत एकदा ताराबाईंकडे आला.
शाहूमहाराजांकडून पन्हाळा, कोल्हापूरवर परत कब्जा करणे, ही ताराबाईंच्या आयुष्यातील महत्त्वाची घटना म्हणता येईल. पन्हाळा आणि कोल्हापूर ही दक्षिणेकडील मोक्याची ठिकाणे ताराबाईंच्या हाती पडल्यामुळे त्यांचे बळ वाढू लागले. शाहूमहाराजांचे लक्ष आता मोगलांच्या हालचालींकडे केंद्रित झाले होते. १७१० साली महाराणी ताराबाईंनी आपल्या कोल्हापूरच्या स्वतंत्र मराठा राज्याच्या स्थापनेची द्वाही फिरवून, त्यावर आपले पुत्र शिवाजीराजे यांची सार्वभौम राजे म्हणून घोषणा केली. ताराबाईंची सरशी होतेय, असे पाहून त्यांच्यापासून दूर गेलेले अनेक मराठा सरदार परत मराठा कोल्हापूरच्या मराठा राज्यात सामील होऊ लागले. रामचंद्रपंतांनी पन्हाळा, रांगणा आणि सभोवतालच्या परिसरातील गडकिल्ल्यांचा बंदोबस्त करुन शिवाजी राजे द्वितीय यांच्या सत्तेला बळकटी देण्याचे धोरण चालू ठेवले. मध्यंतरी सावंतवाडीच्या खेमसावंतांनी अचानक ताराबाईंचा पक्ष सोडून शाहूमहाराजांच्या पक्षात सामील झाले आणि ताराबाईंना उपद्रव देण्याचा उद्योग त्यांनी सुरु केला. ताराबाईंनी आंग्र्यांच्या मदतीने सावंतांचा पराभव करुन दक्षिण महाराष्ट्रातील उरला सुरला विरोधही नष्ट केला.
ताराबाईंनी मराठा राज्याच्या छत्रपतींच्या दुसऱ्या पातीची शाखा कोल्हापूरात स्थापन करुन राज्याला बळकटी आणण्याचा प्रयत्न सुरु केला परंतु राजाराममहाराजांच्या द्वितीय पत्नी राजसबाई यांच्या गटाची ताराबाईंशी धुसफूस चालू होती. या काळात कोल्हापूर राज्यात रामचंद्रपंत अमात्य यांच्यासारखा कर्तबगार आणि निष्ठावान पुरुष दुसरा नव्हता. ताराबाईंना अलीकडे मिळालेल्या यशामुळे जशी कोल्हापूर राज्याला बळकटी आली तद्वतच त्यांच्या अरेरावी स्वभावामूळे सरदारांची, सेनाधिकाऱ्यांची मुस्कटदाबी होऊ लागली. कोल्हापूर राज्याच्या स्थापनेपासून म्हणजे १७१० सालानंतर बिघडत चाललेल्या एकंदर परिस्थितीचे गांभीर्य प्रथम रामचंद्रपंतांना उमजले. ताराबाई आणि शिवाजीराजे द्वितीय यांच्या शासनाखालील राज्याचे भवितव्य पंतांना सुरक्षित वाटेना. त्यांनी इतर जबाबदार व्यक्तींच्या सल्ल्याने सप्टेंबर १७१४ मध्ये कोल्हापूर राज्यात सत्तांतर घडवून आणले. राजाराममहाराजांच्या द्वितीय पत्नी राजसबाई यांच्या हातात कोल्हापूरच्या कारभाराची सुत्रे देऊन त्यांचा पुत्र संभाजी द्वितीय यास कोल्हापूर छत्रपतीपद दिले. ताराबाई आणि शिवाजी द्वितीय यांना बंदिवासात टाकले गेले.
संभाजी द्वितीय (कोल्हापूर) यांची राजकीय कारकिर्द इ.स. १७१४ ते १७६० अशी झाली. संभाजीराजे द्वितीय (कोल्हापूर) आणि शाहूमहाराज यांच्या फौजांमध्ये एकूण चार लढाया झाल्या. शेवटची लढाई १७३१ मध्ये झाली. वारणा नदीच्या काठी झालेल्या या लढाईत संभाजीराजे (कोल्हापूर) यांचा निर्णायक पराभव झाला. वारणाच्या लढाईनंतर साताऱ्याच्या प्रतिनिधींनी संभाजीराजे (कोल्हापूर) यांचा सरंजाम साताऱ्याला नेला. प्रतिनिधींनी शाहूमहाराजांच्या सांगण्यावरुन राणी राजसबाई आणि इतर स्त्रिया यांना पन्हाळगडावर सुखरूप पोहोचवले. ताराबाईंंची पन्हाळ्याला जाण्याची इच्छा नसल्याने त्यांच्या इच्छेप्रमाणे शाहूमहाराजांनी त्यांना आपल्या बरोबर साताऱ्याला नेऊन त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली. पुढची एकतीस वर्ष मृत्यूपर्यंत ताराबाई पन्हाळ्याला गेल्या नाही.
शाहूमहाराजांची मोगलांच्या कैदेतून सुटका झाल्यापासून सतत पस्तीस-चाळीस वर्षे सातारा आणि कोल्हापूर राज्यकर्तांमध्ये संघर्ष चालू होता. मोगल राज्यकर्त्यांची सत्तेसाठी सख्ख्या भावांमध्ये एकमेकांच्या जिवावर उठण्याची परंपरा शाहूमहाराजांना परिचित होती. त्यांचे अनुकरण न करता शाहूमहाराजांनी वारणेची लढाई जिंकूनही संभाजी राजे द्वितीय (कोल्हापूर) यांच्याबरोबर तह केला तो सर्व राजशिष्टाचार सांभाळूनच. १३ एप्रिल १७३१ रोजी कराडजवळ कृष्णेकाठी हा तह झाला. या तहान्वये सातारा आणि कोल्हापूर राज्याच्या सीमा नक्की करण्यात आल्या. तुंगभद्रेपासून रामेश्वरापर्यंत असलेले किल्ले आणि राज्यप्रदेश निम्मे निम्मे वाटून घेण्यात आले. रत्नागिरी शाहू महाराजांकडे तर कोपल संभाजीराजे द्वितीय (कोल्हापूर) यांच्याकडे गेले. पालखेडच्या लढाईनंतर कोल्हापूर- साताऱ्यामध्ये तेढ वाढली होती. परंतु वारणेच्या तहानंतर मात्र दोन्ही राज्यांमधील संबंध सौदार्हपूर्ण झाले. विशेषतः दोन्ही राज्यकर्त्यांच्या कौटुंबिक संबंधात अनौपचारिकता आली. कौटुंबिक समारंभांमध्ये एकमेकांकडे जाणे-येणे सुरु झाले.
खरेतर शाहूमहाराज आणि संभाजीराजे (कोल्हापूर) यांच्यात राजकीय कारणांमुळे जरी तेढ असली, तरी ते एकमेकांविरुध्द अगदी टोकाचे शत्रूत्त्व करीत नसत. या बाबतीत पालखेडच्या लढाईचे उदाहरण बोलके आहे. वारणेच्या तहापूर्वी १७२८ साली झालेली ही लढाई बाजीराव पेशव्यांच्या नेतृत्वाखालील साताऱ्याची फौज आणि हैदराबादच्या निजामाची फौज यांच्यात झाली. तसे पाहावयास गेल्यास या लढाईशी संभाजीराजे (कोल्हापूर) यांचा काही संबंध नव्हता. परंतु सातारा आणि कोल्हापूर यांच्यातील दुफळी वाढविण्यासाठी निजामाने कोल्हापूरचे श्रीपतराव पंतप्रतिनिधी यांच्यामार्फत संभाजीराजांना आपल्या गोटात ओढण्याचे प्रयत्न केले. परंतु संभाजीराजांनी बाजीरावांच्या नेतृत्वाखालील शाहूमहाराजांच्या फौजेविरुध्द लढण्यास नकार दिला.
इ.स. १७०८ ते १७४० या काळात कोल्हापूर आणि सातारा या दोन मराठा राज्यातील सरदारांच्या निष्ठा बदलण्याचे प्रसंग वारंवार उभे राहिले. या दोन राजवटींमध्ये संशयाचे आणि दुहीचे राजकारण फोफावले. मोगल आणि निजाम यांनी दोन्ही मराठा राजवटींमधील ही दुफळी वाढविण्यासाठी अनेक कारस्थाने केली. वारणेच्या तहान्वये मिरज, अथणी, विजापूर वगैरे प्रदेश शाहूमहाराजांच्या अखत्यारित गेला. या भागात कोल्हापूरसाठी महसूल वसुली करणारा उदाजी चव्हाण याला हा तह पसंत पडला नाही. याचे कारण त्याचे शाहूमहाराजांशी सख्य नव्हते. तो अखेरीस निजामाला जाऊन मिळाला. संभाजीराजे द्वितीय (कोल्हापूर) यांचे निधन १७६० साली झाले. तिकडे साताऱ्यात १७६१ साली महाराणी ताराबाई यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले.
संभाजीराजे द्वितीय (कोल्हापूर) यांच्यानंतर त्यांनी खानवटकर (भोसले) घराण्यातून दत्तक घेतलेले शिवाजीराजे तृतीय (कोल्हापूर) यांची कोल्हापूरच्या गादीवर नियुक्ती केली. त्यांची कारकिर्द इ.स.१७६२ ते १८१३ अशी झाली. निपाणीच्या सिधोजीरावांनी आपल्या भागात दरारा निर्माण केला. त्यांचे शिवाजीराजांशी खटके उडून दोघांमध्ये वैमनस्य निर्माण झाले. त्यातून सिधोजीरावांनी परशुरामभाऊ पटवर्धनांकडे नोकरी धरली. पुढे त्यांनी पुण्यात दरबारी आपले वजन वाढवले. पटवर्धनांनी घातलेल्या कोल्हापूरच्या वेढ्यात सिधोजीरावांचा प्रमुख सहभाग होता. १८११ साली सिधोजीरावांनी कोल्हापूरावर चढाई करुन फौजेचा निःपात केला, कोल्हापूरचा काही प्रदेशही घेतला. या लढाईनंतर सिधोजीराव अधिक आक्रमक बनले व कोल्हापूरची अवस्था दयनीय झाली.
ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली कोल्हापूर -
कोल्हापूरातील या सर्व घटनांकडे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या आधिकाऱ्यांचे लक्ष होतेच. अशा स्थितीत करवीरकरांच्या राजकारणात प्रवेश करण्याची हि चांगली संधी आहे, हे ब्रिटिशांनी हेरुन आपले जाळे बरोबर पसरले. भारतीय द्विपकल्पाची संपूर्ण पश्चिम किनारपट्टी ताब्यात घेऊन तिथे सागरी सत्ता प्रस्थापित करण्याचा ब्रिटिशांचा प्रयत्न होता. वसईच्या तहानंतर भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील मालवण शेजारच्या सिंधुदुर्गाखेरीज सर्व महत्त्वाचे किल्ले आणि बंदरे या काळात इंग्रजांच्या अंमलाखाली आले होते. मालवण बंदर आणि अभेद्य सिंधुदूर्ग हे जंजिरा, कोल्हापूरच्या राज्यक्षेत्रात होते आणि तेथे त्यांचे प्रबळ आरमारही होते. सिधोजीरावांच्या उपद्रवामुळे हैराण झालेल्या शिवाजीराजांची (को.) यातून सुटका करुन मोबदल्यात सिंधुदुर्ग लाटायचा, असा डाव इंग्रजांनी रचला.
कंपनी सरकारचे एलफिन्स्टन यांनी कोल्हापूरकरांचे पुण्यातील वकील स्वरुप क्षीरसागर यांच्यामार्फत आपली योजना शिवाजीराजे तृतीय (को.) यांच्यापर्यंत पोहोचवली. शिवाजीराजांनाही एखादा समर्थ मित्र मिळाल्याशिवाय सिधोजीराव समस्येवर काही तोडागा सापडत नव्हता. याबाबत एलफिन्स्टनने पुढे केलेली तहाची योजना शिवाजीराजांनी मान्य केली. ही बातमी लागताच सिधोजीरावांनी तह होऊ नये म्हणून पेशव्यांकडे प्रयत्न सुरु केले. पेशवेसुद्धा हा तह होऊ नये म्हणून प्रयत्नशील होते. इंग्रजांना हा तह व्हायला हवाच होता. एलफिन्स्टन साहेबाने सरकारी कार्यवाहीची चक्रे वेगाने फिरवत तातडीने हा तह घडवून आणला.
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि कोल्हापूरचे राज्य यांच्यात हा तह १ आॕक्टोबर १८१२ रोजी करण्यात आला. या तहान्वये कोल्हापूरकरांनी सिंधुदुर्ग इंग्रजांना द्यावा आणि सिधोजीराव आणि सावंतवाडीच्या खेमसावंतांनी कोल्हापूरचे घेतलेले किल्ले आणि प्रदेश इंग्रजांनी त्यांना मिळवून द्यावा, असे ठरले. या तहाची चार कलमे होती. मालवण बंदर आणि त्याच्या परिसरातले सिंधुदुर्ग, राजकोट, पद्मगड आणि सर्जेकोट हे किल्ले इंग्रजांना मिळावेत, चिकोडी व मनोळीवरचे हक्क कोल्हापूरकरकरांनी सोडून पेशव्यांकडे द्यावेत, कोल्हापूरकरच्या राज्यकर्त्यांनी स्वतःचे आरमार आणि लढाऊ जहाज ठेऊ नये, परंतु संरक्षणासाठी ब्रिटिशांनी तैनाती फौज राखावी, इंग्रजांच्या परवानगीशिवाय कोल्हापूरकरने कोणत्याही परकीय सत्तेशी लढाई अगर हातमिळवणी करु नये आणि या चार अटींच्या मोबदल्यात इंग्रजांनी सिधोजीरावने कोल्हापूरकरकरांचा बळकावलेला प्रदेश त्यांना परत मिळवून द्यावा. आॕक्टोबर १८१२ मध्ये वरीलप्रमाणे करारांवर दोन्ही पक्षांच्या सह्या झाल्या.
या तहान्वये मालवण, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर राज्याचा इतर सागरी प्रदेश इंग्रजांकडे गेल्याने कोल्हापूरकरांची आरमारी शक्ती नष्ट झाली. इंग्रजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचे नाव बदलून सेंट आॕगस्टस केले. करारातील शेवटच्या कलमामुळे कोल्हापूरचे दुसऱ्या राज्याशी संबंध ठेवण्यावर नियंत्रण येऊन राज्याचे स्वातंत्र्यच हिरावून घेतले गेले. कोल्हापूर राज्य यापुढे ब्रिटिशांचे अंकित , संरक्षित संस्थान बनले. शिवाजीराजे तृतीय (को.) यांचे कोल्हापूरकरात २४ एप्रिल १८१३ रोजी देहावसान झाले.
शिवाजीराजांच्या (को.) मृत्यूनंतर कोल्हापूरच्या गादीवर संभाजीराजे तृतीय (को.) यांची कारकिर्द इ.स. १८१३ ते १८२१ अशी झाली. हे संभाजीराजे आबासाहेब महाराज या नावाने अधिक ओळखले जातात. मुन्सफी कोर्टसारखी न्यायालये स्थापन करुन राज्यकारभारात त्यांनी काही नव्या प्रथा सुरु केल्या. त्यांच्या काळात कंपनी सरकारचे प्रस्थही बरेच वाढले होते
(#क्रमशः)
#कोल्हापूर उर्फ करवीर संस्थान-
#संदर्भ - बखर संस्थानांची
#फोटो- नगारखाना जुना राजवाडा
Comments
Post a Comment