Skip to main content

शिवनिती भाग ०२ :- छत्रपती शिवाजी महाराजांचे सामाजिक धोरण.

चैत्र शुद्ध द्वितीया
शालिवाहन शके १९४२
दि. २६ मार्च, २०२०. गुरुवार
   शिवनीती :- भाग २
        छत्रपती शिवाजी महाराजांचे सामाजिक धोरण...
        छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू होऊन जवळपास ३५० वर्षे उलटली तरीही त्यांच्या कार्य आणि कर्तृत्वाची आठवण झाल्याबरोबर महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला अभिमान वाटतो. छ.शिवाजी महाराजांनी स्वराज्याची महाराष्ट्रात पायाभरणी करून जगासोबतच भारताला ‘स्वराज्याचा’ पहिला धडा दिला. छ.शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य आकाराने खूप लहान असले तरीही ते संपूर्ण भारतामध्ये त्याकाळी स्वतंत्र आणि सार्वभौम होते. छ. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती करीत असताना स्वराज्याचे रूपांतर सुराज्यामध्ये करण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले. म्हणून महाराष्ट्रातील अठरा पगड जातींच्या लोकांना 'हिंदवी स्वराज्य' हे आपलेच स्वतःचे स्वराज्य आहे असे वाटत होते. हिंदवी स्वराज्याच्या जडण-घडणीसाठी बारा बलुतेदार, अठरा अलुतेदार, गावकुसातील आणि गावकुसाबाहेरील प्रत्येकांनी आपले सर्वस्व छ.शिवाजी महाराजांच्या पाठीशी उभे केले. त्यामुळेच शिवाजी महाराजांच्या हयातीमध्ये हिंदवी स्वराज्यात कधीही धार्मिक दंगल अथवा धार्मिक बंडखोरी झालेली दिसत नाही. धार्मिक आणि सामाजिक सलोखा हे छ. शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे फार मोठे वैशिष्ठ्य होते. आधुनिक काळातील धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक समायोजन या दोन तत्वांना छ.शिवाजी महाराजांनी आपल्या प्रशासकीय धोरणाचा पाया ठरवून त्यावर हिंदवी स्वराज्याची उभारणी केलेली होती. म्हणूनच छ.शिवाजी महाराजांचे सामाजिक धोरण अभ्यासणे अत्यंत महत्वाचे ठरणारे आहे. 
             शिवनीती
 छ.शिवाजी महाराजांचे सामाजिक धोरण :-
            छ.शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे देशातील व देशाबाहेरील अनेक नामवंत इतिहासकारांनी, संशोधकांनी व अभ्यासकांनी, शासन यंत्रणांनी खूप मोठ्या प्रमाणात संशोधन केलेले आहे. तसेच त्यावर आणखी कित्येक जण संशोधन करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवनीती व कार्यावर आधारित अनेक जण शिकण्याचा आणि अंगिकरण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच महाराजांच्या अंगी असलेल्या विविधता मधून एकता कशी होती, ह्यावर अभ्यास करण्याचा प्रयत्न करत आहेत. यात शंका नाही, परंतु झालेल्या संशोधनामध्ये नव्वद टक्के संशोधन हे राजकीय व प्रशासकीय क्षेत्राचेच झालेले आहे. प्रस्तुत शोधनिबंधामध्ये छ. शिवाजी महाराजांच्या सामाजिक धोरणावर प्रकाश टाकण्याचा छोटासा प्रयत्न करण्यात आलेला आहे. 
      १) इतर जातीधर्माच्या लोकांना (मुसलमानांचा) उचित सन्मान - 
         भारतीय इतिहासाच्या प्रारंभापासून भारतात ‘यथा राजा तथा प्रजा’ हा अलिखित नियम कटाक्षाने पाळला जात होता. ‘राजाचा जो धर्म असेल तो प्रजेचा धर्म’ मानला जात होता. छ.शिवाजी महाराजांच्या कार्य - कालखंडामध्ये भारतात मुस्लिम राजकर्त्यांच्या अनेक राजवटी होत्या, आग्ऱ्यात मुघलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, बिदरची बरीदशाही, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही तसेच स्थानिक सत्ता अशा अनेक मुस्लिम राजेशाही त्या प्रांतात कमी अधिक मुस्लिम प्रजेला झुकते माप दिले जात होते. इ.स. १६१० मध्ये मसूरच्या पाटीलकीवरून बापाजी मुसलमान व नरसोजी जगदाळे यांच्यात वाद निर्माण झाला तेव्हा तत्कालिन न्याय निवाड्यात ‘‘नरसोजी जगदाळे यांचेच गळा पडोन त्यास कष्ट केले, वतनास विक्षेप केलास, ऐसा तू गुन्हेगार, तुला देहांत प्रायश्‍चित द्यावे, परंतु मुसलमानाची पातशाही तुही मुसलमान क्षमा जाली’’ असा उल्लेख आढळतो. शहाजहान याने जानेवारी १६३३ मध्ये एक आदेश काढून आपल्या साम्राज्यामध्ये नविन मंदिराच्या निर्मितीवर व जुन्या मंदिराच्या दुरूस्तीवर बंदी घातली. औरंगजेबाने ही हेच धोरण चालू ठेवले. याशिवाय त्याने मुसलमानांना सरकारी नोकरीमध्ये प्राथमिकता देण्याचे धोरण अंगिकारलेले होते. इ.स. १६६७ मध्ये चार पोलीस अधिकार्‍यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आले. परंतु त्यांनी इस्लाम धर्म स्विकारताच त्यांना पुन्हा त्यांच्या पदावर नियुक्त करण्यात आले. तसेच आग्र्याच्या भेटीवेळी अडकलेले वीर नेताजी पालकर ह्यांना औरंगजेबाने धर्मांतराची अट घालून जीवदान दिले होते, व धर्मांतर करून घेतले होते परंतु तेथून सुटून आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज ह्यांनी वीर नेताजी पालकर ह्यांना काही मोजक्या धर्मवेड्याच्या (ब्राम्हण) कारणामुळे धार्मिक विधी करून स्वराज्यात घ्यावे लागले. स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांना देखील काही ब्राम्हणांनी मंदिर प्रवेश नाकारून धर्माच्या बंधनात अडकवले होते. परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधीच धर्माचं सोंग घेतलं नाही किंबहुना कोणालाही कोणत्याही जातीला धर्म, जात ह्याची बंधन घातलं नसल्याचे आपण वाचतो.
             तसेच स्वराज्य रक्षक, धर्मयोद्धा म्हणून जगात प्रसिद्ध असणारे स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजीराजे ह्यांना देखील अखेरच्या वेळी औरंगजेबाने मुस्लिम धर्म स्वीकारल्यास माफ करतो, अशी विचारणा केली होती. परंतु  धर्मरक्षक होते, छत्रपती होते संभाजीराजे त्यांनी कधीच मागणी मान्य केली नाही. ह्या सर्व उदाहरणावरून मुस्लिम राजकर्त्यांच्या राजवटीमध्ये हिंदुना कशा पध्दतीने वागवले जात होते, याची कल्पना येते. छ.शिवाजी महाराजांनी मात्र स्वराज्यातील परधर्मिय असलेल्या मुसलमानांना देखील अत्यंत सन्मानाने वागवल्याचे दिसून येते. केळशी जि. रत्नागिरी येथील चाकूत बाबा ह्यांना छ.शिवाजी महाराज मानत असत. त्यांनी चाकूत बाबाच्या दर्ग्यास उद, फुल, दिवाबत्ती आणि येथील फकिरांची सोय व्हावी म्हणून ६५३ एकर जमीन अग्रहार म्हणून दिल्याचा उल्लेख एका आज्ञापत्रात आढळतो. इ.स. १६५२ मध्ये पेडगावच्या कुलकर्णी वतनाचा वाद निर्माण झाला तेव्हा बोलावण्यात आलेल्या न्यायसभेमध्ये सैय्यद महेमूद शेख इमामखान, समाखान मीर अलीखान आणि आगा अहमद हे चार मुसलमान सहभागी झालेले आहेत. वाद कुलकर्णी वतनाचा आणि पंच किंवा साक्षीदार म्हणून वरील चार मुसलमान आहेत. इ.स. १६५० मध्ये पाली येथील कुलकर्णी वतनाचा वाद निर्मान झाला. याही वादाच्या न्यायनिवाडाप्रसंगी आबूल रहिम मौलाना, इस्माईल देसाई, आब्दूलजी, हुसेनजी, अगामीर, महमद दलवी आणि इस्माईल अहमद यांच्या साक्षी प्रमाण मानून न्यायदान करण्यात आले. इ.स. १६५७ च्या गुंजन मावळच्या देशमुखी वतनांचा वाद निर्माण झाला, तेंव्हा ७२ वतनदार हजर हाते. त्यात १० मुसलमान वतनदार हजर आहेत. हया सर्व दाखल्यावरून छ. शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या जडण-घडणीत मुसलमानांना अत्यंत सन्मानाने सहभागी करून घेतले होते. या शिवाय सिद्यी हिलालखान, मदारी मेहत्तर, नूरखान बेग, इब्राहीमखान यांनी स्वराज्याच्या लष्करामध्ये फार मोठे शौर्य गाजवलेले सर्वांना ज्ञात आहेच. सिद्यी इब्राहिम हा मुसलमान तर छ.शिवाजीराजांचा विश्‍वासू अंगरक्षक म्हणून कार्यरत होता.एकीकडे मुसलमान राजकर्त्यांचे हिंदु विरोधी किंवा आडवणुकीचे धोरण आणि छ.शिवाजी महाराजांचे मुसलमानाप्रति अत्यंत जिव्हाळयाचे धोरण पाहिल्यानंतर छ. शिवाजीराजांच्या स्वराज्यात सामाजिक सलोखा का होता? या प्रश्‍नाचे उत्तर सापडते. 
         छ. शिवाजी महाराजांनी आपल्या राज्य आभिषेक प्रसंगी रायगडावर जसे जगदिश्‍वराचे मंदिर उभारले, तसेच त्यांनी आपल्या महालासमोरच मुसलमान बांधवासाठी मस्जिदीचेही बांधकाम करून सामाजिक सलोख्याचा आदर्श आपल्या जगासमोर ठेवलेला आहे. छ.शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील सामाजिक सलोख्यासाठी ‘‘धर्म निरपेक्षता’’ हया तत्वाचा आधार घेतल्याचे दिसून येते. 
        २) जातिभेदाची तिव्रता कमी केली -
     भारतीय समाजातून जी कधीच जात नाही तिला ‘जात’ म्हणतात. आधुनिक काळातील म.ज्योतिराव फूले, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, गोपाळ गुरू हया समाजसुधारकांनी 'जातीच्या' अंतासाठी खुप मोठे कार्य केलेले आहे. यांच्या जातीअंताच्या भुमिकेतून छ.शिवाजी महाराजांकडे पाहता येणार नाही, व ह्या सर्वांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर करता येणार नाही हे देखील समजून घेतले पाहिजे. कारण प्रत्येकाचे जीवन मुल्य वेगवेगळे असतात म्हणून एकमेकाच्या कार्याची तुलना करणे, न्यायोचित ठरत नाही. छ.शिवाजी महाराजांचे जीवन मूल्य, स्वराज्याची उभारणी करून त्याचे सुराज्यात रूपातंर करणे, हे होते. तसेच सर्वच जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन त्यांना स्वतःचे आणि सुराज्य बनवता येईल अशी महाराजांची दूरगामी संकल्पना होती. ह्या संकल्पनेला सामान्य जनतेने देखील साथ दिली. त्यांनी आपली जात आपला धर्म असे कधीही कुठेही उल्लेख केल्याचे आपणास आढळत नाही, नाहीतर आता आपण पाहतोय की, स्थानिक राज्य, देश पातळीवर जर आपल्या जातीचा उमेदवार नसला तर त्याला आपण निवडून द्यायचे नाही भले त्याने कितीही महान कार्य केले असले तरी त्याला निवडणूक पराजय स्वीकारावा लागतो. त्यामुळे अशा राजकर्त्याकडून आपण जाति निर्मुलनाच्या कामाची आपेक्षा करता येणार नाही. किंबहुना करू देखील नये.
        तरीही छ.शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती करीत असताना, त्यांनी महाराष्ट्रातील आठरा पगड जातीच्या माणसांना स्वराज्याच्या प्रवाहामध्ये एकत्रित आणले. स्वराज्याच्या भगव्या झेंडयाखाली आणले आणि सर्वांना समानतेच्या न्यायाने वागवले, ही बाब त्यांच्या सामाजिक धोरणाचे अति अधीष्ठान सांगण्यास पूरेशी आहे. छ.शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीसाठी व उन्नतीसाठी महाराष्ट्रातील सर्व जातीच्या लोकांनी तनमनधन अर्पण केल्याचे इतिहासात असंख्य दाखले मिळतात. त्यात कान्होजी जेधे, तानाजी मालुसरे, येसाजी कंक, नेताजी पालकर, हंबीरराव मोहिते (मराठा), मोरोपंत पिंगळे आण्णजी दत्तो (ब्राम्हण), बाळाजी आवजी , बाजीप्रभू देशपांडे (कायस्थ), जिवा महाला, शिवाजी काशीद, तान महाळा (न्हावी), लाय पाटील (कोळी), नागनाक खंडू (महार), बहिर्जी नाईक (रामोशी), नूरबेग, काझी हैदर, मदारी मेहतर, दौलतखान, सिद्दी इब्राहिम, वाहवाखान, सुलतान खान आणि सिद्दी इ्रब्राहिम (मुसलमान). असे अनेक जण आहेत आपण काही मोजकी नावे घेत आहोत, सविस्तर माहिती वेळोवेळी पाहणारच आहोत. हे सर्व छ.शिवाजी महाराजांचे स्वामीभक्त सेवक होते. या सर्वानी आपली ताकत छ.शिवाजी महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभी केली, प्रसंगी आपल्या जीवाचे बलिदान दिले, तसेच घरातील कार्य बाजून ठेवून स्वराज्यातील कार्यात उतरल्याचे आपण समजतो, यात वीर तानाजी मालुसरे सारखे मावळे स्वतःच्या मुलाचे लग्न झाल्यावर लढाईला गेले नाहीत, तर त्यांनी महाराजांना लग्न पत्रिका द्यायला गेल्यावर समजले की, 'राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊंच्या व छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात कोंढाणा जिंकण्यासाठी जाण्याची कल्पना आहे,' केवळ एवढेच समजता वीर तानाजी मालुसरेंनी सगळा लग्नविधी कार्य बाजूला ठेवून, कोंढाणा जिंकण्यासाठी लढाईला गेले. नुसते दिखावा म्हणून गेले नाहीत तर किल्ल्यावर लढाईत आपले बलिदान देखील दिले परंतु स्वराज्यात दक्षिण मधील बलाढ्य किल्ला जिंकण्यासाठी जीव दिला, आणि आता कोणत्या सरपंच, आमदार, खासदार, मंत्री ह्यांना कोण म्हटलं की आपल्याला असे कार्यावर जायचे आहे तर काहीजण म्हणतील तुम्ही जाऊन या. मग मी जातो.छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यात जीवलग, जीवाला जीव देणारी मंडळी होती म्हणूनच स्वराज्य निर्मितीचा संकल्प सिध्दीस गेला. ही आठरा पगड जातीची मानस एकत्रित करणे, हा सुध्दा छ.शिवाजी महाराजांच्या प्रगत सामाजिक धोरणाचा एक अविभाज्य घटक ठरतो. छ. शिवाजी महाराजांच्या अशा प्रकारच्या समाजिक धोरणामूळे तत्कालिन महाराष्ट्रातील जातीयतेची ताठरता किंवा तिव्रता काही प्रमाणात निश्‍चितच कमी झालेली दिसते. वीर मावळे जिवा महाला, शिवाजी काशिद, लाय पाटील, बहिर्जी नाईक, नाकनाक महार, इत्यादी विविध जातीच्या लोकांच्या हातामध्ये ब्राम्हणी व्यवस्थेने दिलेले उपजिवेकेचे साधने काढून टाकून, त्याच्या हातामध्ये छ. शिवाजी महाराजांनी लष्करी आवजारे दिली, यावरून शिवाजी महाराजांचे सामाजिक धोरण परिवर्तनाच्या दिशेने जाणारे होते याची खात्री पटते... जगदवंदनीय, विश्वभुषण, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार किती प्रगल्भ होते हे आपणास समजते अशा जाणत्या राजाचा विजय असो !!
      परंतु सध्या आपण पाहतोय, प्रत्येक जातीच्या, प्रत्येक धर्माच्या नावाखाली आपली पोळी भाजून घेणारे, आपली घर भरणारे, आपल्या बँक खात्यावर रकमा गोळा करणारी मंडळी आपल्या समाजात वावरताना दिसते. ते आपल्या समोर दाखवताना जात दाखवत नाहीत, धर्म दाखवत नाहीत परंतु आपल्या पश्चात आपल्याच जातीधर्माच्या लोकांच्या कार्याची काळजी करताना, किंवा कामे करताना आढळतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही त्यांच्याच जातीच्या लोकांची कामे केली नाहीत. त्यांनी कधीच आपल्या किल्याला जातीधर्माचे नावे दिली नाहीत. त्यांनी कधीच आपल्या जातीची मंदिरे उभा केली नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जाती सोबतच आपल्या इतर सर्व जातींचा विकास व्हावा त्यांचे कल्याण व्हावे, त्यांना महत्वाचे असणारे उपजीविका करता यावी, त्यांना अभिमानाने समाजात वावरता यावे ह्यासाठी महाराजांनी सर्वाना समान वागणूक दिली, समान सन्मान केला, समान संधी दिली समान न्याय केला आणि समान शिक्षा देखील केली. 
      आपल्या कुटुंबाला जास्त संरक्षण आणि इतरांना नियम असे देखील कधीच केले नाही. जो नियम आपल्याला सामान्य जनतेला, रयतेला होता तोच नियम स्वराज्याच्या राजाला, राजांच्या घरातील व्यक्तींना देखील तोच नियम होता. ह्यात काही स्वार्थी लोकांनी मात्र महाराजांना न कळता सर्वजातीधर्माचे स्वराज्य हडपण्यासाठी टोकाचे प्रयत्न केल्याचे आपण वाचतो. परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व जाणत होते त्यांना ह्या गोष्टींचा अंदाज येत असत, पण समान न्याय नियम ह्या मुळे त्यांनी विशिष्ट जातीला, कूट कारस्थाने करणाऱ्याला कधीच पाठीशी घातले नाही, तर त्याला देखील दरबारात दोषरोप चालवून निर्दोशी आल्याचे सिद्ध करावे लागले. परंतु त्यांनी कूट कारस्थाने केल्याने ते काहीजण निर्दोषत्व सिद्ध नाही करू शकले त्यावेळी महाराजांनी शिक्षा केल्याचे आपण वाचतो. उदा पाटलावर केलेली शिक्षा.
       आज देखील आपल्याला सामाजिक दृष्टिकोण शिकायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांना अभ्यासावे लागेल. त्यांचे विचार वाचावे लागतील, समजून घ्यावे लागतील. तसेच महाराजांनी केलेल्या सामाजिक कार्याची जाणीव ठेवत आपल्यातील राजकारण करणाऱ्या मंडळींना सांगावे लागेल की कार्यकर्ते फक्त तुमच्या साठी नाहीत तर ते समाजासाठी काहीतरी कराल, समाजाची प्रगती कराल म्हणून तुमच्या सोबत येत आहेत. परंतु आजकालचे राजकीय वातावरणात कार्यकर्त्याचा वापर फक्त निवडून येण्यासाठी केला जातो, भांडण तंट्यासाठी केला जातो तसेच राजकीय कर्त्याच्या घरकामासाठी केला जातो. परंतु हे करताना देखील कार्यकर्ते हे आपल्याच जातीचे एकत्र करत त्यांचा नेता बनण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे आपण पाहतोय. खूप कठीण आहे भविष्यकाळ कारण अशीच जात, धर्म प्रथा वाढत जात आहे. ह्यात सुशिक्षित लोकात जातीची विचार कमी होतील असे वाटत होते परंतु तसे दिसत नाही, तर हे सुशिक्षित लोकच आपल्या जाती, धर्माच्या नावाखाली कमी शिक्षित लोकांचा वापर करत आपली जात समाजात मोठी करताना आपण पाहतोय. ह्यांना समजून सांगून कधीच कळत नाही किंबहुना ह्यातून आज असणारे राजकीय पक्ष काही वर्षांनी जाती नुसार तयार होतील. आणि मग अमुक जातीचा एक पक्ष्याचे नेतृत्वाखाली राजकारण करण्यात येईल अशी परिस्थिती निर्माण होत आहे. 
     ह्यातून निष्पन्न काय होते तर ' नेतृत्व करणारा श्रीमंत होतो, आणि जातीची धर्माची दरी आणखी मोठी बनत चालली आहे. वेगवेगळ्या धर्माच्या जातीच्या नावाखाली आपलं आपलं कसं भलं करता येईल ह्यासाठी प्रत्येकजण पाहतो आहे. आणि हे करण्यासाठी त्यांना आधार हा मागील 4 वर्षाचा कालखंडातील घेत समाजात तेढ निर्माण करून समाजाला भडकवून त्यातून जातीजातीत वाद निर्माण करून आपली पोळी कशी भाजली जाईल ह्यासाठी प्रयत्न करणारी मंडळी आपण पाहतोय. साधं उदाहरण आहे, जन्माने जात येत, जन्माने धर्म येतो आणि कर्माने मान येतो. मग कर्म चांगलं केलं तरच मान येईल परंतु आपण पाहतोय कुकर्म करून आपल्याला लुटून देखील श्रीमंतांच्या बंगल्यात ऐशआरामात जगणारी नेतेमंडळी आपण पाहतो. आणि जाती धर्माची बंधने तोडून समाज कार्य करणारी मंडळींना हे राजकारणी नेतेमंडळी तात्काळ स्वर्गलोकी पाठवत असल्याचे अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत. 
        शहरांपेक्षा खेड्यात आजून जातीधर्माचं वार कमी आहे. ते समजून घेत सर्वजण एकत्र तरी येतात एकत्र राहतात. परंतु आज बघावं तिथं जात आणि धर्म बघितला जातोय. जन्मला जात कोणती धर्म कोणता? शाळेत घालायचं जात धर्म कोणता? शिकून मोठा हुशार झाला नोकरीसाठी जात धर्माची विचारणा का? नोकरीसाठी जात का? व्यवसायात देखील जात का? समाज कार्यात देखील जात का? राजकारणात देखील जात का? जात, जात आणि जात जातींच्या नावाखाली आम्ही मरतो, तिथं सुद्धा ह्या जातीचा त्याचा अंत्यविधीसाठी वेगळी पद्धत मुस्लिम वेगळी पद्धत कशासाठी ? असो त्या त्या धर्माचा आदर करू आपण पण वरील सर्व ठिकाणी प्रत्येकजण आपली जात असेल तरच सहभागी होतो, तिथे हजर राहतो, किंवा समाविष्ठ होतो.
     म्हणून सांगावं वाटतं की,
    जात कोणती पुसू नका,
    धर्म कोणता पुसू नका,
    माणुसकीचे आम्ही उपासक
    माणुसकीला पुसू नका.
           छत्रपती शिवाजी महाराज यांनी फक्त अठरापगड जाती, सर्व धर्मच एकत्र केले नव्हते तर ते इतर देशातील लोकांचा देखील आदर करत होते. त्यात आवर्जून सांगावं वाटत की स्वराज्य निर्मिती वेळी 'राज्य अभिषेका' वेळी रायगडावर सर्व राजांना निमंत्रित केलं होतच त्याच बरोबर इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच ह्यांना देखील बोलावलं होतं. ह्यामागे महाराजांचे खूप मोठे सामाजिक आणि राजकीय नियोजन धोरण असल्याचे आपणास मान्य करावेच लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्याच कार्याला शिवनीतीच्या दुसऱ्या पुष्पात गुंपण्याचा आम्ही आज प्रयत्न केला आहे. त्याचा स्विकार व्हावा.
          शिवनीती भाग -२
                   क्रमशः..........
  

Comments

Popular posts from this blog

CTET Feb 2026 Final Ans Key

 CTET Feb 2026 Final Ans Key  CTET 7 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 7 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here ज्यांना फायनल उत्तर सूची नुसार कोणत्याही पेपर मध्ये 81 किंवा 89 मार्क आहेत, त्यांनी 7588020886 ह्या नंबर वर खालील प्रमाणे माहितीसह संपर्क करावा. 1) आपले नाव - 2) Roll नंबर - 3) मोबाईल नंबर - 4) पत्ता - 5) CTET पेपर नंबर - १ / २ 6) CTET पेपर कोड - 7) CTET पेपर मार्क - 8) CTET पेपर दिनांक - 7 Feb. 2026 / 8 Feb. 2026 ह्यासाठी आपणास योग्य आणि अचूक मार्गदर्शन करण्यात येईल.    More information please Call / Whatsapp - 7588020886 Crescita Academy 

CTET result पुन्हा तपासण्यासाठी दुसरी संधी

CTET Feb. 2026 च्या निकाल बाबत काही आपल्या मनात शंका असल्यास आता एकदा पुन्हा संधी मिळतेय नक्की फायदा करून घ्या. ज्यांना 81 किंवा 89 असे काठावर मार्क आहेत त्यांनी ह्या संधीचा नक्की फायदा करून घ्या.